आज स्नेहलताईनं आल्या आल्या शबनम झोळीतून एक काचेचा ग्लास काढला. पाण्याच्या बाटलीतील थोडं पाणी त्यात घातलं. सगळे जण कुतूहलानं बघत होते. ताईनं त्यांना विचारलं, “बच्चे कंपनी, सांगा पाहू तुम्हाला काय दिसतंय समोर?” आता मात्र मुलं फस्सकन हसली. असं काय विचारतेय ताई... त्यांना काही कळेना...

ताईनं एकेकापुढे जात तोच प्रश्न विचारला.

ग्लासमध्ये पाणी...

काचेचा ग्लास आणि त्यात पाणी...

ग्लासमध्ये थोडं पाणी...

अर्धा ग्लास रिकामा...

अर्धा ग्लास पाणी...

अर्धा ग्लास पाण्यानं भरलेला...

ग्लासमध्ये थोडंतरी पाणी आहे...

मुलांनी ताईच्या चेहेऱ्याकडे बघतबघत निरनिराळी उत्तरं दिली.

“आता यांत महत्त्वाची गोष्ट काय ते सांगू ?” ताई म्हणाली...

“अरे वा...अर्धा ग्लास भरलेला आहे.... असं वाटणं आणि अरेरे...  अर्धा ग्लास रिकामा आहे... असं वाटणं, हा दोन उत्तरातला मुख्य फरक आहे.

सर्वांचीच उत्तरं बरोबर असली तरीही, असं म्हणतात...आपण जसा विचार करतो, तसं आपल्याला दिसतं. प्रत्येकाच्या उत्तरात त्याची विचार करायची पद्धत दिसते. आणि म्हणूनच ज्याचा त्याचा स्वभाव त्यांत दिसून येतो. त्यामुळे ज्यांना त्या ग्लासात थोडं का होईना पाणी आहे असं सांगावसं वाटलं, ते चांगला, सकारात्मक (positive) विचार करतात आणि ज्यांना अर्धा ग्लास रिकामा दिसला, ते नकारात्मक (negative) विचार जास्त करतात. ही एक मानसशास्त्रीय परीक्षा होती असं म्हणा ना...”

मुलं अधिक लक्ष देऊन ताईचं म्हणणं ऐकू लागली.

थोडक्यात काय तर आपल्याकडे 'काय नाही' याचा विचार करून चिंता करण्यापेक्षा, ‘काय आहे?’ त्याचा आनंद वाटणं जास्त महत्त्वाचं. यालाच positive thinking म्हणतात. अशा सकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे कोणतंही काम करताना, मनावर ताण येत नाही. No Tension...

जे काम करायचं आहे, त्याची सुरुवात करताना, मला हे जमेल का...? कशाला उगाच या फंदात पडा असा विचार न करता, करून तर पाहू या... असा positive विचार मनात  आणला तर, त्या दिशेने आपले प्रयत्न तर चालू ठेवता येतात आणि ‘प्रयत्नांती परमेश्वर...’ म्हणजेच हार न मानता जिद्दीनं, चिकाटीनं प्रयत्न करत राहिलं की यश हे मिळतंच. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सर्व अडचणींवर मात करून, आपल्या बुद्धीच्या जोरावर अथक परिश्रमांनी आपलं ध्येय कसं गाठलं याबद्दल तुम्ही वाचलं असेलच ना. त्यांनी सांगून ठेवलंय, आयुष्यात वाईट काही नसतं, फक्त देवानं आपल्याला काय चांगलं दिलंय ते ओळखा आणि पुढे चला.

काय ...? समजतंय ना ?

सुरुवातीला गोंधळून गेलेली मुलं, एकमेकांकडे बघत मोकळेपणानं हसली...असं पण   असतं ...? काहीतरी नवीनच त्यांना आज कळत होतं.

इतक्यात कोकिळेच्या कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ आवाजानं सर्वांचं लक्ष तिकडे गेलं.

