सांग ना स्नेहलताई......

सगळ्या मुलांनी एकच गलका केला.

"अरे, हो हो....काय बरं करायला सांगू या अथर्वला..? हं... अथर्व, तू एक छानसा जोक सांग बघू.." स्नेहलताई म्हणाली. 

आज ताईने 'पासिंग द बाॅल ' गेम सुरू केला होता. ताई एका ताटलीवर चमच्याने टण् टण् वाजवत होती आणि गोलाकार बसलेली मुलंमुली एकाकडून पुढच्याकडे बाॅल पास करत होती. अचानक ताई ताटली वाजवणं थांबवायची, अन् त्याच वेळी ज्याच्या हातात बाॅल असेल त्याला काहीतरी मजेशीर पनिशमेंट द्यायची. त्याला जरी पनिशमेंट म्हणजे शिक्षा देणं असं नांव असलं तरी सर्वांना त्या गोष्टी करण्यात आणि पाहण्यात मजाच येत होती. कोणी लंगडी घालून दाखवली, तर कोणी नाच केला, कोणी गाणं म्हंटलं, कोणी झाशीच्या राणीची नक्कल केली, कोणी उठाबशा काढल्या, कोणी एक ते दहा आकडे उलट्या क्रमानं म्हंटले. आता अथर्वची पाळी होती. अथर्वने जोक सांगायला सुरुवात केली. सगळे कसे रंगून गेले. पण सलोनीला जेव्हा गाणं म्हणण्याची पनिशमेंट दिली, तेव्हा मात्र तिला ती खरोखरीच शिक्षा वाटली.

 "नको ग ताई, मी कधीच गाणं म्हंटलं नाही.... मला फक्त ऐकायला आवडतं." सलोनी म्हणाली.

"अगं, त्यांत काय एवढं.." ताई तिला समजावत म्हणाली. "ही काही परीक्षा नाही की स्पर्धा नाही. या खेळाचा उद्देशच मुळी हा आहे. आपण जे कधीच केलं नाही, ते करून पाहायचं. जमलं तर जमलं नाहीतर सोडून द्यायचं. या रडूबाई वेदाला झाशीच्या राणीसारखं बोलताना ऐकलं होतं का कधी?" सगळे खुदूखुदू हसले. सगळा धीर एकवटून सलोनीनं कापऱ्या आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली.... 

"ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली ।

 वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली...."

सगळ्यांनी टाळ्यांचा ठेका धरत तिला साथ द्यायला सुरुवात केली. सलोनीनं गाणं संपवताच सर्वांनी तिचं कौतुक केलं. सलोनीनं भरल्या डोळ्यांनी ताईकडे पाहिलं. ताईने तिला प्रेमानं जवळ घेतलं. "बघा आमच्या या कासवानं देखील पैज जिंकली की नाही."सलोनी खुदकन हसली.

"त्या गोष्टीतलं कासव का जिंकलं...? माहिती आहे का? त्याच्या कुवतीच्या मानानं हे काम जरा अवघडच होतं. पण त्याने आव्हान स्वीकारलं. परिणामाची चिंता न करता, प्रामाणिकपणे प्रयत्न केले म्हणून." 

त्यातल्या अमेयला मी हळूच विचारलं, " काय रे, ही ताई काय संस्कारवर्ग वगैरे घेते की काय ? "

 त्यावर अमेय म्हणाला, " नाही हो! हा कोणताही वर्ग वगैरे नाही. आम्ही सगळी मुलं आपणहून इथे येतो. रोज संध्याकाळी सात वाजता.. अगदी न चुकता.. फक्त पंधरा मिनिटांसाठी आणि जाताना मात्र भरपूर खूश होऊन, एनर्जी घेऊन जातो. तसं म्हणाल तर माझ्यामुळेच या सगळ्याला महिनाभरापासून सुरुवात झाली."

अमेय अगदी उत्साहानं मला सांगत होता. ..."त्या दिवशी मी खाली आलो तर कोणीच नव्हतं माझ्याबरोबर गप्पा मारायला. मी एकटाच उदास बसलो होतो. ही स्नेहलताई आली अन् म्हणाली, "काय रे काय झालं? असा का बसलास एकटा?" मी म्हणालो, "आज कोणीच नाही बघ.... खूप कंटाळा आलाय."

"हात्तिच्या.. एवढंच ना.. थांब", असं म्हणून ताईने तिची शबनम् झोळी  बाजूला ठेवली अन् म्हणाली, "पकडतोस मला?" अन् लागली की धावायला. मला आश्चर्यच वाटलं. पण आनंदही झाला. अन् आम्ही दहा-पंधरा मिनिटं पकडापकडी खेळलो. त्या संध्याकाळच्या छान हवेत थोडी धावपळ केली आणि मला खूप फ्रेश वाटलं. मी तसं ताईला म्हणालोही. मग ताईच म्हणाली, "तुला आवडलं ना... मग उद्यापण खेळू. मी रोज सात वाजता घरी येते."

