अज्ञानाचं फळ

दिंनाक: 20 Mar 2018 14:53:10


चिनू शाळेतून आला. हात-पाय धुऊन जेवायला बसला. नंतर त्याच्या खोलीत जाऊन, तो स्वत:हून अभ्यासाला बसला. सातवीत शिकणार्‍या आपल्या मुलाने असे जबाबदारीने वागलेले पाहून त्याच्या आईला फार आनंद झाला आणि समाधान वाटले. पूर्वी चिनू असा नव्हता. फक्त एका आघाताने त्याला पूर्ण बदलून टाकले होते.

साधारण सहा-सात महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. चिनूच्या शाळेची वेळ झाली होती. पिंटूने खालून त्याला हाक मारली, ‘चिनू, ए चिन्या..., आजतरी येतोयस की नाही शाळेत?’ 

चिनू बाल्कनीत त्याच्या बाबांच्या आरामखुर्चीत अंगावर ब्लँकेट ओढून बसला होता. तो आईला म्हणाला, ‘आई, मला आजपण बरं वाटत नाही.’ 

आईने बाल्कनीतून हातानेच पिंटूला नकार दिला. पिंटू सायकलवर टांग मारून निघून गेला.

आई चिनूला म्हणाली, ‘चिनू, चल आवर. आपण डॉक्टरांकडे जाऊ या.’ 

‘डॉक्टरांकडे? का?’,  चिनूने धक्का बसल्यासारखे आईला विचारले.

‘अरे, का काय? गेल्या दोन दिवसांपासून तू कुडकुडतोयस!’,  आई म्हणाली.

‘अगं, जरा वेळ पडलो की, होईन मी बरा.’,  चिनू म्हणाला.

आई जरा ओरडूनच त्याला म्हणाली, ‘रोज तू हेच म्हणतोस. आणि जरा वेळ पडलास तर पाहिजेस ना! बघावं तेव्हा या खुर्चीत बसलेला असतोस. आज मी तुझं काही ऐकणार नाही. तुला डॉक्टरांकडे यावंच लागेल.’ 

‘नको ना, आई. प्लीज’,  चिनू काकुळतीने म्हणाला.

‘मी काही ऐकणार नाही. अरे, रोज शळेच्या वेळेला तुला हुडहुडी भरते...’,  आईच्या अचानक काही लक्षात आले आणि तिने चिनूला विचारले, ‘काय रे चिन्या, शाळेत काही गडबड तर केली नाहीस ना?’ 

‘कसली गडबड?’,  चिनूने विचारले.

‘म्हणजे अभ्यास अपूर्ण किंवा काही खोड्या केल्या असशील!’,  आई संशयाने म्हणाली.

‘शाळेतल्या शिक्षकांना तर घाबरत नाहीस ना तू?’, एवढा वेळ चिनू आणि आईचं संभाषण ऐकत असलेली आजी मध्येच म्हणाली.

‘हा, आणि शिक्षकांना घाबरेल! अहो, गेल्या वेळी पालकांच्या मिटिंगमध्ये याचे वर्गशिक्षक म्हणत होते, शिक्षकांनाच भीती वाटते वर्गात शिकवण्याची.’, आई म्हणाली.

‘भीती वाटते?’, आजीने न कळून विचारले.

‘अहो, भीती वाटते, म्हणजे आपल्या चिन्याची मस्ती एवढी असते की, शिकवूच देत नाही म्हणे हा वर्गात.’, आई आजीला म्हणाली.

‘काय रे चिन्या, खरं आहे का हे?’, आजीने जरा खडसावूनच विचारले.

‘नाही गं आजी.’, चिनू म्हणाला.

‘नाही? म्हणजे शिक्षक खोटं बोलतात का तुझे?’, आईने विचारले. चिनू काहीही न बोलता मान खाली घालून बसून राहिला.

‘असा गप्प बसून राहू नकोस. चल, आवर लवकर.’, आई चिनूला म्हणाली आणि चिनूची खोली आवरायला त्याच्या खोलीत शिरली.

‘आजी, सांग ना आईला मला नाही जायचं डॉक्टरांकडे.’, चिनू आजीला म्हणाला.

‘अरे, पण का?’, आजीने चिनूला विचारले.

चिनूने तो पाहत असलेल्या मांडणीकडे बोट दाखवले. त्या मांडणीवर एका चिमणीने घरटे बांधले होते आणि त्या घरट्यात दोन अंडी होती.

