19व्या शतकाचा विचार केल्यास या शतकावर ‘ज्ञान ही एक शक्ती आहे, शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे.’ या विचाराचा महाराष्ट्रात प्रभाव दिसतो. ‘विचार’ आणि ‘आचार’ याबाबत महात्मा फुले आदर्श होत. तत्कालीन समाजात शिक्षणाची संधी ज्यांना नाकारण्यात आली आहे, अशांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. इंग्रजी राज्य लेखी कायद्यांवर आधारित असल्याने अज्ञान, निरक्षर लोकांची फसवणूक टाळणसाठी शिक्षण हा प्रभावी उपाय होता. मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी शिक्षण हे प्रभावी हत्यार आहे, यावर महात्मा फुले यांचा विश्वास होता. याच कारणासाठी त्यांनी शिक्षण वरिष्ठ वर्गातून आपोआप खालच्या वर्गापर्यंत पाझरत जाईल, या ‘पाझरण’ किंवा ‘झिरपणी’ सिद्धांतास विरोध केला.

शिकून सर्वांनाच नोकऱ्या मिळणार नाहीत, याची जाणीव महात्मा फुले यांना होती, त्यामुळे त्यांनी व्यवहारज्ञान व व्यावसायिक कौशल्यांचा पाठपुरावा केला. तत्कालीन समाजात व्यसनाधीनता वाढत चाललेली पाहून त्यांनी ‘शूद्र मुलामुलींना शाळेत घालावे! सुशील करावे सर्व कामी’ अशी भूमिका मांडली. हंटर आयोगापुढे साक्ष देताना त्यांनी 12 वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींस प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची सूचना केलेली होती. चांगले शिक्षक खेड्यात जायला तयार होण्यासाठी त्यांस अधिक वेतन व स्थानिक पातळीवरील कामे देण्याची गरज आहे, असे सांगून शिक्षकांचा पगार विद्यार्थ्यांच्या निकालाशी जोडण्यास विरोध केला.

महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीयांनी भारतीयांसाठी सर्वांना मुक्त प्रवेश देणारी ही पहिलीच मुलींची शाळा. पुढे अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात तीन मुलींनिशी शाळा सुरू झाली. लवकरच तिची संख्या 48 पर्यंत पोहोचली. पुढे रास्ता पेठ, वेताळ पेठ येथे शाळा निघाल्या. ज्योतीराव आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात नूतन सृष्टीच निर्माण केली.

 

-गणेश राऊत

[email protected]