मी लगेच हो म्हंटलं तिला. दुसऱ्या दिवशी शाळेतून येतांना, काॅलनीतल्या माझ्या नेहेमीच्या मित्रांना हे सांगितलं आणि चक्क आम्ही आठ जण बरोबर सात वाजता इथे हजर. मग आम्ही ताईबरोबर खेळलो, गप्पा मारल्या आणि काय सांगू....महिनाभरात आमच्या काॅलनीतील वेगवेगळ्या वयाची चक्क साठसत्तर मुलंमुली, रोज सात वाजता इथं जमायला लागली......फक्त पंधरा मिनिटांसाठीच.

मी कौतुकानं त्या ताईकडे पाहिलं. नुकतंच काॅलेज पूर्ण झालं असावं तिचं. तशी काही वयानं मोठी नव्हती, पण तिचा आत्मविश्वास, लाघवी स्वभाव, आपुलकीनं बोलणं हे मात्र नक्कीच वेगळं होतं. मुलंही तिच्याबरोबर रमली होती.

" चला आज छोट्यांना बेचा पाढा शिकवू या...." तिनं म्हंटलं आणि सगळ्यांनी होऽऽऽऽऽ म्हणून टाकलं.

मी आश्चर्यानं पाहिलं. मुलं आणि पाढे....? घरी बाबांनी सांगितलं असतं तर नाकं मुरडली असती, आईने सांगितलं तर कटकट वाटते, शाळेत बाईंनी सांगितलं तर कंटाळा येतो. आणि इथे.....

चला बच्चे मंडळी, पुढे या बरं.... लगेच पंधरा-वीस छोटी पुढे आली. तिनं दोघा दोघांच्या जोड्या लावल्या.

पाढा सुरू झाला. मोठी सगळी तिच्या सुरात सूर मिळवून म्हणत होती.

बे एके बे....... अन् एक जोडी पुढे आली...

बे दुणे.....दुसरी जोडी त्यांना येऊन मिळाली... चार जण झाले.... चार....

बे त्रिक ......तिसरी जोडी आली....आता सगळे मिळून झाले .....? ताईने विचारताच छोट्यांनी उत्तर दिलं.....सहा..

अन् दोन दोन मिळवत पाढा पुढे सरकत राहिला.... बे दाहे वीस..... किती मज्जा आली त्या छोट्यांना...

आणि मोठ्यांनी शिकवले ना त्यांना... म्हणून त्यांचीही काॅलर ताठ.

ताईनं आणखी एक गंमत सांगितली त्यांना... नवाचा पाढा म्हणता ना तुम्ही. त्याची एक गंमत माहिती आहे कां?

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह ......

"नवाचा पाढा फिरून मोजिता, नऊच उत्तर येई पुन्हा ..." ताई म्हणाली. "शाहीर प्रभाकरांनी हे नवाच्या पाढ्याचं गीत लिहून ठेवलंय. " सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

नऊ एके नऊ = ९.      

नऊ दुणे अठरा  = १ + ८ = ९.     

नऊ त्रिक सत्तावीस =  २ + ७ = ९. 

नऊ चोक छत्तीस =  ३ + ६ = ९      

नवा पाचा पंचेचाळीस =. ४ + ५ = ९.   

नऊ सक चोपन्न = ५ + ४ = ९ 

नवा साते त्रेसष्ठ =  ६ + ३ =  ९.      

नवा आठे बहात्तर = ७ + २ = ९.     

नवे नवे एक्यांशी =  ८ + १ = ९ 

नऊ दाहे नव्वद = ९ + ० = ९

 

आहे की नाही गंमत. हे नवाच्या पाढ्याचं गीत तुमच्यासाठी मी नक्की आणिन बरं का... 

सगळ्यांनी उत्साहात टाळ्यांचा गजर केला.

"चला आता ! आज इतकंच पुरे. आता घरी जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे या जाॅगिंग ट्रॅकवरून धावत एक राउंड घ्यायची बरं का." ताईनं हसतहसत तिची शबनम झोळी उचलली अन् मुलांची ट्रेन जाॅगिंग ट्रॅकवरून शिस्तीत धावत सुटली.

 

"जाहीरपणे गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या पहिल्या स्त्री कलाकार" हिराबाई बडोदेकर यांच्याविषयी मधुवंती पेठे यांनी लिहिलेला लेख. 

गानहिरा  'हिराबाई बडोदेकर'

 - मधुवंती पेठे 

 [email protected]