महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, रायगड, कल्याण, सोलापूर, बारामती, सासवड, अहमदनगर या शहरातील शाळांनी सहभाग घेेेतलेल्या ३५,००० विद्यार्थ्यांच्या महामराठी भाषा स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज दि. २४ मार्च रोजी तीन शाळांमध्ये पार पडला.

सकाळी आठ वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेत सहा विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले. निसर्ग निमकर, पियुष कुलकर्णी, सार्थक गोडसे आणि सुरज कागदे या विद्यार्थ्यांना टी-शर्ट देऊन, तर क्षितीज गवाणकर, साहिल चाळके या विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षणविवेकच्या सहसंपादक रेश्मा बाठे आणि शाळेचे मुख्याध्यापक नागेश मोने यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. तसेच अथर्व काकडे या विद्यार्थ्याच्या प्रथम क्रमांकाचे ‘भिलार’च्या सहलीचे बक्षीस ऐकून सर्वांना आनंद झाला. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी सुरेखा जोशी यांनी कार्यक्रमाची आखणी छान केली होती.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ आवारातील शिशुविहार शाखेचा बक्षीस समारंभ उत्साहात घेण्यात आला. आठ विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाल्यामुळे विद्यार्थी खूश होते. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी ललिता सातव यांनी ‘महामराठी भाषा स्पर्धे’ची विस्तृत माहिती सांगितली. प्रथम क्रमांकप्राप्त शिवाजी मनोरे आणि साहिल जगदाळे यांचे सर्वप्रथम अभिनंदन करण्यात आले. दुसरा क्रमांक मिळवलेल्या नंदिनी हावडे, अनुजा गायकवाड, आदिती येरापले, साईनाथ चौगुले या विद्यार्थ्यांना टी-शर्ट बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या निशांत काशीद, लोकेश बावधाने, क्षितीज बारवकर, मयुरी देशमुख यांना पुस्तके देण्यात आली. रोटरी क्लबचे बेंद्रे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षणविवेकच्या उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ‘सर्जनशील पुनर्वापर स्पर्धे’ची माहिती सांगितली. पुढीलवर्षी मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळवण्याचा संकल्प करून शाळेच्या पद्धतीनुसार ‘झक्कास’ म्हणत विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी बक्षीस वितरण केले. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी प्रशांत जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शिक्षणविवेक आगामी स्पर्धांची माहिती सांगितली. पर्यवेक्षक संदीप पवार यांनी डॉ. अर्चना कुडतरकर यांचा परिचय करून दिला. या बक्षीस वितरणप्रसंगी जलदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थिनींनी पाण्याची आवश्यकता आणि जलदिनाची माहिती सांगितली. ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश देणारा एक व्हिडियो दाखवण्यात आला. त्यानंतर महामराठी भाषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकप्राप्त अहिल्या मोरेपाटील, श्रुतिका मराठे, राजलक्ष्मी पाटील या विद्यार्थिनींना ‘भिलार’ पुस्तकाच्या गावाची सहल हे बक्षीस घोषित करण्यात आले. श्रावणी बामगुडे या विद्यार्थिनीला टी-शर्ट तर आकांक्षा साटम, ऐश्वर्या मांगलेकर यांना पुस्तके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना लेखन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मंजिरी पाटील यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

शिक्षणविवेक आणि शिल्पकार चरित्रकोश आयोजित महामराठी भाषा स्पर्धेच्या बक्षीस समारंभात शाळांचे उत्तम नियोजन आणि शिक्षकांचे उत्तम वक्तृत्व पाहावयास मिळाले.

-प्रतिनिधी 

[email protected]