‘अरे, काऊला आपल्या घरट्यात आसरा देणारी चिऊताई आपल्या आसर्‍याला कधी आली?’, आजीने आश्‍चर्याने विचारले.

‘काही माहीत नाही, पण दोन दिवसांपूर्वी ही चिऊताई आणि तिची ती दोन अंडी मला दिसली आणि तेव्हापासून मी ठरवलं, आता जोपर्यंत या अंड्यांतून पिल्ले बाहेर येत नाहीत, तोपर्यंत शाळेत जायचं नाही...’,  चिनू हे बोलत असताना त्याला मध्येच थांबवत आजीने विचारले, ‘का?’ 

चिनूने आत आईचा कानोसा घेतला आणि तो आजीला म्हणाला, ‘सांगतो, सगळं सांगतो; फक्त आईसाहेबांना सांगून आज डॉक्टरांकडे जाणं तेवढं रद्द करव.’ 

आजी आत गेली आणि आईशी काही बोलून आली. ‘हं, बोल आता. काय आहे हे सगळं?’, आजीने विचारले.

‘अगं, मला या चिमणीची पिल्लं अंड्यांतून बाहेर कशी येतात ते बघायचं आहे.’, चिनू म्हणाला.

‘अरे, पण त्यासाठी शाळा बुडवायची काय गरज आहे! डिस्कव्हरी चॅनेल किंवा तुझ्या त्या कम्प्युटरवर पाहता येईल की!’, आजीने त्याला दुसरा मार्ग सुचवला.

‘तसं नाही गं आजी; टी.व्ही., कम्प्युटरवर नाही बघायचं मला. प्रत्यक्ष बघायचं आहे.’, चिनू म्हणाला.

‘हे काय आता भलतंच वेड?’, आजीने विचारलं.

चिनू आजीला सांगू लागला, ‘अगं आजी, मागे एकदा आमच्या शाळेच्या मागच्या बागेत एका झाडावर असंच एक चिमणीचं घरटं होतं. त्यातही अशीच दोन की तीन अंडी होती. मी तासन् तास ती बघत बसायचो; पण तेव्हा अंड्यांतून पिल्लं बाहेर येताना पाहताच आलं नाही. शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी कधीतरी ती बाहेर आली. त्यामुळे ती संधी हुकली. पण आता नाही, आता मला त्यांना बाहेर येताना बघायचंच आहे.’  

‘अरे, पण त्याला किती दिवस लागतील कुणास ठाऊक. मग तोपर्यंत काय शाळेत जाणारच नाहीस?’, आजी.

‘नाही!’, चिनू निर्धाराने म्हणाला.

चिनूचा हा निर्धार ऐकून आजी चिंतेने म्हणाली, ‘अरे, असं नको करू. आज मी कसंबसं तुझ्या आईला समजावून सांगून तुला डॉक्टरपासून वाचवलं. पण पुढे काय करायचं?’ 

दोघे विचार करू लागले. अचानक चिनूच्या डोक्यात एक कल्पना चमकली, ‘आयडिया! अगं आजी, त्या देशपांडे काकूंना बाळ होण्याच्या आधी कसं डॉक्टरांनी त्यांना तपासून सांगितलं होतं की, या या दिवशी बाळ होईल म्हणून. तसं आपण या चिमणीच्या अंड्यांना तपासून त्यातून कधी पिल्लं येतील ते बघू या का?’ 

‘काय?’, आजी आवाक होऊन म्हणाली. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात चिनूने खुर्चीवर उभे राहून त्या घरट्याच्या दिशेने हात नेला.

‘थांब! खाली उतर.’, आजी जवळजवळ ओरडलीच. ‘ताबडतोब खाली उतर.’ आणि आजीने त्याला खुर्चीवरून खाली खेचले. मग आजी समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘हे बघ चिनू, चिमणीच्या अंड्यांना किंवा तिच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांना हात लावायचा नाही.’ 

‘का? ’, चिनू.

‘असं केलं तर इतर चिमण्या ती अंडी फोडून टाकतात. पिल्लांना चोचीने मारतात.’, आजीने सांगितले.

‘का?’, चिनूचा तोच पश्‍न.

‘ते मला माहीत नाही.’, आजी म्हणाली आणि पुढे सांगू लागली, ‘पण लक्षात ठेव. चुकूनही त्यांना स्पर्श करू नकोस.’ 

