स्मरणशक्ती

दिंनाक: 26 Mar 2018 14:05:39


 

स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय? फक्त जुन्या आठवणीच का? तसे असेल, तर या आठवणी तरी कशा लक्षात राहतात? या सगळ्यांचे उत्तर म्हणजेच आपली स्मरणशक्ती. मानसशास्त्राप्रमाणे पर्यावरणातील संकेत जाणून घेणे, ते साठवणे व लागतील तेव्हा ते पुनर्प्राप्त करणे म्हणजे स्मरणशक्तीची पूर्ण प्रक्रिया होय.

विचार करा, जर घडून गेलेल्या गोष्टी कधी लक्षातच राहिल्या नाहीत तर? आपण कधीच काही नवीन शिकू शकणार नाही, कारण प्रत्येक वेळेस ती गोष्ट आपल्यासाठी नवीनच राहील. भाषा शिकता येणार नाही, पूर्वी केलेल्या चुका आपण परत परत करत राहू. कोणाशी नाती जुळवता येणार नाहीत, कारण आपण कोणाला ओळखणारच नाही!

तर या सगळ्यासाठी स्मरणशक्तीची अत्यंत गरज असते. स्मरणशक्ती ही ३ प्रकारांची असते-

  • संवेदना संबंधित स्मृती
  • अल्पकालीन स्मृती
  • दीर्घकालीन स्मृती

संवेदना संबंधित स्मृती ही सर्वात कमी वेळ टिकणारी स्मृती आहे. पर्यावरणातील संकेतांचा आपल्या मेंदूवर सतत मारा होत असतो. असे काही संकेत आपल्या दृष्टीसमोरून गेल्यावरही त्यांचा एक ठसा मेंदूवर उमटलेला राहतो, तो या स्मृतीमुळे. आता हा ठसा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की नाही हे आपली अल्पकालीन स्मृती ठरवते.

अल्पकालीन स्मृतीमुळे हे ठरवले जाते की, बाहेरील किती संकेत आपण लक्षात ठेवू शकतो व आपल्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत. साधारणतः ७ गोष्टी एका वेळेस लक्षात राहू शकतात. (मग ते आकडे असोत वा अक्षरे. जर त्यांचे गट केले तर अजून जास्त लक्षात राहू शकते.)

उदा. १०१००१०००१००००१००००० हा पूर्ण आकडा लक्षात ठेवणे अवघड आहे. पण हेच आकडे जर गटात मांडले : १० १०० १००० १०००० १००००० तर हे लक्षात ठेवणे खूप सोपे आहे. मुलांना अभ्यासात याचा उपयोग होऊ शकतो. मोठ्या उत्तरांची पूर्ण वाक्ये पाठ करण्यापेक्षा फक्त महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले तर अभ्यासाचा ताणपण कमी होईल.

दीर्घकालीन स्मृतीचे महत्त्व ते मुद्दे लक्षात ठेवायच्या वेळेस कळते. पण यासाठी उजळणी करणे हे खूप गरजेचे आहे. ते जेव्हा होत नाही तेव्हाच गोष्टी विसरल्या जातात. या स्मृतीमुळेच आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी घरी जाईपर्यंत विसरत नाही. तसेच लहानपणी घडलेले प्रसंग, ऐकलेली गाणी, आज्जीने सांगितलेल्या कथा/गोष्टी या आपल्या अजूनही लक्षात आहेत. शिकलेल्या गोष्टी पुनर्प्राप्त करून देणे हेच स्मृतीचे काम आहे.

आपल्या मेंदूला महत्त्वाच्या न वाटणाऱ्या गोष्टी विसरल्या जातात. तसेच कधीकधी पुरेशी उजळणी न झाल्यामुळे दीर्घकालीन स्मृतीत असलेल्या गोष्टीही विसरल्या जातात. मग त्यांना एखादा संदर्भ द्यावा लागतो जेणेकरून त्या आपल्याला आठवतात.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात चांगली स्मरणशक्ती असणे खूपच गरजेचे आहे. तर आपण आपल्या मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवू शकतो हे आपण बघूया -

बरीच मुले बघून शिकणारी असतात. त्यामुळे त्यांना जमतील तेवढी चित्रे बघू द्या. उत्तरांच्या आकृत्या, तक्ते बनवा. महत्त्वाचे मुद्दे रंगीत पेनाने अधोरेखित करा.

मुलाने एखादी गोष्ट आपापली शिकून मग तुम्ही त्याच्याकडून शिका. म्हणजे त्याला नक्की किती कळले आहे, हे तुम्हाला कळेल आणि त्याची उजळणीही होईल.

त्यांच्याशी पत्ते खेळा (एका डावात एकूण किती पत्ते असतात/ कोणाकडे कुठले पत्ते होते/ आता कुठले राहिले असतील? या सगळ्याचा विचार करू दे).

नावांच्या भेंड्या खेळा. यात एक प्रकार म्हणजे एकाने सुरुवात करायची, दुसऱ्याने स्वतःबरोबर पहिल्याने काय सांगितले ते सांगायचे, तिसऱ्याने पहिल्याचे व दुसऱ्याचे दोन्ही शब्द सांगायचे आणि अशीच ती साखळी चालू ठेवायची.

शक्य तिथे मुलांचे जास्तीत जास्त संवेदना वाहक (sensory organs) वापरले जातील असे बघा. यांचा वापर जेवढा जास्त, तेवढीच लक्षात राहण्याची क्षमता जास्त.

लहान मुलांसाठी एका मोठ्या ताटात ८-१० वस्तू ठेवा. त्यांना त्या सर्व वस्तूंची नावे माहिती पाहिजेत. १ मिनिट त्यांना त्या वस्तू बघू देत/त्यांना हाताळू देत. मग ते ताट झाकून टाका आणि मुलांना त्या वस्तू आठवायला सांगा. जर सगळ्या आठवल्या तर वस्तूंची संख्या वाढवा आणि खेळ चालू ठेवा.

मुलांना २ गोष्टींमधील संबंध आपापले लावायला शिकवा. उदा. खालील चित्रात बॉल, मासा, टोपी, लरीं, पेन्सिल आणि चांदणी अशा ६ गोष्टी आहेत. जर त्या लक्षात राहत नसतील तर त्यांचे गट असे होऊ शकतात. लरीं-बॉल खेळताना टोपी लागते व नंतर अभ्यासाला पेन्सिल. म्हणजे ४ गोष्टी इथेच संपल्या, राहिल्या काय तर मासा आणि चांदणी. (एकूण गट झाले ३)

तर अशा अनेक खेळांचा उपयोग मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो.

 लहान मुलांची बघण्याची-ऐकण्याची-स्पर्शज्ञानाची क्षमता कशी वाढवावी? वाचा प्रियांका जोशी यांच्या शब्दात
दृष्टीकोन : बघण्याचा-ऐकण्याचा-अनुभवण्याचा !

-प्रियांका जोशी

[email protected]