न्यायवैद्यक शास्त्र हे सामान्य माणसाच्या आकलनापलीकडेच असतं असं मानलं जातं. खरं तर दूरचित्रवाणीवरील गुन्हेविषयक मालिकांमधून पोलिसांना एखादा मृतदेह मिळाला की, तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला जातो आणि त्याच्या अहवालावर आधारित तपासाची दिशा ठरवली जाते हे आता लहान मूलही सहज सांगू शकतं. पण कल्पनेपेक्षा सत्य फार वेगळं असतं याची जाणीव लहानपणीच झाल्याने जाणीवपूर्वक न्यायवैद्यक शास्त्रात आपले करिअर करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव स्त्री आणि डेप्युटी कॉरोनॉर म्हणून भारतातील पहिल्या स्त्री म्हणजे डॉ. वसुधा विष्णू आपटे.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या पणती म्हणजे डॉ. वसुधा आपटे. न्यायमूर्ती रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर तर त्यांच्या पणती भारतातील पहिल्या महिला डेप्युटी कॉरोनॉर. डॉ. वसुधा या आपल्या आजोबांच्या (आईच्या-बाबांच्या) पावलावर पाऊल ठेवून डॉक्टरी क्षेत्रात आल्या. पुण्यातील हुजूरपागा, मुंबईतील किंग जॉर्ज हायस्कूल, रुपारेल महाविद्यालय आणि नंतर नायर रुग्णालय येथे त्यांचे शिक्षण झाले. १९६४ साली एम.बी.बी.एस.  झाल्यानंतर लगेचच विद्वांसांची ही माहेरवाशीण इंजिनिअर विष्णू आपट्यांची अर्धांगिनी झाली. लवकरच सासरच्या पाठबळामुळे पॅथॉलॉजी हा विषय घेऊन त्यांनी एम.डी. केलं. नंतर मात्र रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा डॉ. वसुधा आपटे यांनी न्यायवैद्यक शास्त्राची वाट निवडली. संशयास्पद स्थितीत मृत्यू आलेली व्यक्ती स्वतःच्या न्यायासाठी कधीच लढू शकत नाही. म्हणूनच न्यायवैद्यक शास्त्रातील तज्ज्ञांनी त्या व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी त्याच्या देहाची चिकीत्सा करायची, शवविच्छेदन करायचे, मृत्यूचे कारण शोधायचे आणि ते स्पष्ट करणारा अहवाल तयार करून पोलिसांना किंवा न्यायालयात सादर करायचा. यात खरं तर जास्त आव्हान असतं असं डॉ. आपटे यांना वाटतं. या संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक पायरी महत्त्वाची असते. अहवाल लिहिताना योग्य शब्दांत तो मांडावा लागतो. म्हणूनच डॉ. आपटे यांनी नंतर एलएल. बी.सुद्धा पूर्ण केलं.
 
मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय येथे ३२ वर्षे आणि नंतर सुरत महापालिकेच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयात ४ वर्षे त्यांनी सेवा बजावली. त्यापैकी २४ वर्षे त्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक होत्या. मुंबईतील अपमृत्यूनिर्णता म्हणजे कॉरोनर कोर्टात डेप्युटी कॉरोनर म्हणून नियुक्ती झालेल्या, तसंच महाराष्ट्र मेडिको लिगल असोसिएशन व इंडियन अकॅडमी अॉफ फॉरेन्सिक मेडिसीन या अखिल भारतीय संघटनेच्या अध्यक्ष झालेल्या त्या एकमेव महिला आहेत.
 
या संपूर्ण काळात मन विषण्ण करणारे, हादरवून टाकणारे अनेक अनुभव त्यांना आले. अपघाताने मरण पावलेल्या आपल्या गरोदर मुली, सुनेपेक्षाही तिच्या पोटातला मुलगा गेला म्हणून हळहळणारे नातेवाईक त्यांना बघायला मिळाले, तसेच हुंड्यासाठी सुनेला जाळणारी पण तो एक अपघात होता असं चित्र उभं करणारी सासरची मंडळीही भेटली. मात्र आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर जेव्हा हा अपघात नसून खून आहे असं डॉ. आपटे यांनी सिद्ध केल्याने सासरच्या मंडळींना शिक्षा झाली तेव्हा कुठेतरी त्या मुलीला आपण न्याय देऊ शकल्याचीही त्यांची भावना होती.
 
डॉ. वसुधा आपटे यांना वुमन अॉफ द इअर १९९५, अमेरिकन बायोग्राफिक इन्स्टिट्यूटकडून वुमन अॉफ द डिकेड, न्यायवैद्यक चिकित्सारत्न, सायंटिफिक कौन्सिल अॉफ मेडिको लिगल सोसायटी, नवी दिल्लीतर्फे १९९९ मध्ये वुमन अॉफ मिलेनियम, सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कार, २०१० मध्ये नायर हॉस्पिटल स्टाफ सोसायटीचा जीवनगौरव, २०१३ मध्ये झी वाहिनीचा 'उंच माझा झोका' अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय न्यायवैद्यक शास्त्र या विषयाबद्दल जनसामान्यांमधील गैरसमज दूर व्हावेत यासाठी सोप्या भाषेत डॉ. आपटे यांनी 'गुन्हेगारांचे कर्दनकाळ' हे पुस्तकही लिहिले आहे. सध्या त्या मेडिको लिगल सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
महिलादिन सप्ताहातील पहिला लेख 
 
 
-आराधना जोशी