पाऊलखुणा 'ति'च्या

दिंनाक: 08 Mar 2018 18:40:09


8 मार्च ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत, आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. स्त्रियांसाठी अयोग्य मानल्या गेलेल्या क्षेत्रांत स्त्रियांनी मोलाची कामगिरी तर बजावली आहेच, पण या वेगवेगळ्या क्षेत्रांत कोणातरी एका स्त्रीने पहिले पाऊल टाकलेले आहे. पुढे त्याच्यांपासून प्रेरणा घेऊन अनेक जणी त्यांचा हा वारसा समर्थपणे चालवत आहेत. आज आपल्याला अशा अनेक क्षेत्रांची नावे घेता येतील की, ज्या क्षेत्रांत महाराष्ट्रातील, भारतातील महिलांनी आपल्या कार्याच्या जोरावर पहिलेपणाचा ठसा उमटवला आहे. त्यातल्याच काहींचा जागतिक महिला दिनानिमित्ताने दिलेला अल्प परिचय.

 

ताराबाई शिंदे : मराठीतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका

ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 साली बुलढाण्यातील शिंदे घराण्यात झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या ताराबाईंनी मराठी, इंग्रजी, संस्कृत या तिन्ही भाषा अवगत केल्या होत्या. ज्या काळात स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात ताराबाईंनी लेखनाच्या माध्यमातून पुरुषप्रधान व्यवस्थेविरोधात आवाज उठवला. स्त्री-पुरुष समान आहेत, ही भूमिका त्यांनी मांडली. पुरुषप्रधान संस्कृतीत पोथ्या, पुराणे यांच्याबरोबरच त्या काळातील साहित्याचा अभ्यास ताराबाईंनी केला. साहित्याविषयी प्रगल्भ जाणीव, प्रगल्भ विचारसरणी, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे भान त्यांनी आपल्या लेखनातून आक्रमक आणि आव्हानात्मक पद्धतीने मांडले. त्यासाठी ताराबाईंनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथाचे लेखन केले.

 

पंडिता रमाबाई : महाराष्ट्रात विधवांसाठी कार्य करणारी पहिली महिला.

पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ येथे झाला. त्यांना आई-वडिलांकडूनच शिक्षणाचे धडे मिळाले, तसेच वेद व पुराणे यांचा अभ्यासही केला होता. रमाबार्ईंनी ‘धर्म’ विषयात पारंगत व्हावे; याकरता त्या अनेक वर्षे अविवाहित राहिल्या. वडिलांबरोबर  गावोगावी फिरताना त्यांना आपल्या देशातील विधवा स्त्रियांचे हालाखीचे जीवन दिसून आले. विधवांना जगाव्या लागणार्‍या प्रतिकूल जीवनाचा बिमोड करण्यासाठी रमाबाईंनी पुण्यात ‘आर्य महिला समाजा’ची स्थापन केली आणि विधवा स्त्रियांची प्रगती साधायचा प्रयत्न केला. तत्कालीन समाजातील बालविवाह, केशवपन या अनिष्ट प्रथांनाही त्यांनी विरोध केला. दांडगा व्यासंग असणार्‍या रमाबाईंनी भारतामध्ये आणि भारताबाहेर स्त्रियांच्या प्रश्‍नांविषयी जनजागृती केली. या बरोबरीनेच त्यांनी अंध स्त्रियांसाठी शाळा काढली. पतित स्त्रियांची सोय करून त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य केले. पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी केलेले कार्य अमूल्य आहे, त्यांचा खडतर वारसा अनेकांनी जपला आहे.

 

आनंदीबाई जोशी : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

आनंदीबाईचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे झाला. सन 1874 मध्ये, वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आनंदीबाई यांचा गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला. आनंदीबाईंच्या जीवनाला शिक्षणाची दिशा देणारी व्यक्ती म्हणजे गोपाळराव जोशी, त्यांचे पती. ज्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे पाप समजले जाई, त्या काळात गोपाळरावांनी आनंदीबाईंना डॉक्टर करण्याचे ठरवले, त्यासाठी त्यांना अमेरिकेला पाठवले. असंख्य अडचणींचा तोंड देत आनंदीबाईही डॉक्टरकीचा अभ्यास करत राहिल्या. तेथे त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. एम.डी. पदवीसाठी आनंदीबाईंनी सादर केलेला शोधनिबंध त्या वर्षीचा सर्वांत प्रदीर्घ शोधनिबंध ठरला. 1886 साली एम.डी. पदवी मिळवून डॉ. आनंदीबाई भारतात परत आल्या. पण 1887 साली क्षयरोगाने आनंदीबाईंचा मृत्यू झाला. अल्पायुषी आनंदीबाईंना डॉक्टरकीची प्रॅक्टीस करता आली नाही. पण पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांनी स्त्री शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रम नोंदवला आहे.

