नमस्कार मित्रहो, आपल्या आकाशाच्या चाललेल्या सफरीमध्ये आपण बऱ्याच पुढच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. पण आकाशाचा अभ्यास सुरू झाल्यानंतर मनुष्याला या अथांग अशा आकाशाचा प्रत्यक्ष वेध घेण्याची ओढ लागली आणि नंतर मग त्याने पक्ष्यासारखे पंख करून पाहिले, छत्रीच्या आकाराची याने उडवण्याचा प्रयत्न केला आणि असे अनेक प्रयोग करून पाहिले. मानवाने खरे उड्डाण केले ते म्हणजे राईट बंधू यांच्या रूपाने! त्यानंतर खऱ्या अर्थाने आकाशाला गवसणी घालण्याची स्पर्धा वेग घेऊ लागली आणि गेल्या १००-१५० वर्षांत मानव नुसता आकाशात नाही तर चक्क इतर ग्रहांवर सुद्धा जाऊन पोहोचलाय. प्रस्तुत लेखात आपण अशाच अवकाश मोहिमांची माहिती घेऊयात.

मानवाने पहिले उड्डाण केले आणि नंतर काही वर्षात महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे, या महायुद्धांसाठी अधिकाधिक विकसित विमाने बनवणे सुरू झाले. आणि तसेच त्यांचा वेग आणि उड्डाणांची उंची वाढावी यासाठीसुद्धा प्रयत्न होऊ लागले. जेणेकरून प्रतिस्पर्धी देशाला आपल्या विमानांचा थांगपत्ता ‘रडार’च्या माध्यमातून लागू नये. मानवाच्या अवकाश मोहिमांचे बीज यातच आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धच्या काळात जर्मनीने V2 नावाचे पहिले रॉकेट अवकाशात सोडले आणि त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याने पृथ्वीची आपण कधीही न पाहिलेली अशी प्रतिमा आपल्याला मिळवून दिली. त्यानंतर राजकीयदृष्ट्या काळ होता तो म्हणजे शीतयुद्धाचा. या काळात रशिया आणि अमेरिका हे दोन देश एकमेकांवर नजर ठेवून होते. त्यांच्या हालचाली टिपायला अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये चढाओढ लागली. मग रॉकेटवर कॅमेरे लावणे, तसेच अधिकाधिक उंच रॉकेट पाठवणे हे सगळे सुरू झाले. याच काळात अमेरिका आणि रशिया आपापले प्रयोग करीतच होते. आणि अचानक रशियाने पहिले रॉकेट उपग्रहासोबत सोडले. या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे नाव “स्पुटनिक”!! आणि अशा प्रकारे रशियाने एका अर्थी अमेरिकेला या शर्यतीत मागे टाकले!

आता आपले अस्तित्व राखण्यास अमेरिकेस काहीतरी करून दाखवणे भाग होते. म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चक्क पुढील दशक संपण्याच्या आत आम्ही मानवास चंद्रावर उतरवू आणि सुखरूप परत आणू अशी घोषणा केली! आणि त्यानंतर पुढील अख्या दशकात कमालीची मेहेनत घेऊन अमेरिकेने एक इतिहास रचला तो म्हणजे “अपोलो-११” या यानाद्वारे चंद्रावर उतरलेले नील आर्मस्ट्रांग! बाकी आपल्याला ठाऊकच आहे. पण तरीसुद्धा या अपोलो मालिकेतील यानांचा इतिहास फार रंजक आहे, तुम्ही नक्की वाचा. यानंतर अमेरिकेने, चंद्र, शुक्र, गुरू, शनी, लघुग्रह, अशा अनेक अवकाशीय ग्रहांवर याने पाठवलेली आहेत. ह्यातील महत्त्वाची कोणती ते नक्की शोधून काढा.

भारताची अवकाश मोहीम सुरू झाली ती “आर्यभट्ट” या उपग्रहापासून. त्यानंतर “रोहिणी”, आणि असं करत करत आता “चांद्रयान”, “मंगळयान” आणि ती थेट १०८ उपग्रह एकाच वेळी आकाशात सोडण्यापर्यंत चालूच आहे!

मुळातच विचार केला तर अवकाश आणि त्याबद्दल असणारी उत्सुकता यामुळे मानवाने आकाशाकडे झेप घेतली. तसेच, आकाशात पृथ्वीवरील वातावरणाच्या त्रासापासून दूर म्हणून एक दुर्बीण असावी ती म्हणजे “हबल स्पेस टेलिस्कोप”. याच्या दुरुस्तीच्या ५ मोहिमा झाल्या. त्या सगळ्याच जाणून घेण्याजोग्या आहेत. तसेच आकाशात एक प्रयोगशाळा असावी म्हणून “स्पेस स्टेशन” आणि तिथे शास्त्रज्ञांनी फुलवलेले पहिले अंतराळातील फुलं हीसुद्धा एक गम्मतच आहे! तर मग तुम्हीसुद्धा ही सगळी माहिती शोधा आणि आकाशात जायचे मानवाने केलेले सगळे प्रयत्न आणि त्यातून मानवाच्या रोजच्या जीवनात घडलेले बदल (जसे की प्रिंटरचा शोध हा अवकाश युगातील शोधातूनच आलेला आहे) अशी एक छानशी वही बनवा !!! आणि हो त्या वहीत त्या त्या यानाची/यंत्राची छायाचित्रे शोधून लावायला विसरू नका!!! चला तर मग भेटूयात पुढील लेखात! 

आकाशाविषयी अधिक माहिती सांगणारा अक्षय भिडे यांचा लेख वाचा खालील लिंकवर 

लेख ८ – आकाशाबाद्द्ल अधिक

-अक्षय भिडे

[email protected]