हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा सामान्यतः वर्तमान पत्रांमधून हवामानाचे अंदाज वाचत असताना आपल्या वाचनात हल्ली दोन शब्द वारंवार येतात. ते म्हणजे ‘अल-निनो’ आणि ‘ला-नीना’. या दोन शब्दांचा पुनरुच्चार हा भारतीय मान्सूनच्या संदर्भात केला जातो. तर नक्की हे ‘अल-निनो’ आणि ‘ला-नीना’ हे प्रकरण आहे तरी काय? आणि त्याचा आपल्या भारताशी कसा संबंध येतो, हे प्रस्तुत लेखामध्ये जाणून घेऊयात.

आपण वर वाचलेले दोन्ही शब्द हे हवामानाच्या एका वेगळ्या प्रकाराशी निगडित आहेत, जे प्रशांत (Pacific) महासागरात घडतात. प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर असून, या महासागराच्या पूर्वेला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका आणि पश्चिमेला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आशियाचा पूर्वेकडील भाग आहे. नेहमीच्या वर्षांमध्ये, म्हणजेच जेव्हा हे दोन्ही बदल नसताना, प्रशांत महासागरात हवामानाची सामान्य स्थिती असते. म्हणजेच व्यापारी वारे (Trade-Winds) हे पूर्वेकडून (पेरू, दक्षिण अमेरिका या भागाकडून) पश्चिमेकडे (न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या भागांकडे) वाहत असतात. व्यापारी वारे वाहत असताना ते प्रशांत महासागरातील मध्याचा भाग (हा तुलनेने उष्ण असतो) हा आपल्या सोबत हळूहळू पश्चिमेला ढकलतात. यामुळे काही कालखंडानंतर पश्चिमेला उष्ण भाग आणि परिणामी पूर्वेला थंड भाग तयार होतो. आता जलचक्राच्या नियमानुसार पश्चिमेचा भाग हा उष्ण असल्याने तिथे बाष्प वाढते आणि ढग तयार होऊ लागून पाउस पडतो. त्यानंतर हळूहळू हे ढग वातावरणाच्या “Troposphere”पर्यंत जाऊन पोहोचतात आणि नंतर त्यामधील बाष्प कमी होते आणि ते वाऱ्यांच्या रूपाने पुन्हा पूर्वेकडे येतात. हे चक्र नेहमी सामान्यतः चालू असते.

आता ज्या वर्षी व्यापारी वारे हे तुलनात्मकरित्या कमी जोराने वाहत असतात, त्या वेळी साहजिकच प्रशांत महासागरातील उष्ण भाग हा इतर वाऱ्यांच्या मुळे हळूहळू पश्चिमेकडे न सरकता तो पूर्वेला सरकू लागतो. त्यामुळे हे चक्र उलट होऊ लागते आणि थंड भाग हा पश्चिम बाजूला जातो आणि उष्ण भाग पूर्वेला सरकू लागतो. यामुळे पेरू, दक्षिण अमेरिका या भागात नेहमीपेक्षा फार जास्त प्रमाणात पाऊस होतो, तर पश्चिम भागात अतिशय विरळ पाऊस होतो. त्यामुळेच भारत हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेला असल्याने भारतालासुद्धा याचा परिणाम म्हणून अतिशय कमी पाऊस लाभतो. या परिणामास ‘अल-निनो’ असं संबोधतात. हा परिणाम प्रथम पेरूमधील मासेमार लोकांच्या लक्षात आला आणि तिथे स्पॅनिश भाषिक जास्त असल्याने त्यांनी याला ‘El-Nino’ म्हणजे ‘लहान-मूल’ किंवा ‘ख्रिस्ताचं-मूल’ असं नाव दिलं. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, ‘अल-निनो’ हा परिणाम, ज्या प्रदेशाच्या बाजूला प्रशांत महासागराचा उष्ण भाग असतो त्या भागाला म्हणतात. तर याच्या उलट बाजूला म्हणजेच ज्या बाजूला प्रशांत महासागराचा थंड भाग असतो, त्या भागात दिसणाऱ्या परिणामाला ‘ला-नीना’ असे म्हटले जाते. ‘ला-नीना’चा परिमाण म्हणजे त्या भागात पावसाचे परिमाण/प्रमाण कमी होणे, हा होतो. कधीकधी ‘ला-नीना’च्या वेळी थंड भाग हा अधिक जास्त थंड होतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाण्याचा उष्ण भाग वर, तर थंड भाग महासागराच्या अधिक खोलवर जातो. यामुळे सुद्धा तापमानातील कमी आणि जास्त प्रकारचे भाग तयार होऊन पावसावर परिणाम होतो. ‘ला-नीना’चे नामकरण हेसुद्धा स्पॅनिशमध्येच आणि ‘अल-निनो’च्या उलट म्हणजे ‘लहान-मुलगी’ असे केलेले आहे. 

‘अल-निनो’ आणि ‘ला-नीना’ हे एका मोठ्या चक्राचे लहान असे भाग आहेत. या चक्राला ‘ENSO’ म्हणजेच “El-Nino and Southern Oscillation” असे संबोधले जाते. ‘अल-निनो (उष्ण परिणाम)’ आणि ‘ला-नीना (थंड परिणाम)’ हे आता जागतिक हवामानाच्या अभ्यासात स्थिरावलेले आहेत. त्यांची वारंवारता ही ४.५ वर्षे इतकी आहे. तरीसुद्धा ते कमीत कमी २ वर्षे तर जास्तीत जास्त १० वर्षे इतक्या कालखंडाने होऊ शकतात. हे दोनही परिणाम हे हवामानातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक असून यांचा परिणाम म्हणून साधारण अर्ध्या पृथ्वीवरील वातावरणावर ह्याचा परिणाम होतो. भारतामध्ये हिवाळ्यात ‘अल-निनो’चा परिणाम हा उष्ण वातावरणात होतो, तर उन्हाळ्याच्या काळात याचा परिणाम हा कमी पाउस आणि कोरडा दुष्काळ असा होतो. याउलट ‘ला-नीना’चा परिणाम हा भारतात सरासरीपेक्षा जास्त पाउस पडण्यात होतो. तर मग आता इथून पुढे ‘अल-निनो’ आणि ‘ला-नीना’ हे हवामानशास्त्रातील शब्द कुठेही ऐकलेत तर तुम्हाला नवीन काही वाटायला नको! 

मानवाच्या विविध अवकाश मोहिमांची माहिती सांगणारा अक्षय भिडे यांचा लेख. 

लेख ९ – आकाश मोहिमा

- अक्षय भिडे

[email protected]