‘‘अरे चिनू, बाहेर बघ तुझे सगळे मित्र-मैत्रिणी रंगपंचमी खेळायला आलेत, तुला बोलवतायेत आणि तू अजून तयारपण नाही झालास?’’, चिनूची आई त्याला बोलत होती आणि चिनू हातातल्या मोबाईलवर गेम खेळण्यात रमून गेला होता.  ‘‘हम्म्...’’  चिनूने एवढेच उत्तर दिले आणि तो पुन्हा मोबाईलमध्ये गढून गेला. तो रंगपंचमीचा दिवस होता. आदल्या रात्री आई-बाबांबरोबर मस्त होळी पेटवल्यानंतर बिल्डींगमधली सगळी बच्चेकंपनी नुसती आरोडाओरड करत होळी एन्जॉय करत होती. आकाश, राजेश, जय, नेहा, अवी, लकी, चिन्मय (चिनू), लेखा, मिलिंद, राजसी, रोहन; गॅलेक्सी सोसायटीमध्ये असणारी ही सगळी साधारण तुमच्याच वयाची; चौथी-पाचवीला असलेली बच्चेकंपनी, एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स. कुठलाही सण असला की, हे सगळे मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटायचे आणि मोठ्या उत्साहात तो सण साजरा करायचे. गुढी पाडव्याला प्रभातफेरी काढायचे, तर दिवाळीमध्ये नवीन कपडे घालून आई-बाबांबरोबर देवळात जाऊन यायचे आणि फटाके उडवायचे. पण सगळ्यात मज्जा यायची ती रंगपंचमीला. आई-बाबा नको नको म्हणत असतानासुद्धा ही सगळी बच्चेकंपनी एकत्र जमायची आणि एकमेकांना रंग लावायची. तोंडावर, कपड्यांना तर रंग लागायचाच; पण सोसायटीच्या जिन्यावर, भिंतींवर; इतकेच काय पण पार्क केलेल्या कार्सपण विविध रंगांनी रंगून जायच्या. मग रंग खेळून झाले की, एकत्र बसून जोशीआजींनी दिलेल्या मस्त गरम पुरणपोळीवर ताव मारायचा आणि मग प्रत्येकाने घरी जायचे, हा त्यांचा दर वर्षीचा ठरलेला कार्यक्रम. या वर्षीही तशीच मज्जा चालली होती, फक्त चिनू त्यांच्यामध्ये नव्हता, कारण चिनू बाबांच्या मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी होता.

चिनू म्हणजे चिन्मय काशीकर. तसा एकदम हुशार मुलगा, शाळेमध्येही पहिला-दुसरा नंबर पटकावणारा, आई-बाबांचा लाडका आणि मित्र- मैत्रिणींमध्ये पॉप्युलर असणारा; पण हल्ली त्याला एक नवीनच आवड निर्माण झाली होती, जी त्याच्या मित्रांना आणि आई-बाबांनाही त्रासदायक वाटत होती. ही आवड होती त्याच्या बाबांनी नवीन आणलेल्या मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळत बसणे. त्यामुळे शाळेतून आल्यावर जेव्हा सगळे त्याला खेळायला बोलवत असत, तेव्हा तो ‘हो, हो आलोच’ म्हणत चक्क बाबांच्या मोबाईलवर खेळ खेळत असे. 5-6 दिवस झाल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला खेळायला बोलवणे सोडून दिले, तरीही चिनूच्या ते लक्षात आले नाही. कारण आता मोबाईल फोन हा त्याचा सगळ्यात लाडका मित्र बनला होता. आई-बाबांनी ओरडून झाल्यावरही चिनूने आपले मोबाईलवर खेळणे सुरूच ठेवले होते.

आज रंगपंचमीच्या दिवशी शाळेला सुट्टी होती, म्हणून सकाळपासूनच चिनू मोबाईलवर खेळत होता. दोन वेळा त्याचे मित्र त्याला ‘रंग खेळायला चल ना!’ म्हणून येऊन बोलावून गेले होते. पण चिनू ‘येतो.. येतो..’ म्हणून गेलाच नव्हता. त्यादिवशी त्यांच्या सोसायटीमध्ये ‘आज की खबर’ न्यूज चॅनलवाले आले होते. त्यांच्या सोसायटीमधील एकता आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे या वर्षी त्यांच्याकडे शुटिंग करायला हे न्यूज चॅनलवाले आले होते. सगळ्या मुलांचे रंगपंचमी खेळताना शुटिंग सुरू झाले आणि लाईव्ह शुटिंगमुळे सगळी मुले लोकल टिव्ही चॅनलवर दिसायला लागली. त्यांच्यामध्ये नव्हता तो फक्त चिनू. सगळ्या मुलांनी शुटिंगच्या वेळी मनसोक्त धम्माल केली. चॅनलवाल्यांनी बच्चे कंपनीला मस्त टी शर्ट्स आणि कॅप्स दिल्या आणि शिवाय प्रत्येकाला मस्त खाऊची पॅकेट्सही दिली. थोडक्यात, या वेळची रंगपंचमी मुलांसाठी एकदम अविस्मरणीय ठरली होती. संध्याकाळी जेव्हा चिनू सगळ्या मुलांना भेटायला बाहेर आला, तेव्हा त्याला ही सगळी मजा-मस्ती समजली आणि तो अक्षरश: रडवेला झाला. ‘‘मी का नाही दिसलो टीव्हीवर? मलाही तुमच्यासारखी कॅप आणि टी शर्ट हवा होता.’, चिनूने रडतरडतच मित्रांना सांगितले, तेव्हा तिथे जोशीआजी आल्या आणि त्याला म्हणाल्या, ‘‘चिनू एखाद्या गोष्टीचा अतिरेक वाईटच बाळा, मोबाईलवर  थोडा वेळ खेळणे चुकीचे नाही, पण सणावाराला मित्र बोलवत असताना असे मोबाईलवर खेळणे चुकीचे होते.’’ चिनूला त्याची चूक कळत होती. डोळे पुसत त्याने जोशीआजींना वचन दिले की, ‘आता मोबाईलवर खेळणं बंद आणि सगळ्या मित्रांना नक्की वेळ देईन.’ चिनूला मिळालेली ही शिक्षा त्याला खूप काही शिकवून गेली.

- स्मृती आंबेरकर

[email protected]