ढवळीकर, मधुकर केशव 

पुरातत्त्वज्ञ, लेखक

१६ मे १९३० – २७ मार्च २०१८

मधुकर केशव ढवळीकर हे अशा निष्ठावंत पुरातत्त्वज्ञांपैकी होते, ज्यांनी आयुष्यभर पुरातत्त्वज्ञ म्हणून काम केलेच शिवाय त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक जणांना तयार केले. ‘ऑर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये १९५३ त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये पुण्यातील डेक्कन महाविद्यालयामध्ये पुरातत्त्वशास्त्राचे प्रपाठक, १९८० मध्ये प्राध्यापक, १९८३ मध्ये डेक्कन महाविद्यालयाचे साहाय्यक संचालक आणि १९८५ मध्ये संचालक अशी विविध पदे त्यांनी मोठ्या जबाबदारीने भूषवली होती. डेक्कन महाविद्यालयाच्या संचालक पदी ते १९९० मध्ये निवृत्त होईपर्यंत कार्यरत होते.

या कालावधीमध्ये त्यांनी मध्य,पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये - विशेषत: इतिहासपूर्व स्थळांचे उत्खनन केले. त्या कामांपैकी ‘इनामगाव’ येथील उत्खननासाठी त्यांनी वापरलेली पद्धत आणि उत्खननात सापडलेल्या अवशेषांची लावलेली समर्पक संगती यांसाठी त्यांची फार प्रशंसा झाली होती.

भारत सरकारतर्फे १९९१ मध्ये इजिप्तला जे सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ गेले होते, त्या मंडळाचे डॉ. ढवळीकर सदस्य होते. ‘अजंठा – अ कल्चरल स्टडी’,‘सांची’, ‘वेरूळ’, ‘पर्यावरण आणि संस्कृती’,‘सातवाहनकालीन कला’, ‘पश्चिम भारतातील सिंधुसंस्कृतीच्या खुणा’,‘कुंतासी- पश्चिम किनार्‍यावरील हरप्पाकालीन व्यापारीपेठ’, ‘इतिहासकाळ पूर्वीचा भारत’, ‘भारतातील इतिहाससंबंधी पुरातत्त्व’ अशी कला आणि पुरातत्त्व या विषयांवर त्यांनी वीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिली.

पुरातत्वशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वेळोवेळी अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आले. २०१० मध्ये रॉयल एशिआटिक सोसायटीची शिष्यवृत्ती, तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे रवींद्रनाथ टागोर शिष्यवृत्ती त्यांना प्रदान करण्यात आली होती. भारत सरकारच्या मनाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

पुण्यातील प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते. २७ मार्च २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

 -र.वि. नातू

सौजन्य: आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

प्राच्यविद्या खंड