नमस्कार मित्रहो, आजवर आपण जो खगोलाचा अभ्यास केला, त्यामध्ये आपण आकाशाचे मूळ भाग कसे केले जातात, त्यात चंद्र आणि सूर्याचे भ्रमण, याचा मानवी जीवनाशी असणारा संबंध इत्यादी पाहिले. त्याचप्रमाणे मागील काही लेखांमध्ये आपण मानवाची आकाश पेलण्याची इच्छा आणि त्याचे महत्त्वाकांक्षेत झालेले रूपांतर सुद्धा पहिले. आता आपण प्रस्तुत लेखामध्ये आकाश पाहण्याच्या साधनांबद्दल जाणून घेऊयात.

फार वर्षांपूर्वीपर्यंत मनुष्य हा आकाशाचे मोजमाप हे फक्त नुसत्या डोळ्याने करत असे. त्यामुळेच फार पूर्वी आकाश हे पृथ्वीभोवती गुंडाळलेले एक कापड असून त्याला जी छिद्र आहेत त्यातून येणारा प्रकाश म्हणजे आपल्याला दिसणारे तारे असावेत अशा काही कल्पना होत्या. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सुमारे इ.स.१६०८ साली ‘हान्स लीप्परश्ये’ या जर्मन-डच चष्मा बनवणाऱ्याला अचानक एक शोध लागला.  चष्म्यांसाठी भिंगे बनवत असताना त्याला लक्षात आलं की, जर दोन भिंगे समोरासमोर धरली तर त्याच्यासमोर असणारी वस्तू ही मोठी दिसते. त्याने त्याचा हा शोध पुढे नेऊन त्याचे पेटंट १६०८ साली नोंदवले आणि हाच तो जगातील सर्वांत पहिला दूरदर्शक!!!

हान्स लीप्परश्ये हा गॅलिलिओला समकालीन होता. त्यामुळेच गॅलिलिओला या नव्या शोधाची माहिती लागताच, त्याने हे नवे यंत्र मिळवले आणि लगेच ते यंत्र आकाशाकडे वळवले. आणि मग मानवाला आकाशाबद्द्ल तोपर्यंत ठाऊक असलेल्या जवळजवळ सर्वच कल्पना आणि त्या वेळचे खगोल विज्ञान यात संपूर्णपणे परिवर्तन यायला सुरुवात झाली. दूरदर्शकाचा शोध लागल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी त्याचे नामकरण “टेलीस्कोप” असे “जिओवांनी देमिसियानी” याने केले. याचा ग्रीक अर्थ असा की, “टेली” म्हणजे लांब आणि “स्कोपे” म्हणजे पाहण्याची क्षमता. गॅलिलिओ याने या दूरदर्शकाने चंद्र पहिला आणि चंद्र हा सपाट नसून त्यावर सुद्धा विवरे आहेत असे सांगितले. तसेच गुरूचे उपग्रह आणि त्यांच्या स्थिती यावरून कोपर्निकसच्या “सूर्य-मध्य” सिद्धांताला सुद्धा पुष्टी दिली. याचप्रमाणे त्याने चंद्राप्रमाणे शुक्रग्रहाच्यासुद्धा कला दिसतात, हे दर्शवून दिले! यामुळेच या एका यंत्राने मानवाच्या आकाश निरीक्षण आणि आकलन यात किती परिवर्तन आले हे लक्षात येईल.

त्यानंतर काही वर्षांनी आपणास गुरुत्वाकर्षणाबद्दल ठाऊक असलेला शास्त्रज्ञ म्हणजेच “न्यूटन” याने, गॅलिलिओने वापरलेल्या दूरदर्शकात बदल करून दोन बहिर्वक्र भिंगांऐवजी एक परवलय (Parabolic) आरसा आणि एक द्वितीय लहान आरसा वापरून या दूरदर्शकात सुधारणा केल्या. त्यामुळे याचा आकार अतिशय लहान असूनसुद्धा तुलनेत प्रतिमा विस्तृतीकरण करण्याची क्षमता फार वाढली. कदाचित आपणास आश्चर्य वाटेल, परंतु आज सुमारे ३००-४०० वर्षानंतर सुद्धा या दूरदर्शकाच्या मूळच्या सिद्धांतांत काहीही बदल न करता आपण आज सुद्धा यावरच आधारित दूरदर्शक वापरतो आहोत.