“आता मला सांगा, मार्च महिना सुरू झाला, होळी येऊन गेली, थंडी पळाली, उकाडा सुरू झाला. हे बदल तर तुम्हाला जाणवलेच असतील, पण तुमच्या आजूबाजूच्या निसर्गातही काही बदल होताहेत. ते बघितलेत का? झाडांची पान गळून निष्पर्ण झालेली होती, तिथे आता नवीन पालवी फुटू लागली आहे. तिला ‘चैत्र पालवी’ म्हणतात. आंब्याच्या झाडांवर मोहर धरलाय, त्यावर नंतर कैऱ्या-आंबे दिसू लागतील. आमराईत या कोकिळा बघा कशा आनंदानं गाऊ लागल्यात. निरनिराळ्या फळाफुलांनी झाडं बहरली आहेत. यालाच वसंत ऋतू आलाय असं म्हणतात. नुकताच गुढीपाडवा झाला. आपलं मराठी नवं वर्ष सुरू झालं, पण आपण रोज जशी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे तारीख सांगतो, तशी मराठी महिन्यातील तारीख कशी सांगतात, कोणाला माहीत आहे? "

पुन्हा सगळेजण एकमेकांकडे बघत पुटपुटले..., मराठी तारीख ...?

आठवीतल्या सारंगने हात वर केला..." चैत्र शुद्ध प्रतिपदा..."

“शाब्बास!’’ ताईनं सारंगला शाब्बासकी दिली.

“पण, हा गुढीपाडवा कोणत्या तारखेला येतो ?’’ छोट्या अंकिताने निरागसपणे प्रश्न केला.

ताई सांगू लागली..., ‘‘जे सौरवर्ष असतं ना, ते २२ मार्चला सुरू होतं. सौरवर्ष म्हणजे...सूर्याच्या भ्रमणकालानुसार चालणारं. आणि साधारण त्याच्याच आगेमागे गुढीपाडवा येतो जो चांद्रवर्षाचा पहिला दिवस...’’

“म्हणजे चंद्राच्या भ्रमणानुसार चालतं ते चांद्रवर्ष... असंच न ताई?’’ संकेतने भाव खाल्ला

“बरोब्बर...! तु्म्हाला माहिती आहे का, हा सूर्य आहे ना, तो वेळेचा एकदम पक्का बरं का आणि हा चांदोबा मात्र या छोटेयांसारखा...कधी वेळेवर तर कधी उशीरा...” छोटी मंडळी खुदुखुदु हसली.

“आणि मग येतात मराठी वर्षाचे बारा महिने...पहिला चैत्र...पुढचे कोण सांगणार सगळ्यांना ?’’

ताईने विचारताच सारंगने हात वर केला... सारंगच्या मागोमाग सगळ्यांनी नावं म्हंटली... चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन.

“बरोब्बर...आता या मराठी प्रत्येक महिन्यात तीस दिवसच असतात बरं का... त्यांना तिथी म्हणतात. या तिथी कोण सांगणार ?”

आता नववीतल्या नेहानं हात वर केला... “प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी,

नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा...हे पहिले पंधरादिवस... पंधरवडा... म्हणजे शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष.” “अरे वा, बरीच माहिती आहे की नेहा तुला...’’ ताईनं नेहाला शाबासकी देताच किरणला पण उत्साह आला.

“पुढे पुन्हा पंधरा दिवस असेच मोजायचे, पण पंधरावा दिवस अमावस्या... याला वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष म्हणतात.’’ किरणलाही शाब्बासकी मिळाली.

ताईच्या बोलण्याची हीच तर गंमत होती, ती कोणालाच शिकवायची नाही. फक्त कोणाला काय माहीत आहे, ते हळूच काढून घ्यायची. ज्यांना एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्यांना ती नव्याने कळायची. त्यामुळे सगळी मुलं आनंदानं सहभागी व्हायची.

“आता मला सांगा, चैत्र महिन्यात काय काय करतात...?

“गुढीपाडव्याला गुढी उभारतात, नवीन वर्षीच्या स्वागतासाठी दारावर तोरणं लावतात, कडुलिंबाचा कडू पाला आणि साखरेच्या गोड गाठ्या खातात.."

“पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात.”

“चैत्रगौर मांडून हळदीकुंकू, ओले हरभरे, आंब्याची डाळ आणि कैरीचं पन्हं...”

 सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं हा बेत ऐकून... आणि काय मज्जा...  वेदाच्या आईनं खरोखरंच सर्वांसाठी डाळ आणि पन्हं आणलं होतं. मग काय, सगळे खूश त्या चैत्रातल्या बेतावर...

लेख १- सांग ना स्नेहलताई

 - मधुवंती पेठे

[email protected]