स्मरण वीरत्वाचे

दिंनाक: 23 Mar 2018 18:01:13


कुठल्याही देशाचे खरे मोठेपण हे त्या देशात असणार्‍या सोन्यारत्नांच्या खाणी किंवा त्या देशातील धनदौलतीवरून ठरत नाही, तर देशात निरनिराळ्या क्षेत्रांत होऊन गेलेल्या व आजमितीस तिथे असलेल्या नररत्नांच्या संख्येवरून आणि त्याच्या उच्च सांस्कृतिक पातळीवरून ठरत असते. सुदैवाने भारताला गेल्या हजारो वर्षांपासून जशी थोर नर-नारी रत्नांची परंपरा लाभली आहे,

तसाच त्याला उच्च संस्कृतीचा वारसाही लाभला आहे.

देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगदी लहान वयात फाशीच्या तख्ताच्या पायऱ्या चढणारे, फाशी गेल्यानंतरसुद्धा ज्यांच्या मृत शरीरावर कृतार्थतेचे, वीरत्वाचे, समर्पणाचे समाधान होते; ते क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव.

भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 मध्ये पंजाब राज्यात, लायपूर जिल्ह्यात ‘बंगा’ नावाच्या खेड्यात एका क्रांतिकारी शीख घरण्यात झाला. त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील देशभक्त किशनसिंग, काका अजितसिंग आणि स्वर्णसिंग हे इंग्रजांच्या विरूद्ध चळवळीत भाग घेतल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते. अशा भगतसिंग यांनी कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे घरदेखील सोडले. दिल्लीतील ‘अर्जुन’ वृत्तपत्रात त्यांना संवाददाता म्हणून नोकरी मिळाली. क्वचित ते लेखही लिहू लागले. त्यांच्या लिखाणातील देशभक्तीचे स्फुलिंग ओळखून त्यांना ‘प्रताप’ नावाच्या वृत्तपत्रात संपादकाचे काम मिळाले. भारतातील सर्व क्रांतिकारकांचे जीवन अत्यंत कठीण, खडतर असे होते. त्यांना पोटभर अन्नही मिळत नसे. कधीकधी दोनदोन दिवस पाण्यावर पोट भरावे लागे. सर्व सुखांचा त्याग करून, देशासाठी अनंत हाल अपेष्टांना तोंड देणाऱ्या या क्रांतिकारकाचे जीवन कसे असेल? याचा विचारसुद्धा करवत नाही.

शिवराम हरी राजगुरू म्हणजेच ‘राजगुरू’ यांचा जन्म 1908 साली पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी ते संस्कृतचे अध्यापन करण्यासाठी बनारसला गेले. गनिमीकाव्याने स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होते. तिथल्या वास्तव्यात त्यांचा चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ संन्याल आदि क्रांतिकारकांशी संबंध आला. ते त्यांच्या संघटनेत सामील झाले व बंदुक चालवण्याचे शिक्षण घेऊ लागले. भगतसिंग यांच्याप्रमाणे राजगुरू हेही नेमबाजीत निष्णात झाले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाला ‘राजगुरूनगर’ असे नाव देण्यात आले.

सुखदेव यांचा जन्म 25 मे 1907 रोजी पंजाब राज्यातील लुधियाना या शहरात झाला. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी भगतसिंह, भगवतीसिंह व्होरा त्यांच्याबरोबर ‘नौजवान भारत सभेची’ स्थापना केली. तरुणांना या चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतींचा अवलंब करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. याने 1929 मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरूद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला.

या तीन क्रांतिकारकांनी ‘Hindustan Socialist Society‘ ची स्थापना केली. लालालजपतराय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोर्चा काढला. यात त्यांनी ‘सायमन... गो बॅक...’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे आसमंत दणाणून गेला. त्यामुळे सरकारने स्कॉट व साँडर्स या पोलीस निरीक्षकांची स्टेशनवरील मोर्चा थांबवण्यासाठी नियुक्ती केली. यांनी लाठीमार चालू केला. साँडर्स सरळ लालालजपतराय यांच्यावर चालून गेला. यात त्यांचा मृत्यु झाला. 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. क्रांतिकारकांनी साँडर्सच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवले. सर्व माहिती मिळाली. योजनेप्रमाणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ठरलेल्या जागी दबा धरून बसले. साँडर्स आला... आपल्या गाडीवर जाऊन बसला. इकडे या क्रांतिकारकांनी श्वास रोखले. पिस्तुलाच्या चापावर बोटे स्थिर केली आणि क्षणात एका पाठोपाठ एक गोळ्या सुटल्या. साँडर्स किंचाळत खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. काम फत्ते झाले, पण साँडर्सचा खून केला या आरोपाखाली या तिघांना अटक झाली व त्यांना अखेर 23 मार्च रोजी फाशी देण्याचे ठरले.

अखेर 23 मार्चचा दिवस उजाडला. लाहोर शहरातला बंदोबस्त कडक करण्यात आला. यांना 24 मार्चला फाशी दिली जाईल, म्हणून लोकांना गाफील ठेवून; या क्रांतिकारकांना 23 मार्चला सूर्यास्तानंतर; म्हणजेच 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली. रात्री तुरुंगाची भिंत फोडून मृतदेह रातोरात हलवण्यात आले. सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह गाडायला सोपे जावे, म्हणून मृतदेहाचे तुकडेतुकडे करून पुरण्यात आले.

24 मार्चला काळे झेंडे लावून, सरकारच्या निषेधार्थ मिरवणूक काढण्यात आली. 50 हजारांहून अधिक लोकांनी त्या वीरांचा जयजयकार केला. वृत्तपत्रांनी स्तंभच्या स्तंभ लिहिले. थोरांना आदरांजली वाहिली. सुभाषचंद्र बोस म्हणाले, ‘यांनी पेटवलेली देशप्रेमाची ज्योत कधीही विझणार नाही.’ यांची आठवण म्हणून 23 मार्चला ‘शहीद दिन’ साजरा केला जातो.

भारत स्वतंत्र झाला, तो अशा अनेक वीरांच्या बलिदानामुळे! स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या आपण सर्वांनी या क्रांतिकारकांना केवळ वंदन करून भागणार नाही. देशप्रेमाची ही ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी केली पाहिजे. हीच खरी आदरांजली!!!

धन्य ते क्रांतिकारक! धन्य त्यांचे जीवन! त्यांना आपले कोटी कोटी प्रणाम!!!

- चैत्रा पटवर्धन