नेटभेट-भाग २

दिंनाक: 30 Mar 2018 14:55:56


संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, नवी भाषा शिकण्याबाबतची उत्सुकता व क्षमता मुलांमध्ये अधिक असते.

पूर्वी विशिष्ट भाषा शिकण्यासाठी गुरूची प्रत्यक्ष शिकवणी व पुस्तके यांची गरज असे, पण आज जगभरातील नागरी भागातील लहान मुले संगणकाशी व इंटरनेटशी फार लवकर मैत्री करतात. त्यामुळे एखादी भाषा शिकणे, घरबसल्या शब्दकोश समजून घेणे, इतकंच काय, पण त्या भाषेतील शब्द-उच्चार ऐकणे हे आता सोपे झाले आहे.

‘भाषा’ या विषयाशी संबंधित हजारो उत्तम वेबसाईट्स आज वेबवर उपलब्ध आहेत. एखादी भाषा समजली, तर ती भाषा बोलणाऱ्या समुहाच्या लोकजीवनाचा व समाजशैलीचा परिचय करून घेणे सोपे जाते.

‘इंग्रजी’ भाषा तुम्हाला येत असेल, तर स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, जर्मन किंवा पोर्तुगीज भाषा शिकणे काही तुम्हाला फार अवघड वाटणार नाही. www.duolingo.com या वेबसाईवर ही सुविधा विनामूल्य आहे.

‘जपानी भाषा’ शिकावी असे अनेक मुलांच्या मनात येते. जपानी संस्कृती, जीवनपद्धती, जपानी भाषा इत्यादींविषयी जाणून घ्यायचे असेल तर web-japan.org या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मातृभाषेशिवाय आपण अन्य भाषा का शिकावी? कोणती भाषा शिकावी? ती सोप्या पद्धतीने कशी शिकावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची  असतील तर www.bbc.co.uk/languages येथे शोध घ्या.

मराठी बोलू शकत नाहीत, अशा मित्रांना चिडवण्याऐवजी किंवा धाक देण्याऐवजी त्यांना घरबसल्या मराठी शिकता येईल, अशी एखादी वेबसाईट तुम्ही सुचवलीत तर? www.mindurmarathi.com या वेबसाईटच्या मदतीने कोणीही सहजपणे मराठी भाषा शिकू, वाचू व बोलू शकतो.

एखादा मराठी शब्द अन्य भाषेत भाषांतरित करून हवा असेल किंवा एखाद्या इंग्रजी शब्दाला समांतर मराठी शब्द कोणता हे जाणून घ्यायचे असेल तर www.khandbahale.com या वेबसाईटची नियमित मदत घ्या.

‘मराठी’ ही भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून आहे. महाराष्ट्री-प्राकृत भाषेच्या अपभ्रंशातून ती तयार झाली. प्रमाण मराठी भाषेची अनेक बोलीरूपे आहेत. उदा. कोकणी, खानदेशी, वऱ्हाडी इत्यादी. दर १२ मैलांवर भाषा बदलत जाते, त्यानुसार उच्चारही बदलतात.

महाराष्ट्राच्या सीमेपलीकडील लोक म्हणजे गुजराथी, मध्य प्रदेश व कर्नाटकातील काही लोक, तसेच गोव्यातील असंख्य जनता मराठी भाषेचा सर्रास वापर करते.

२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस दर वर्षी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी अधिक माहिती Google वरून मिळवा. इंग्रजी शब्दार्थांसाठी www.shabdkosh.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच जर तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर त्यावर Arcus Dictionary हे अॅप जरूर डाऊनलोड करा.

 लहान वयोगटातील मुलांना इंटरनेटवर मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहता यावेत यासाठी काही संकेतस्थळांची माहिती वाचा खालील लिंकवर 

नेटभेट - भाग १

- विवेक मेहेत्रे

[email protected]