त्या दिवशी दिवसभर चिनू त्या घरट्यातील ती अंडी पाहत बसला, पण अंड्यांतून पिल्ले बाहेर आली नाहीत. एकदोनदा त्याच्या मनात त्या अंड्यांना हात लावण्याचा विचारही आला, पण दर वेळी आजीचे ते शब्द आठवले आणि त्याने त्याचा विचार बदलला.

संध्याकाळी पिंटूचा फोन आला. त्याने सांगितले, ‘उद्या तू शाळेत आला नाहीस, तर मेडिकल सर्टिफिकेट जमा केल्याशिवाय तुला वर्गात बसू देणार नाहीत, असे वर्गशिक्षक म्हणालेत.’ 

चिनूने त्याच्या घरातील चिमणीची गोष्ट आणि आजीने दिलेली माहिती पिंटूला सांगितली. त्यावर पिंटू म्हणाला, ‘अरे, माझी आजी पण असलंच काहीतरी सांगत असते. हे करू नकोस, ते करू नकोस, हे केलं तर असं होतं आणि ते केलं तर तसं होतं, वगैर वगैरे. पण मम्मी म्हणते, त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नकोस.’ 

रात्री चिनू बिछान्यावर पडला, पण त्याला झोपच येईना. त्याच्या डोक्यात सारखे आजीचे आणि पिंटूचे बोलणे नाचत होते. उद्या एकतर शाळेत जावे लागेल, नाहीतर डॉक्टरांकडे तरी. काय करावे, त्याला काही समजत नव्हते. शेवटी त्याने काहीतरी ठरवले आणि तो बाल्कनीत आला. खुर्चीवर उभे राहून घरट्यापाशी गेला. त्याला पाहून चिमणी चिवचिवाट करून उडून गेली. चिनूने दोन्ही अंडी हातात घेऊन त्यांना कानाशी लावलं आणि आत काही हालचाल होते का ते ऐकण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच जाणवले नाही. मग त्याने दोन्ही अंडी घरट्यात ठेवली आणि तो बिछान्यात येऊन पडला. ‘आता उद्या काय करायचं?’ हा विचार करताकरता त्याला कधी झोप लागली, ते समजलेच नाही.

सकाळ झाली. आजीने चिनूच्या अंगावरचे पांघरूण खेचून काढले आणि ती रागाने त्याला म्हणाली, ‘तुला सांगितलं होतं ना, त्या अंड्यांना हात लावू नकोस म्हणून. मग का हात लावलास?’ 

चिनूला काही समजलेच नाही. तो आजीला म्हणाला, ‘काय झालं आजी?’ 

‘बाल्कनीत जा. कळेल सगळं.’ आजीचा राग कायम होता.

चिनू बाल्कनीत आला. त्याने जे चित्र पाहिले, ते पाहून त्याला धक्काच बसला. घरट्यातील अंडी फुटून गेली होती. चिमणीही आसपास दिसत नव्हती. चिनू थरथर कापू लागला. खुर्चीवरून त्याचा तोल गेला. तो खाली पडणर इतक्यात आजीने त्याला सांभाळले. त्याच्या अंगात ताप भरला होता. आजी आणि आई त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या.

दुपारी पिंटू शाळेतून परस्पर चिनूच्या घरी आला. बिछान्यात पडलेल्या चिनूकडे धावत जात तो म्हणाला, ‘अरे चिन्या, तुझी आजी म्हणते ते खरंच आहे. आज बाईंनी वर्गात तेच शिकवलं. चिमणीच्या पिल्लांना किंवा अंड्यांना आपला स्पर्श झाला, तर त्या वासामुळे इतर चिमण्यांना त्यांना ओळखता येत नाही म्हणे आणि त्यामुळे त्या चिमण्या त्यांना मारतात, असं बरंच काही बाई बोलत होत्या.’, पिंटू बाईंनी सांगितलेले जे जे आठवेल ते ते चिनूला सांगत होता.

चिनूचे डोळे भरले होते. आपल्या अज्ञानामुळे आणि नसत्या उत्साहामुळे आज आपण दोन पिल्लांच्या मृत्यूला कारण ठरलो, याचे त्याला फार वाईट वाटत होते. त्या दिवशी त्याने ठरवले, आता काहीही करताना पूर्ण ज्ञान मिळवूनच करायचे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी खूप पाहायचे, वाचायचे आणि रोज शाळेत जाऊन नवनवीन गोष्टी शिकत राहायचे.

- सुरेश शेलार

[email protected]