नमस्कार , शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज दुसरा दिवस. काल काय काय केले, याची उजळणी करत असतानाच 'आज काय काय असणार ', असे कुतुहलपूर्ण चेहरे पाहताना खरोखरच गंमत वाटली. प्रत्येकाच्या डोळ्यातील भावना अगदी बोलक्या होत्या. काल आवडलेले खेळ परत खेळल्यानंतर आजच्या सत्राला सुरुवात झाली. आजचे सत्र म्हणजे रंगीत सत्र - 'रंग - रांगोळी'. या सत्रात शिशुविहार विद्यापीठातील कला शिक्षिका रेखा भदाणेताईंनी मुलांना रांगोळी शिकवली. सुरुवातीला रेखाताईंनी रांगोळी म्हणजे काय, कोण काढतं, कशी काढतं, अशी प्रस्तावना करताच मुलांना रांगोळी काढायला मिळणार म्हणून आनंद झाला. रांगोळीची ओळख झाल्यानंतर मध्यभागी रेखाताई आणि कडेला सगळे छोटे कलाकार जमा झाले. त्यांनी रांगोळीच्या अनेक खुणा, रांगोळीची चिन्हे आणि चित्रे काढून दाखवली. फुलं, पान,चकली, मोर, बदक, अशी अनेक चित्रे रांगोळीतून साकारली. केवळ चिमटीत पकडून रांगोळी काढणे नाही, तर मुठीने, बोटाने रांगोळी काढण्याचे अनेक प्रकार मुलांनी करून पाहिले. त्यानंतर गटागटानुसार मुलांनी रांगोळीचा सराव केला. गटात विभागणी झाल्याने प्रत्येकाला रांगोळी काढता आली. प्रत्येकजण अगदी रेखाताईंसारखी हुबेहूब रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत होते. Fine motor skill development साठी उपयुक्त हा उपक्रम मुलांनी खरोखरच enjoy केला.
रांगोळी काढल्यावर 'फुगे उडवा' हा खेळ खेळला गेला. फुगा उडवताना शरीराचा तोल सांभाळणे, प्रतिस्पर्ध्याला धक्का न लावता आपला फुगा खूप वेळ हवेत ठेवणे याचे कौशल्य मुलांनी आत्मसात केले. आपापला फुगा घेऊन उद्या येण्याच्या ओढीने सर्वजण घरी गेले. आज दोन्ही सत्रात प्रीती एरंडे, रुपाली निरगुडे, सायली शिगवण, ईशा जवळगीकर आणि तेजश्री चव्हाण या ताईंनी मुलांबरोबर आनंद घेतला.

 

उन्हाळी शिबीर: दिवस पहिला(पूर्व-प्राथमिक)

-प्रतिनिधी