बालमित्रांनो, दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या शहराबद्दलच्या गमतीजमती तुम्हाला वाचायला आवडतील का? तुमच्यापैकी काहीजणांनी दिल्ली पाहिली असेल त्यांना या गोष्टी कदाचित माहिती असतील. पण ज्यांनी दिल्ली पाहिलेली नाही त्यांना या गमती वाचायला मजा येईल ना? 

आज मी तुम्हाला दिल्लीतल्या वेगवेगळ्या रस्त्यांच्या नावाबद्दल सांगणार आहे. आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच रस्त्यांची नाव ही नेते, ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची माणसं यांच्यावरून ठेवलेली दिसतात. दिल्ली शहरालाही मोठा इतिहास आहे, त्यामुळे अर्थातच इथे ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची नावं असणारे रस्ते आहेतच. उदाहरणार्थ; अकबर रोड, शहाजहान रोड, लोदी रोड अगदी औरंगजेब रोडसुद्धा. ही सगळी व्यक्तिमत्व भारताचा जो मध्ययुगीन इतिहास आहे त्यात महत्त्वाची होती. महाराष्ट्रात मात्र एखाद्या रस्त्याचं नाव औरंगजेब रस्ता असं असणं जवळजवळ अशक्य. दिल्लीतल्या रस्त्यांच्या नावाची आणखी एक कॅटेगरी आहे ती म्हणजे गुणांची नावं. न्याय मार्ग, सत्य मार्ग, विनय मार्ग, शांतिपथ, विजयपथ. हा विजयपथ तुम्ही प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात पाहिला असेल. नसेल पाहिला तर पुढच्या वर्षी प्रजासत्ताकदिनाच संचलन टी.व्ही.वर नक्की पाहा. शांतिपथाच वैशिष्ट्य असं की, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेगेवेगळ्या देशांचे दूतावास आहेत. मुगलकालीन इतिहासाच्या खूप साऱ्या पाऊलखुणा दिल्लीत पदोपदी दिसतात. कुतुबमिनार, लाल किल्ला, पुराणा किल्ला, जामा मस्जिद, हजरत निजामुद्दीन दर्गा अशा कितीतरी वास्तू इथे दिसतात. रस्त्यांच्या नावांवरही मुगलकालीन, तसंच ब्रिटिशकालीन इतिहासाची छाप आहे. दिल्लीतल्या आणखी एका सुंदर रस्त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तो आहे अमृता शेरगील मार्ग. अमृता शेरगील या प्रसिद्ध चित्रकार होत्या. ज्या रस्त्याला हे नाव दिलेलं आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान झाडं आहेत. या झाडांची हिरवाई या रस्त्यावर पसरलेली असते. मराठीत ज्याला आपण गुंजेच झाड म्हणतो, इंग्लिशमध्ये लॅबर्नम म्हणतात त्या झाडांच्या फुलांनी हा अमृता शेरगील मार्ग सजलेला असतो, तेव्हा त्या सुंदर रस्त्याला एखाद्या चित्रकाराचं नाव देण्यातली रसिकता दिसून येते. मुंबईतही अशा लॅबर्नम झाडांनी सजलेला रस्ता आहे. गावदेवी भागात याच रस्त्यावर महात्मा गांधींमुळे प्रसिद्ध असणारं मणिभवन आहे. मग आता फक्त दिल्लीच नाही, तर कुठच्याही दुसऱ्या शहरात जाल तेव्हा तिथले रस्ते आणि त्यांची नावं बारकाईने पाहाल ना? 

-सुप्रिया देवस्थळी

[email protected]