ज्या काळात स्त्रियांनी गाणं बजावणं करणं तर दूरच, पण समाजात नुसतं मोकळेपणानं वावरणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं, अशा काळात संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, अखंड मेहनतीनं आपली कला जोपासून, "जाहीरपणे गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या पहिल्या स्त्री कलाकार" म्हणून गानहिरा हिराबाई बडोदेकरांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्याचप्रमाणे मराठी संगीत रंगभूमीवरही आपल्या रसपूर्ण गायकीनं आणि शालीनतेनं भूमिका यशस्वी करून, हिराबाईंनी स्त्रियांपुढे एक आदर्श ठेवला, हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी विशेष योगदान म्हणता येईल. आपल्या पुढील पिढ्यांतील स्त्री कलाकारांसाठी त्यांनी एक नवीन दालन खुलं केलं. आपल्या कुलीन - शालीन वर्तणुकीनं, संगीत क्षेत्रातील स्त्री कलाकारांकडे आदरानं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तयार केला. आज संगीत क्षेत्रात स्त्री कलाकारांना मिळणारा मान-सन्मान पाहताना हिराबाईंच्या या कार्याचं महत्त्व जाणवतं.

हिराबाईंचा जन्म १९०५ सालचा. बाईंचं भाग्य असं की, किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब हे त्यांचे वडील आणि बडोदा संस्थानचे सरदार मारुतीराव माने यांची मुलगी ताराबाई या त्यांच्या आई. उस्ताद अब्दुल करीम खाँ हे बडोदा संस्थानात दरबार गायक होते आणि ताराबाई या त्यांच्या शिष्या. हिराबाईंचं नाव चंपाकली. त्यांना सुरेशबाबू आणि कृष्णराव हे दोघे बंधू आणि गुलाब आणि सकीना या दोन भगिनी, ज्या पुढे कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्ध झाल्या.

हिराबाईंचं संगीताचं शिक्षण सुरुवातीला बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे झालं. त्यांना वडिलांचा सहवास कमी लाभला. नंतर उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. हिराबाईंना निसर्गदत्त सुरेल धारदार आवाज लाभला होता. आईच्या प्रोत्साहनाने त्यांनी अभिजात संगीताचं शिक्षण आणि त्यावरील मेहनत मोठ्या निष्ठेने केली. किराणा घराण्याची शांत व रसपूर्ण आलापी आणि दाणेदार खणखणीत ताना यांनी त्यांची अप्रतिम मधुर गायनशैली आकारास आली. ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यसंगीत या विविध गीतप्रकारांवर त्यांनी हुकमत मिळवली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, स्त्रियांचा समाजातील वावर सुद्धा मोकळेपणानं नसायचा. खूप सामाजिक बंधनं असायची. चांगल्या घरांतल्या कुलीन स्त्रियांचं गाणं हे चार भिंतीतच दाबलं जायचं. अशा काळात गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी समाजात संगीताला आणि स्त्रियांच्या संगीत शिक्षणाला हळुहळू मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचा परिणाम म्हणून, हिराबाईंनी १९२२ साली संगीताच्या व्यासपीठावर पदार्पण केलं. वयाच्या १७व्या वर्षी, त्यांनी गायनाची पहिली जाहीर मैफल (त्याकाळी त्याला जलसा म्हणत) केली आणि तिकिट लावून जाहीर मैफल करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार ठरल्या. त्यांची सडपातळ सावळी मूर्ती, पांढरी जरीकाठी साडी, हाती तंबोरा हे रूप मोठं लोभस दिसायचं. आपल्या कलेवर आत्यंतिक निष्ठा ठेवून, शालीनतेनं त्या आपली कला सादर करायच्या. हळूहळू त्यांचं गायन रसिकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलं. आपल्या मैफलीत ख्याल-गायनाबरोबरच विविध गीतप्रकार त्या सादर करायच्या. तार सप्तकांतील "सां" परिणामकारकरित्या आणि आनंददायी लावणं, हे त्यांच्या गायनातील मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. रसिकांची तुडुंब गर्दी त्यांच्या कार्यक्रमाला होऊ लागली. आपल्या सुमधूर गायनानं त्यांनी किराणा घराण्यालाही लोकप्रिय केलं.  १९२२ ते १९८० ही साठ वर्षं त्यांनी अनेक मैफली गाजवल्या. जाणते कलाकार आणि रसिक श्रोते या दोघांकडूनही (class & mass ) त्यांना उदंड दाद मिळाली.