 

डॉ. कमला सोहोनी : केब्रिंजमधून पीएच.डी. (डॉक्टरेट) मिळवणारी पहिली महिला.

सन 1911 मध्ये पंढरपूरच्या भागवत घराण्यात कमलाबाईंचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी.चे शिक्षण घेतले आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून एम.एस्सी. प्रथम श्रेणीत पूर्ण केले. पुढे पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी कमलाबाईंनी ब्रिटनला जाण्याचे ठरवले. अनेक शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. केंब्रिज विद्यापीठात तीन वर्षांत पूर्ण करायचा पीएच.डी.चा प्रबंध कमलाबाईंनी ङ्गक्त अठरा महिन्यांत पूर्ण केला. केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळवणार्‍या त्या भारतातीलच नाही, तर आशिया खंडातील पहिल्या महिला ठरल्या. वनस्पती पेशींमधल्या सायटोक्रोमशी संबंधित संशोधनपर प्रबंधाने त्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मान्यता मिळवून दिली. भारतातील लेडी हार्डिग्ज हॉस्पिटलमध्ये जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख, कन्नूरच्या आहार प्रयोगशाळेच्या उपप्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कमलाबाईंनी काम केले. मुंबईमधील विज्ञान संस्थेच्या पहिल्या महिला संचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. कमलाबाईंनी ‘नीरा’ या पेयावर वैज्ञानिक संशोधन केले. या संशोधनासाठी सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. औषधनिर्मिती आणि जीवनसत्त्वांच्या क्षेत्रात कमलाबाईंनी केलेले संशोधन कार्य पुढील पिढीसाठी मोलाचे ठरले आहे.

 

आरती प्रधान : जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

ठाणे शहरात 1 ऑगस्ट 1972 रोजी आरती प्रधान यांचा जन्म झाला. आरती यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच जलतरणाला सुरुवात केली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी इंग्लिश खाडी पार करण्याचा विक्रम केला. इंग्लंड ते फ्रान्स असे तेहतीस किलोमीटर अंतर त्यांनी 12 तास 28 मिनिटांत पार केले. हे अंतर पार करणार्‍या त्या आशिया खंडातील सर्वांत लहान जलतरणपटू ठरल्या होत्या. गिनिज बुक ऑङ्ग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आरती प्रधान यांच्या या कामगिरीची नोंद करण्यात आली. इंग्लिश खाडीची मोहीम यशस्वी केल्यानंतर त्यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करण्याचे ठरवले. सतत बदलणारे हवामान, वादळी वारे, उसळत्या लाटा, शार्क व डॉल्फीन माशांचे साम्राज्य यांमुळे जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करणे हे प्रत्येक जलतरणपटूसाठी एक आव्हान असते, आरती यांनी हे आव्हान स्वीकारले. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर 7 तास 17 मिनिटे इतक्या कालावधीत आरती यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार केली. अशी कामगिरी करणार्‍या त्या जगातल्या सर्वांत लहान आणि भारतातील पहिल्या महिला जलतरणपटू ठरल्या.आरती प्रधान यांना साहसी कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, ग्रॅमी थॉम्पसन करंडक देऊन गौरवले आहे.

 

शीतल महाजन : दोन्ही ध्रुवांवर पॅराजंपिंग करणारी पाहिली भारतीय महिला

पुण्याच्या शीतल महाजन यांना लहानपणापासून काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. शीतल यांनी आपली जिद्द आणि धाडस यांच्या जोरावर पॅराजंपिंग क्षेत्रात आपल्या देशाची मान उंचावली. पॅराजंपिंगचा कोणताही पूर्वानुभव नसताना शीतल यांनी दोन्ही धु्रवांवर पॅराजंपिंग करण्याचे साहस दाखवले. स्वत: चा जीव धोक्यात घालून त्यांनी पॅराजंपिंग क्षेत्रात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. शीतल यांनी उत्तर धु्रवावर पॅराशूटमधून जंप घेतली, तर दक्षिण धु्रवावर त्यांनी ‘अ‍ॅक्सिलरेटेड फ्री फॉल’ अशी जंप घेतली. उत्तर धु्रवावर पराजंपिंग करण्याचे ठरवले, तेव्हा शीतल यांनी आग्रा येथील पॅराट्रुपर्स ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उत्तर धु्रवावर यशस्वी जंप घेतली. पण तिथेच न थांबता शीतल यांनी दक्षिण धु्रवावर जंप घेण्याचा निश्‍चय केला. 15 डिसेंबर 2006 रोजी त्यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम यशस्वीपणे पार केली. त्यांच्या या धाडसी कामगिरीसाठी केंद्र सरकारने त्यांना ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा’ने गौरवले.

संकलन – रेश्मा बाठे

[email protected]