आता या दूरदर्शकाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर त्याचे शास्त्र जाणून घेऊयात. हे दूरदर्शक दोन प्रकारचे असतात, एक – “गॅलिलीयन रिफ्रॅक्टर” किंवा “न्यूटोनियन रिफ्लेक्टर”. गॅलिलिओच्या प्रकारात दोन बहिर्वक्र भिंगे समोरासमोर लावलेली असतात आणि त्यामुळे समोरील वस्तू ही मोठी दिसते आणि त्या वस्तूचे बारकावे समजतात. तर न्यूटनच्या प्रकारात एक मोठी नळी असते, या नळीच्या शेवटच्या भागात एक परवलय (Parabolic) आरसा असतो आणि ज्याच्या केंद्र लांबीवर (Focal Length)वर दुसरा आरसा असतो. आणि त्यानंतर दुसरे भिंग आलेल्या किरणांचे विस्तृतीकरण करतात आणि आपल्याला मोठी प्रतिमा मिळते. द्विनेत्रीमध्येसुद्धा असेच तत्त्व वापरले जाते. फक्त त्यात त्रिकोणाकार लोलक (Prism) वापरून किरण हवे, तसे वाकवून भिंगांपर्यंत आणले जातात. ज्याने द्विनेत्रीचा आकार कमी होण्यास मदत होते. गॅलिलीयो, तसेच केप्लर यांनी आपापल्या पद्धती वापरून अशा दुर्बीणी तयार केल्या होत्या.

मानवाला आकाशाचे ज्ञान प्राप्त होण्यात मदत करणाऱ्या या साधनांची माहिती आपल्याला असणे फार जास्त महत्त्वाचे आहे. कारण यातूनच अनेक प्रकारचे गैरसमज दूर होत असतात आणि विज्ञानात परिवर्तन घडत असते. आत्ताच तुम्ही ऐकले असेल की “हबल” या अवकाश दुर्बिणीला २५ वर्षे पूर्ण झाली, ही दुर्बीणसुद्धा अद्ययावत असून हीसुद्धा चक्क न्यूटनच्या सिद्धांतावरच काम करते. “हबल”ने गेल्या २५ वर्षात मानवाच्या आकाशाबद्दलच्या ज्ञानात जी भर टाकली आहे, ती केवळ अमूल्य आहे. आता २०१९ साली हबलच्या सुमारे अडीच पट मोठी दुर्बीण नासाद्वारे आकाशात सोडली जाणार आहे. त्यानंतर तर मानवाच्या विश्वाच्या आकलनात अमूलाग्र बदल होण्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिलेले आहेत. नासाने पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्यासाठी जी दुर्बीण आकाशात पाठवली आहे, त्यास भारतीय शास्त्रज्ञ “सुब्रमण्यम चंद्रशेखर” यांचे “चंद्रा – क्ष-किरण दूरदर्शक” असे नाव दिले गेलेले आहे. याच प्रमाणे रेडिओ दुर्बिणी , तसेच इतर अनेक साधने यांचासुद्धा वेध आपण नक्कीच घ्याल, चला तर मग, भेटू पुढील लेखात!

गेल्या १००-१५० वर्षांत मानव नुसता आकाशात नाही तर चक्क इतर ग्रहांवर सुद्धा जाऊन पोहोचलाय.अशाच काही अवकाश मोहिमांची माहिती घेऊ या खालील लिंकवर.

लेख ९ – आकाश मोहिमा


-अक्षय भिडे 
[email protected]