आपली बहीण सरस्वतीबाई राणे यांच्याबरोबर जुगलबंदीचेही कार्यक्रम त्या करत असत.हिराबाईंचं संगीत क्षेत्रात आणखी मोलाचं योगदान म्हणजे, मराठी संगीत रंगभूमीवर ज्या काळी गायक-नटच स्त्री भूमिका करत असत आणि तोपर्यंत कोणाही स्त्री कलाकारानं रंगभूमीवर पाऊल ठेवण्याचं धाडस केलं नव्हतं, त्या वेळी हिराबाईंनी, प्रतिष्ठितपणे आणि तितक्याच शालीनतेनं मराठी संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं. तिथेही आपल्या सभ्य आचारांनी, रसपूर्ण मधुर गायकीनं नाटकांतील भूमिका यशस्वी करून स्त्रियांपुढे एक आदर्श ठेवला. त्यांनी सुवर्ण मंदीर, प्रतिभा, जनाबाई, म्युनसिपालिटी अशा नाटकांतून भूमिका केल्या. बालगंधर्वांचा आदर्श ठेवत, सौभद्र, मानापमान सारख्या नाटकांतून त्यांनी केलेल्या नायिकेच्या भूमिका गाजल्या. त्यामुळेच ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘पांडु नृपती जनक जया’, ‘नरवर कृष्णासमान’, ‘सुरसुखखनी तूं विमला’ या नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. शास्त्रीय गायनामध्ये, ‘जा रे भंवरा दूर’ (शुद्ध सारंग), ‘सखी मोरी रूमझूम’ (दुर्गा), ‘अधिर मन बांवरे’ (पटदीप), ‘भजनांमध्ये गिरीधर गोपाला’, ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ या रेकॉर्ड्स लोकप्रिय होत्या. सुरुवातीच्या काळातली, ‘उपवनी गात कोकिळा’ ही रेकॉर्ड लोकप्रिय झाली होती.

७८ rpm च्या रेकॉर्डच्या जमान्यात त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या, भजनांच्या, नाट्यगीतांच्या अनेक रेकॉर्डिंग निघाल्या आणि पुढे कॅसेट्सच्या रूपातही ती रेकॉर्डिंग्ज पुन्हा प्रकाशित झाली.

"गानहिरा" ही पदवी त्यांना रसिकांनी दिली, तर सरोजिनी नायडूंनी त्यांना "गानकोकिळा" ही पदवी दिली होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी, दिल्लीला लाल किल्ल्यावरून झालेल्या समारंभात, 'वन्दे मातरम्' गाण्यासाठी हिराबाईंना खास बोलावण्यात आलं होतं. १९५३ साली चीन आणि अफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्ठमंडळात त्यांचा समावेश होता. 

१९६५ साली हिराबाईंना ‘संगीत नाटक अकादमी अॅवार्ड’ आणि १९७० साली ‘पद्म भूषण’ किताब देऊन गौरविण्यात आलं. विष्णुदास भावे पारितोषिकानं, त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यात आला.

संगीत क्षेत्रात स्वत:ला मिळालेल्या उदंड यशानंतर, 'नवीन स्त्री कलाकार शिष्यांना' घडवायलाही त्या विसरल्या नाहीत. मुलींना संगीत शिक्षण देण्यासाठी, "नूतन संगीत विद्यालयाची" त्यांनी स्थापना केली. विद्यादानाचं पवित्र कार्य करून अनेक शिष्या घडविल्या. प्रभाताई अत्रे या त्यांच्या आणि सुरेशबाबू मानेंच्या शिष्या होत्या.

१९८० साली त्या आपल्याला सोडून गेल्या. अखेरपर्यंत त्या गात होत्या, हे विशेष!

संगीत विश्वात गानहिरा हिराबाई बडोदेकरांचं नांव अजरामर राहील. त्यांना सादर प्रणाम !!!

- मधुवंती पेठे

[email protected]