मागील आठवड्यात पुनर्वापर कचऱ्याचा या लेखात आपण कचऱ्याच्या वाढत्या समस्येबद्दल माहिती घेतली. आपल्या घरात अनेक प्रकारचा कचरा तयार होत असतो, त्यातही सण-वारांच्या वेळी होणारा ‘कचरा’ निर्माल्याचा... मग आपण तो सगळा कचरा गोळा करून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतो आणि नदीत, विहिरीत, समुद्रात किंवा तलावात टाकून देतो. हे निर्माल्य टाकून न देता त्याचं चांगलं खत करता येतं. फुलांपासून खत करणं अत्यंत सोपं असतं. फुलांमध्ये ७० टक्के पाणी असल्याने ती लवकर कुजतात. एका बादलीला किंवा डब्याला किंवा मोठ्या पिशवीला खाली छिद्र पाडून रोजचं निर्माल्य त्या बादलीत गोळा करावं. झाड लावलेली कुंडी वापरायची असेल तर ती भरतानाच जरा कमी भरायची. वर जी जागा उरेल, त्यात फुलांच्या पाकळ्या घालाव्या, म्हणजे वरचा थर छान दिसतो आणि वासही येत नाही. या प्रक्रियेत तुळशीची, बेलाची पानंदेखील घालता येतील. झेंडू-शेवंतीची फुलं तर औषधी असतात, त्यामुळे त्यांच्यापासून होणारं खतदेखील औषधी असतं. ते वापरल्यास झाडांना कीटकांपासून संरक्षण मिळू शकतं.

कृती :

एक कुंडी/बादली घ्यावी. त्याला खाली १ सें.मी. एवढं छिद्र पाडावं. त्यावर विटांच्या तुकड्यांचा किंवा खडीचा थर घालावा. देवळाच्या बाहेर पडलेल्या नारळाच्या शेंड्यांचे थर घालून जरा पाण्यात भिजवावं. रोज फुलांचा/पानांचा थर घालावा. कुंडीला/बादलीला गोणपाटाने झाकून ठेवावं. कुजण्याची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी हल्ली अनेक प्रकारची Culture’s मिळतात. यात अनेक प्रकारचे Bacteria, fungus असतात. हे जीवाणू आपल्या उपयोगी असल्याने त्यांना ‘मित्र जीवाणू’ म्हटलं जातं.

एकदा ही कृती जमली की मग घरच्या घरी, शाळेत तसंच सोसायटीतदेखील ती राबविता येईल. सोसायटीमध्ये सगळे जण आपापलं निर्माल्य गोळा करणार असतील तर तसा सामूहिक उपक्रम राबवता येईल.

यावर्षी आम्ही आमच्या सोसायटीतील निर्माल्य गोळा करून त्याचं खत केलं. तसंच सार्वजनिक गणपती मंडळाचं तोरण गोळा करून आणलं. तेदेखील वापरलं. उत्तम खत तयार झालं आहे.

तुम्हीसुद्धा करून बघा. निर्माल्य पायदळी तुडवण्यापेक्षा किंवा पाण्याला प्रदूषित करण्यापेक्षा अशा विधायक (Constructive) कामासाठी उपयोगात आलं, तर देव जास्त प्रसन्न होतील.

टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आपण कशाप्रकारे करू शकतो याबाद्दल जाणून घ्या खालील लिंकवर 

पुनर्वापर कचऱ्याचा

-अंजना देवस्थळे

[email protected]