निवेदक : महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणजे कोकणभूमी! निळा सागर, तांबडी माती आणि हिरवी साडी या त्रिवेणी संगमावरची सौंदर्यभूमी!

पण...पण समुद्राच्या पलीकडून आक्रमकांच्या स्वार्‍या झाल्या. हजारो स्त्री-पुरुष गुलाम म्हणून पळवले गेले. इथली गावं, शेतं, मंदिर आणि निसर्ग शत्रूच्या पाखाखाली तुडवला जाऊ लागला.

कोकणच्या भूमीचं हे दु:ख ओळखलं शिवाजी राजांनी! राजांनी हा मुलुख आपल्या कब्जात आणला. शिवशाहीचा हा त्रिशूल परशुरामभूमीत तळपू लागला.

राजांची गरूड नजर पडली. पोर्तुगीज अंमलाखालील गोव्यावर... फिरंगी सत्तांच्या टाचांखाली चिरडल्या जाणार्‍या, या गोमांतक भूमीत राजे दाखल झाले.

(राजे आणि प्रतापराव गुजर बोलत आहेत.)

राजे शिवाजी : व्वा! प्रतापराव, केवढा सुंदर हा प्रदेश... जणू निसर्ग देवतेचं मंगल मंदिर! पण राव! तुम्ही आम्हाला एक शिवमंदिर दाखवणार होतात ना?

प्रतापराव : होय महाराज, तिकडेच आलोय आपण... हे या शिवमंदिराचे पुजारी.

(पुजारी येतात)

राजे शिवाजी : प्रणाम गुरुजी, आम्हाला देवालयात दर्शनाला यायचे होते.

पुजारी : कसलं देवालय राजे! सारं नष्ट झालं. ते पाहा त्या कोनाड्यात पडलेलं शिवलिंग. सप्तधातूचं शिवलिंग!

राजे शिवाजी : अप्रतिम! सुंदर!... पण याची अशी अवस्था?

पुजारी : काय सांगू राजे याची करुण कहाणी. इथे फार फार वर्षापूर्वी कदंब राजाचं राज्य होतं. हे सप्तकोटेश्वराचं भव्य मंदिर म्हणजे त्याचं कुलदैवत. पण पुढे बहामनी सुलतानांच्या धाडीत मंदिर उद्ध्वस्त झालं. विजयनगरच्या सम्राटांनी याची मुक्तता केली खरी; पण मग पोर्तुगीजांनी येथे सत्ता स्थापन केली. त्यांनी हे शिवलिंग विहिरीवर अशा ठिकाणी बसवलं की, जो कोणी विहिरीचं पाणी काढेल त्याला शिवपिंडीवर पाय दिल्यावरच पाणी काढता येईल.

प्रतापराव : हर हर! काय ऐकतोय हे!

पुजारी : शेवटी कोकणच्या देसायांनी याला इथं कोनाड्यात बसवलं. तेव्हापासून हा महादेव असा वनवास भोगतोय.

राजे शिवाजी : प्रतापराव, शौर्य तर आमच्याकडेही होतं. पण आम्ही कधी परकीयांच्या देशात घुसून इतरांची प्रार्थना मंदिर उद्ध्वस्त करण्यात आनंद मानला नाही. आम्ही सर्व धर्मांचा नेहमीच आदर केला. पण...आमच्याच देशात आमच्याच देवाची विटंबना! का?

प्रतापराव : असं झालंय खरं! पण महाराज, आता काय करणार? झालं गेलं होऊन गेलं.

राजे शिवाजी : नाही सरनोबत! आम्हीही देवतांची विटंबना सहन करणार नाही. अन्य धर्मियांनी त्यांची मंदिर बांधली तर आम्ही जरूर त्याचा मान ठेवू, पण जर कोणी आम्हा हिंदूच्या श्रद्धा स्थानांचा अपमान करत असेल तर ते नामंजूर!

प्रतापराव, आम्ही या सप्तकोटेश्वराचं भव्य मंदिर पुन्हा बांधणार आहोत.

प्रतापराव : जशी आज्ञा महाराज! मी आजच हे शिवलिंग रायगडला नेण्याची व्यवस्था करतो.

राजे शिवाजी : नाही! प्रतापराव! हे मंदिर इथचं बांधायचं. इथं या गोव्यात!

प्रतापराव : पण... महाराज गोवा आपल्या ताब्यात नाही. आपण वळताच हे पोर्तुगीज पुन्हा त्याची विटंबना...

राजे शिवाजी : नाही... हे होणे नाही. पूर्वी याची विटंबना झाली कारण याचे भक्त दुबळे होते. बेसावध होते. आता ऐसे पुन्हा होणे नाही. या नावे गावात भव्य शिवमंदिर बांधा आणि सांगा त्या पोर्तुगीजांना की, हे शिवाजी राजानं बांधलेलं मंदिर आहे. पुन्हा याची विटंबना करण्याचा प्रयत्न जरी केला तर माझी भवानी तलवार तुमची मुंडकी उडवल्याशिवाय राहणार नाही.

हे सप्तकोटेश्वराचं मंदिर आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक ठरेल.

निवेदक : ... आणि बघता बघता त्या स्थानी उभे राहिले एक विशाल राऊळ... सप्तकोटेश्वराचे! त्याच्या शिरोभागी शोभत होता शिवाजी राजांच्या नावाचा शिलालेख.

हिरव्या गर्द वनराईतील ते जांभ्या पाषाणाचे शिवमंदिर पाचूच्या कोंदणातील पोवळ्याप्रमाणे शोभत होते. या देशी मंदिरांची कमतरता तर कधीच नव्हती. पण सप्तकोटेश्वर म्हणजे जणू अपमानाचा कलंक पुसून उमटलेला स्वाभिमानाचा हुंकार!

आक्रमकांनी केलेल्या जखमा बुजवण्यासाठी नको औषधे! नको मलमपट्टी! त्यासाठी हवा असतो ‘पराक्रम!’ आणि पराक्रमाचचं दुसर नाव होतं, ‘छत्रपती शिवराय!’

- मोहन शेटे

[email protected]