लहान मुलांना सुरुवातीपासूनच अक्षरांचे योग्य वळण समजले तर ते अंक व अक्षर सुंदर आणि योग्य पद्धतीने काढू शकतील; यासाठी शिक्षक फळ्याच्या साहाय्याने पाटीवर अक्षरे, अंक काढून घेतात. ते ज्या क्रमाने अक्षरे, अंक पूर्ण करतात, ते बारकाईने पाहून त्यात दुरुस्ती करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अक्षरे व अंक लिहिण्याचा सराव आपल्याला घेता येतो.

उदाहरणार्थ :

 1. जमिनीवर अंक व अक्षरे लिहिणे - वर्गात मोठ्या आकारात तैलरंगात (ऑईलपेंट) ही अक्षरे व अंक लिहावेत.
 2. या अक्षरांवर व अंकांवर योग्य क्रमाने बोटाने गिरवणे.
 3. या अक्षरांवर व अंकांवर चिंचोके, बिया, डाळी योग्य क्रमाने लावणे.
 4. या अक्षरांवर व अंकांवर सुतळी, जाड दोरा फिरवणे.
 5. बोटाने अंक, अक्षरे गिरवणे.
 6. रेती पाटीवर किंवा रांगोळी पाटीवर अंक अक्षरे काढणे.
 7. हवेत बोटाने अंक व अक्षरे गिरवणे.
 8. अंक, अक्षरे ओळखून वाचणे, खडूने-पेन्सिलने गिरवणे.
 9. मित्राच्या पाठीवर बोटाने अंक व अक्षरे काढणे व ते ओळखण्यास सांगणे.
 10. अंक व वस्तू यांची सांगड घालणे किंवा चित्रे, वस्तू मोजून अंक लिहिणे.
 11. चित्र पाहून त्याच्या नावाचे पहिले अक्षर ओळखून लिहिणे.
 12. एकक ते अब्ज संख्या बोटावर मोजता येणे. टप्याटप्प्याने करंगळीपासून सुरुवात करणे.

या व अशा इतर प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांचे अक्षरलेखन व अंक लेखन चांगले होते. वळणदार अंक व अक्षरे विद्यार्थी काढतात. स्वत: कृती करत असल्यामुळे आनंददायी शिक्षणाचा लाभ होतो. चुरशीने सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. मधल्या सुट्टीत फावल्या वेळेतही विद्यार्थी हा प्रयोग आनंदाने करतात. अभ्यासाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होते. गटागटानेही हे उपक्रम विद्यार्थी करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना आपले ज्ञान देण्यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात. त्यासाठी या व अशा इतर सुविधा पुरवतात. शिक्षकांकडून अथवा पालकांकडून यांत्रिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी स्वत: ज्ञानरचना करतात, त्यामुळे ते कायमस्वरूपी स्मरणात राहते.

- कल्पना आगवणे 

[email protected]