आज शिबिराचा तिसरा दिवस. शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर म्हणजे बालगोपाळांसाठी मज्जाच मज्जा. ‘पुस्तक माझे’ , ‘रंग-रांगोळी’ या सत्रानंतर आज ‘बनवू शिल्पे’ या सत्राचे आयोजन होते. सत्र सुरू होण्यापूर्वी काल कोणी कोणी कोणत्या आकाराची रांगोळी काढली यांवर गप्पा झाल्या. प्रीतीताईंनी टाळ्यांचा खेळ, ससुल्याची उडी असे मनोरंजनाचे खेळ घेतले. नंतर हत्तीच्या पिलाची गोष्ट प्रीती एरंडे यांनी सांगितली. मग आजच्या सत्राला सुरुवात झाली. न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील कलाशिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी हे सत्र घेतले. त्यांनी मुलांना मातीकाम शिकवले. सुरुवातीला वरगंटीवार सरांनी शिल्प कसे बनवायचे, याची ओळख करून दिली. प्रत्येकालाच मातीकाम करायचे होते. मातीकामाच्या साध्या, सोप्या वस्तू सुरेश वरगंटीवार यांनी बनवून दाखवल्या. कॅडबरी, स्ट्रॅाबेरी या वस्तू बनवत असल्याचे पाहताना मुलांना मोह आवरत नव्हता. मुलांनी गटा-गटाने बसून प्रत्येकाला दिलेल्या मातीच्या गोळ्यातून सुंदर सुंदर वस्तू तयार केल्या. मुखवटे, स्माईली, पोळपाट-लाटणे, कॅडबरी, प्राणी, झाडांचे खोड, अशा अनेक वस्तू मुलांनी बनवल्या. प्रसंगी मुले सुरेश वरगंटीवार यांची मदत घेत होते. स्वतः तयार केलेल्या वस्तू नीट जपून ठेऊन सगळे आपापल्या घरी परतले. प्रीतीताई, अर्चनाताई, रुपालीताई, सायलीताई यांनी मुलांना वस्तू बनवताना मदत केली.

 

उन्हाळी शिबिर : दिवस दुसरा (पूर्व-प्राथमिक)

-प्रतिनिधी