तगर

दिंनाक: 24 Mar 2018 14:48:42


तगर ही बारा महिने मिळणारी सदाहरित भारतीय झुडूपवर्गीय वनस्पती आहे. टाबर्नमोंटाना डायवारीकाटा असे याचे शास्त्रीय नाव. याची उंची  ७ ते ८ फुटापर्यंत असू शकते. पावसाळा व थंडीच्या दिवसात या फुलांचा विशेष बहर असतो.

तगरीचे फूल आकाराने लहान, पाच पाकळ्या, पांढराशुभ्र रंग, फुलाच्या देठाचा रंग हिरवागार असतो. पाकळ्या पाणीदार, नाजूक असतात. त्यांची रचना चांदणीसारखी दिसते. म्हणूनच त्याला चांदणी असेही म्हणतात. याची फुले सुगंधरहित असून फांद्यांच्या टोकावर येतात. त्यांचा वापर देवपूजेसाठी तर केला जातोच, पण यापासून अनेक विकारांवर औषधेदेखील बनविली जातात.

नेत्रविकार, तसेच पडून किंवा खरचटून झालेली जखम भरून काढण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. तगरीच्या कळ्यांना बाजारात विशेष मागणी आहे. त्यांचा वापर गजरे, हार, वेण्या बनविण्यासाठी केला जातो. विविध रंगाच्या लोकरीमध्ये विणलेल्या या पांढऱ्याशुभ्र कळ्यांची वेणी आपले लक्ष आपसूकच वेधून घेते.

तगरीची पाने आकाराने छोटी, गर्द हिरव्या रंगाची असतात. सदाहरित असल्याने पाने नेहमी उपलब्ध असतात. पतंगाची मादी या पानावर अंडी घालते आणि याच्या अळ्या यांची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. फांद्यांची रचना गोलाकार असल्याने झुडपाचा आकारही गोलाकार दिसतो. याच गुणामुळे याची शोभेची वनस्पती म्हणून लागवड केली जाते. उद्याने, शाळा, मंदिर परिसर, रस्ता दुभाजक या ठिकाणी म्हणून याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सध्या बाजारात याच्या कमी पाण्यात वाढणाऱ्या खुज्या जातीदेखील उपलब्ध आहेत. त्याही खूप सुंदर दिसतात. पानांना काहीशी पांढरट झाक आणणारी ही जातही बाजारात उपलब्ध आहे. पडीक जागेवरही याची लागवड करायला हवी, कारण याच्या कळ्यांना बाजारात खूप मागणी आहे. याला फलधारणा होत असली तरी याची फळे लागलेली आपल्याला दिसत नाहीत. तर नवीन रोपांची निर्मिती बिया तसेच छाट कलमाने केली जाते.

अति वेगाने वाढणारा, अनेक लोकप्रिय वृक्षांपैकी एक असणाऱ्या गुलमोहर फुलाविषयी जाणून घ्या खालील लिंकवर 

गुलमोहर

- मीनल पटवर्धन

[email protected]