संध्याकाळ झाली की, सुनीताच्या पुढे भाजी काय करायची? हा यक्षप्रश्न उभा राहत असे. तिची मुलगी केया लहान असेपर्यंत तिला हा प्रश्न कधीच पडत नव्हता. केयासाठी वरण-भाताचा कुकर व कधी केयाच्या बाबांच्या, तर कधी स्वत:च्या आवडीची भाजी केली की, तिचे काम होऊन जात असे.

केया चार-पाच वर्षांची झाल्यापासून तिने रोज पोळी-भाजी खायला सुरुवात केली खरी पण पोळीबरोबर भेंडी आणि बटाट्याच्या भाजी पलीकडे तिची गाडी पोहोचेना. केयाच्या उत्साहाला गालबोट लागू नये; म्हणून सुनिता रोज दोन भाज्या; एक केयाच्या आवडीची, तर दुसरी त्यांच्या दोघांच्या आवडीची करू लागली. ही ओढाताण जास्त दिवस करणे, तिला अशक्य झाल्याने भाजीवरून घरी रोजच रणकंदन सुरू झाले.

त्याची सुरुवात कधी केया, तर कधी तिचे बाबा करायचे. बाबाला हार मान्य करायला लावणे तसे सोपे होते, मात्र केयाला हार मान्य करायला लावून नावडती भाजी खायला लावणे, अशक्य होते. भाजी खाण्यापेक्षा उपाशी राहण्याचे शस्त्र तिने उगारल्याने, भाजी समस्येवर उपाय शोधणे सुनीताला भाग पडले. तिच्या मैत्रिणी आणि नातेवाइकांना फोन करून त्यांच्याकडे तरी या समस्येचे काही उत्तर सापडते का, याचाही तिने शोध घेतला. उत्तर मिळायचे लांब, उलट आमच्याकडेही अशीच समस्या आहे, त्यामुळे तूच काहीतरी उत्तर शोध, असे त्यांनी सांगितल्याने तिला स्वत:च मैदानात उतरून भाजी समस्या सोडवावी लागणार होती.

पाककलेची जेवढी म्हणून मिळतील; तेवढी सगळी पुस्तके ती घेऊन आली. केयाला न आवडणार्‍या भाज्या, एखाद्या नव्या पदार्थाच्या माध्यमातून तिच्या पोटात जाव्यात; म्हणून या पुस्तकाचा वापर करायला तिने सुरुवात केली. मटकीची उसळ न खाणार्‍या केयाला मटकी पोहे, चवीला मसाला टाकून कच्ची मटकी, कोबीच्या भाजीला पर्याय म्हणून, चायनीज असे हुकमी पर्याय तिने शोधून काढले. केयाला हे सगळे भलतेच आवडू लागले. अशा प्रकारे न आवडणार्‍या भाज्या वाट बदलून व वेगळ्या रूपात तिच्या पोटात जाऊ लागल्या.

हा पर्याय यशस्वी झाल्यामुळे, उत्साहाच्या नादात केयाची आवडती भेंडीची व बटाट्याची भाजी मात्र घरातून जवळपास हद्दपार झाली.

यक्षप्रश्न सुटल्याच्या आनंदात सुनीता असतानाच एक दिवस केया जेवताना तावातावाने तिला म्हणाली, ‘‘माझ्या चांगले लक्षात आले आहे, मी नावडत्या भाज्या खाव्यात म्हणून तू मला त्या वेगवेगळ्या प्रकारे बनवून देत आहेस ना. मला तुमच्या भाज्या खायला लावता, पण तुम्ही कधी माझी आवडती भाजी वेगळ्या प्रकारे खाऊन बघता का? उलट तुम्ही माझी आवडती भेंडीची व बटाट्याची भाजी करायचे बिलकूल बंदच करून टाकले आहे.’’

‘‘अगं केया, तसे काही नाही, आपण सगळ्या भाज्या खायला पाहिजेत ना?’’

‘‘हो, म्हणजेच तुम्ही पण भेंडी व बटाटा खाल्ला पाहिजे’’, असे म्हणत केयाने पुन्हा नुसती पोळी खाणे किंवा अजिबात जेवणच न करणे, अशी शस्त्र वापरायला सुरुवात केली.

भाजी समस्येवरचा पहिला उपाय थोडे दिवस का होईना; टिकल्यामुळे व त्यातून सुनीताचा आत्मविश्वास वाढल्याने खचून न जाता, तिने उपाय शोधण्याचे ठरवले. केयाच्या भाजी न खाण्यामागे, भाज्या न आवडणे, हे जसे कारण आहे; तसेच ‘घरात तुम्हाला हव्या त्याच भाज्या करता’, हा गैरसमजसुद्धा कारणीभूत आहे, हे तिने ओळखले.

केयाचा गैरसमज दूर करण्यासाठी केया, तिचे बाबा व ती स्वत: असे तिघांनी मिळून रोज कोणती भाजी करायची याचे वेळापत्रक बनवले. आठवडाभर सगळ्यांना त्यांच्या आवडत्या भाज्या समप्रमाणात खायला मिळतील, याची काळजी वेळापत्रक बनवताना घेतली.

रोज भाजी करायच्या निर्णयामध्ये मलापण सामावून घेतले आहे, ही गोष्ट केयाला भलतीच आवडली. ‘‘अगं आई, तू मंगळवारी मटार उसळ असे लिहिले आहेस, पण आपल्याला मटार ठरावीक महिन्यांत मिळतो, असे तूच म्हणाली होतीस ना?’’

‘‘अरे हो खरेच की! बघ बरे झाले की नाही आपण सगळ्यांनी मिळून वेळापत्रक बनवले, नाहीतर ही चूक माझ्या लक्षातच आली नसती. आपण एक काम करू या, भाज्यांच्या सिझनप्रमाणे गरज लागेल तसे वेळापत्रक बदलू या.

‘‘डन!’’ केया ओरडली.

वेळापत्रकाप्रमाणे भाज्या होऊ लागल्याने, केया सगळ्या भाज्या कुरकूर न करता खाऊ लागली. हे वेळापत्रक तिचे आहे आणि भाजी खाल्ली नाही, तर वेळापत्रकाचा अपमान होईल, असे तिला वाटू लागले. थोड्याच दिवसांत केयाला सगळ्या भाज्या, सगळ्या पद्धतीने खाण्याची सवय आपोआप  लागली. केयाची प्रगती बघून, भिंतीवरील भाजीचे वेळापत्रक सुनीताने हळूच काढून ठेवले खरे; पण ते टाकून दिले नाही, कारण थोडा वेगळा विचार करून भाजीचा यक्षप्रश्न तिने सोडवल्याचे ओरडून सांगणारे तिच्यासाठी ते एक प्रशस्तिपत्रक होते!

अन्वी आणि अर्णव या भावंडांची कथा वाचा खालील लिंकवर

माझी तुलना माझ्याशीच

-चेतन एरंडे

[email protected]