गुलमोहर

दिंनाक: 07 Mar 2018 15:46:05


अति वेगाने वाढणारा, अनेक लोकप्रिय वृक्षांपैकी हा पानगळी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव - डिलॉनिक्स रेजिया आणि याचे कुल (गोत्र) लेग्युमिनोसी हा मुळचा मादागास्करमधला. पुढे तो मॉरीशसमध्ये आणला गेला. इंग्रजीत त्याला पीकॉक फ्लॉवर म्हणतात. याची उंची १५ सें.मी.पर्यंत असते. पसरणाऱ्या व छत्राकार फांद्या तर याची फिकट पाने पाखराच्या पिसासारखी द्विदल, संयुक्त मोठी असतात.

भर उन्हाळ्यात लाल-शेंदरी फुलांनी फुललेला गुलमोहर उन्हाची काहिली विसरायला लावतो. मोठ्या लांब पानांवर  १०-२०  फिकट दलांच्या  जोड्या असतात. थंडीत पानगळ होते तर वसंत ऋतूत (मे-जून) याला नवी पल्लवी येते. फांद्यांच्या टोकास मोठ्या आकाराची गुच्च्छ फुले शेंदरी किंवा फिकट नारंगी रंगांच्या दिमाखात उमलू लागतात. प्रत्येकात चार मोठ्या पाकळ्या व एक अधिक मोठी पाकळी असते. कळ्या गोबऱ्या असतात. त्या मोठ्या पाकळीवर पिवळ्या लाल रंगाचे मिश्रण दिसते. पक्ष्यांमार्फत परागण होते. याची साल काहीशी खडबडीत, राखाडी तपकिरी असते.

फुलांचा हंगाम संपताच याच्या बारा चौदा इंच लांब चपट्या कोवळ्य शेंगा लगेच काळ्या, तपकिरी, टणक, होऊन जातात. शेंग हलवली की खुळखुळ असा आवाज होतो. ह्या शेंगा झाडावर बऱ्याच काळापर्यंत लोंबकळत राहतात. त्यावर ठिपक्यांची आडवी नक्षी असते. बिया लांबट व मिश्ररंगी असतात. नवीन लागवड बी पेरून किंवा कलम रोवून लावातात. बी टनक असल्याने लावण्यापूर्वी गरम पाण्यात ती घालतात. लहान रोपे गवताच्या ताट्यांनी झाकावी. हवामानाचा फेरफार पेलण्याची ताकद त्यांच्यात आल्याशिवाय त्यांच्यावरचा मांडव काढू नये. 

२०० वर्षापासून आपल्या जीवनात कला साहित्यात त्याची मुळं तो मादागास्करचा असूनही खोलवर गेलेली आहेत. याचे लाकूड हलके व पांढरे असते. हा वृक्ष मुख्यत: शोभेसाठी व सवलतीसाठी लावला जातो. गुलमोहरात आणखी दोन प्रकार- निळा व पांढरा गुलमोहर. निळ्या गुलमोहराला जकारंदा म्हणतात. त्याचे कुल बिग्नोनिएसी. १२-१५ मीटर उंचीचा लहान पानझडी शोभिवंत वृक्ष ब्राझिलचा पाने नेच्यासारखी जोड दले. फुले येण्यापूर्वी बरेचदा याची पाने गळतात. पाने एकाआड एक, संयुक्त पिसासारखी, ती लाजाळू सारखी म्हणून मायमोसी. त्याचा विस्तार देहरादून लखनौ, चंडीगड आहे. फुले फांद्यांच्या टोकास निळ्या बैंगणी रंगाची मार्च-मे मध्ये येतात. त्यांचा निळा रंग उन्हाळ्याच्या प्रारंभी अत्यंत सुखकर वाटतो. याचे फळ म्हणजे तबकडी सारखी पोपडे असलेली टणक शेंग आत अनेक पातळ बिया.

पार्क, बागातून सुंदर पालवी, फुले, सुखकर सावलीमुळे लावण्यास उपयुक्त वृक्ष. म्हणूनच दक्षिण फ्लोरिडा येथे जुन्या व लवकर फुले देणाऱ्या जकारंदाची झाडे लावतात. तो वाढतो झपाट्याने पण पाच वर्षानंतर फुले देत देत वीसवर्षानंतर मात्र बेढब बनतो. असा हा अल्पायुषी. छातीच्या दुखण्यावर पानांचा काढा तर चूर्ण जखमेवर लावतात व सालींचा काढा जखमा धुवायला वापरतात. लाकूड मध्यम, टणक, जड सुंदर पोताचे असते. ते हत्यारांचे मुठी व दांडे करण्यास उत्तम. भारतात लाखेचे किडे पोसण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे.

या वृक्षाच्या पांढरा गुलमोहर हा एक प्रकार आहे. त्याला पाइनकारा एलाटा म्हणतात. मराठीत याला संदेसरा म्हणतात. हा एक लहान ठुबारा माथा छ्त्राकार असणारा वृक्ष. एकाकडे तो फेब्रु-मार्च मध्ये पांढरक्या पिंगट, जर्द पिवळ्या फुलांनी डवरलेला दिसतो तर दुसरीकडे पाखराने पसरलेल्या पंखाप्रमाणे हिरवीगर्द लखलखीत पर्णराजी त्याची शोभा वाढवतो. मध्य प्रदेश, हैद्राबाद, सौराष्ट्र मध्ये हा सर्वत्र वाढलेला दिसतो.

अरब लोकांनी अॅबिसिनियामधून हा वृक्ष भारतात आणला.

- मीनल पटवर्धन

 [email protected]