‘मानवी वस्तीत बिबट्याने हल्ला करून अमूक इतक्या माणसांना जखमी केले. बिबट्या, वाघ विहिरीत पडला’, अशा बातम्या आपण अलीकडे बर्‍याचदा ऐकतो. वन्य प्राणी मानवी वस्तीत का येतात? कारण जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वाघ, सिंह, बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचे आश्रयस्थानही धोक्यात आले आहे. परिणामी, वन्य प्राणी आश्रयासाठी आणि आपल्या अन्न-पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.

आपल्या  देशातील जंगल संपत्तीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. वाढणारी लोकसंख्या आणि ग्रामीण भागातील लोकांचे शहरात होणारे स्थलांतर; यांमुळे लोकांच्या निवार्‍याची गरज भागवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड करून, मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जातात. शहरांच्या विकासासाठी जंगले तोडली जात आहेत, डोंगर ओसाड-बोडके झाले आहेत. बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे जमिनींचे, जंगलांचे आच्छादन कमी झाले आहे. जंगलांतील जमिनींची धूप झाल्यामुळे, नदी, धरणे गाळाने भरली आहेत. इतकेच नाही; तर वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळलाच, पण त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.

जंगल ही आपली संपत्ती आहे. आपण त्याचे रक्षण केले पाहिजे. अनेक व्याधींवरील दुर्मीळ औषधी वनस्पती आपल्याला जंगलातच सापडतात. फक्त पावसाळ्यात दर्शन देणारी रानफुले तर कोणाला आवडतच नाहीत? चिंचा, बोरे, करवंद, जांभळे हा रानमेवा; आपण जंगले टिकवली, तर आणि तरच आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध होईल ना! याशिवाय भारतातील जंगलात अनेक विशिष्ट प्रकारचे प्राणी, पक्षी आणि कीटक आहेत. जे जगातील इतर देशांमध्ये आढळत नाहीत. जगात वाघाच्या नऊ जाती आहेत, त्यात आपला भारतातील ‘रॉयल बंगाल टायगर’ (पट्टेरी वाघ) हा एकमेव आहे. ‘एशियाटिक लायन’ (सिंह) हा फक्त आपल्याच देशात आढळतो; तसेच एक शिंगाचा गेंडा, भारतीय हत्ती, सुसर, रेड पांडा, कस्तुरी मृग, चिरू, स्लॉथ अस्वल हे आपल्या देशातले ‘खास’ प्राणी आहेत, जे इतरत्र आढळत नाहीत.  याशिवाय भारतीय जंगलात अंदाजे 340 सस्तन प्राणी, 1200 प्रकारचे पक्षी आणि 50,000 प्रकारचे कीटक व 45,000 प्रकारच्या वनस्पती आपली जंगल विविधता समृद्ध करतात. ही समृद्ध विविधता पाहण्यासाठी बाहेरील देशांतून अनेक पर्यटक आपल्या देशातील जंगलांना भेट देण्यासाठी येतात.

जंगलात प्राणी-पक्ष्यांची विविधता तर आहेच, पण जंगल आपल्याकडून काहीही न घेता फक्त आपल्याला खूप काही देते. जंगलातून मिळणार्‍या कच्च्या मालावर आदिवासी जमातींचा उदरनिर्वाहही चालतो. भारतात अनेक आदिवासी जमाती जंगलातच राहतात. साग, देवधर, साल, शिसवी, अबनूस, खैर, चंदन, बाभूळ, रबर यांसारख्या वृक्षांची मर्यादित तोड करून, त्याचे योग्य संवर्धन केले; तर या वृक्षांपासून शासनालाही चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय मसाल्याच्या पदार्थांत, आयुर्वेदिक औषधांत वापरण्यात येणार्‍या वनस्पतींच्या विक्रीतूनही आणि जंगल पर्यटनातूनही उत्पन्न मिळते.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणाच्या संतुलनासाठी वीस टक्के क्षेत्र हरित; म्हणजेच जंगलांनी व्यापलेले पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र भारतात सात ते आठ टक्के इतकेच क्षेत्र जंगलांचे आहे. जंगलांचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन, वन संवधर्नसाठी ‘वनक्षेत्र’ म्हणून आरक्षित क्षेत्र घोषित केले आहे. त्या अंतर्गत देशात 86 राष्ट्रीय उद्याने, 480 अभयाराण्ये व 28 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात त्यापैकी ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट, सुपे, कर्नाळा ही अभयारण्ये आहेत. आरक्षित क्षेत्रांमुळे वनसंवर्धन होत आहे. पण आपणही आपल्यापरीने जंगलसंवर्धनसाठी हातभार लावू शकतो. कागदाचा कमीत कमी वापर करून, कागद वाचवून त्यासाठी होणारी वृक्षतोड आपण टाळू शकतो. तसेच फर्निचर तयार करण्यासाठी टिकाऊ म्हणून ज्या झाडांच्या लाकडांचा वापर केला जातो, त्याला पर्याय म्हणून इतर कच्च्या मालाचा वापर केला पाहिजे. वनक्षेत्रात जास्तीत जास्त झाडे लावून ती वाढवणे, त्यांचे संवर्धन करणे जास्त आवश्यक आहे. जंगलांचे संवर्धन योग्य प्रकाराने झाले पाहिजे, म्हणून आता ‘अरण्यविज्ञान’ ही एक महत्त्वाची ज्ञानशाखा बनली आहे. शिक्षणपद्धतीत ही एक स्वतंत्र शाखा म्हणून रूढ होत आहे. पाश्‍चात्य देशांत तर या शाखेकरता स्वतंत्र शाळा आहेत आणि यामध्ये जर्मनी देशाचा पहिला नंबर आहे.

मित्रांनो, आपली समृद्ध अशी जंगल-संपत्ती जवळून पाहायला तुम्हाला आवडेल? किंवा तुमच्यातील काहीजणांनी पाहिलीही असेल. परीक्षा संपली की, तुम्ही सुट्टीसाठी म्हणून कुठेतरी सहलीसाठी जाणार असाल ना! तर मग, या सुट्टीत एखाद्या अभयारण्याला नक्की भेट द्या. तेथील प्रत्येक गोष्ट जवळून पाहा आणि त्याचे निरीक्षण करा. अभयारण्याला भेट देणे शक्य झाले नाही, तरी तुमच्या गावाजवळील डोंगरावर किंवा टेकडीवर अवश्य जा. तेथे तुम्ही किती प्रकारची झाडे, पक्षी, प्राणी, कीटक पाहिले? कोणत्या रंगाची फुले, फुलपाखरे आणि आणखी काय काय पाहिले? आणि हे सगळे पाहताना तुम्हाला काय वाटले? तो अनुभव कसा होता? याविषयी तुमच्या शब्दांत ‘शिक्षणविवेकला’ कळवा.

- रेश्मा बाठे

[email protected]