नृत्यमग्न

दिंनाक: 17 Mar 2018 18:51:04


अनेक मराठी चित्रपट, मालिकांमुळे शर्वरी आपल्याला माहित आहेच. पण, तिला स्वत:ला केवळ अभिनेत्री म्हणून ओळखण्यापेक्षा एक शास्त्रीय नृत्यांगना म्हणून असणारी ओळख अधिक जवळची वाटते.

“एss होस्टेल काय तुझ्या बापाचं आहे का?”

असा होस्टेलमध्ये उशिरा येऊन उलट प्रश्न विचारणारी ‘बिनधास्त’ सिनेमातील ती बिनधास्त वैजू आठवते? चित्रपटात बंडखोर मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी ही मुलगी नृत्यातून मात्र शांत, सात्त्विक मुद्राभिनय साकारते. इतकंच नव्हे तर, शास्त्रीय नृत्यालाच आपल्या आयुष्याचं ध्येय मानते.

शर्वरी जमेनिस... मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री. गुणी अशासाठी की, पडद्यावरचा ‘अभिनय’ जमला म्हणून तिने मूळ अभिरुची सोडली नाही. ग्लॅमरच्या प्रवाहात वाहून न जाता, शास्त्रीय नृत्याच्या आराधनेशी जोडलेली नाळ तिने आजही निष्ठेने जपली आहे.

शर्वरी आपल्या ‘विमलाबाई गरवारे हायस्कूल’ची माजी विध्यार्थिनी. भारतीय नृत्याची संपन्न अभिरुची बाळगणाऱ्या शर्वरीच्या रूपाने ‘मएसो’च्या कलावैभवात भर पडलीय. वयाच्या सातव्या वर्षापासून शर्वरीने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगना रोहिणी भाटे या तिच्या गुरु. ‘नृत्यभारती कथ्थक अकादमी’त तिने नृत्यसाधना सुरु केली. शर्वरी सांगते. “विमलाबाई गरवारे शाळेत असताना आम्ही सगळ्या मुली मिळून खूप धिंगाणा घालायचो. ती मस्ती, तो बिनधास्तपणा आजही जपला गेलाय. माझ्या आवडीला, कलागुणांना एकंदरीत व्यक्तिमत्वाला न्याय देऊ शकेल असंच वातावरण मला शाळेत मिळालं.” शाळेत असताना शर्वरी नाट्यवाचन, वकृत्व यात उत्साहाने सहभागी व्हायची. ती सांगते की आठवीत असताना तिने एकाच वर्षात संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा चारही भाषेत भाषणं केली आणि त्या वकृत्व स्पर्धांमध्ये तिला यशही मिळालं. शर्वरी म्हणते, “नाट्यवाचन आणि वकृत्व या कला मी शाळेत जोपासल्या, त्यांचा मला माझ्या करिअरमध्ये चांगला उपयोग करता आला.”

खरं तर शर्वरीने स्वतःमध्ये रुजवलेला नृत्याचा व्यासंग हा व्यक्तिमत्वाला सर्वांगाने समृद्ध करणारा आहे. नृत्याशी आणि मुख्यत: शास्त्रीय नृत्याशी इतर अनेक कला जोडलेल्या आहेत. आपल्या भारतीय नृत्यशैलीत मुद्राभिनयाला विशेष स्थान आहे. विशिष्ट तालातला पदन्यास, जिवंत आणि रेखीव मुद्राभिनय व अर्थपूर्ण संगीतरचना यांनी समृद्ध झालेला शास्त्रीय नृत्यप्रकार आपल्याला एक प्रसन्न अनुभव देऊन जातो.

“पाश्चात्त्य नृत्यशैलीकडे असलेला आपला ओढा चूक नाही, पण अभिजात भारतीय नृत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही अभिजात कला हेच आपलं संचित आहे आणि ते जतन करायला हवंच आणि आणखी समृद्धही करायला हवं.” शास्त्रीय नृत्याविषयी असलेली शर्वरीची आस्था या शब्दांतून प्रकट होते. शाळेतल्या अरुणा भट, मेधा ओक, पांडव बाई या शिक्षकांची आवर्जून आठवण काढून ती म्हणते, “माझ्या कलेला प्रोत्साहन देणारे शिक्षक – मार्गदर्शक भेटले. ज्यातून आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो, तेच काम आपल्या आयुष्याचं ध्येय मानायचं आणि त्याच कामाची आराधना करायची हा संस्कार याच शिक्षकांनी माझ्या मनावर कोरला.” म्हणूनच केवळ एक अभिनेत्री अशी ओळख असण्यापेक्षा एक शास्त्रीय नृत्यांगना म्हणून असलेली ओळख तिला अधिक जवळची वाटते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचं सादरीकरण असो, समूहनृत्य असो किंवा एखाद्या स्थानिक कार्यक्रमातला सहभाग असो, तिचा पदन्यास नेहमीच अभिजात कलेशी नातं सांगणारा असतो. २००७ मध्ये पु. ल. स्मृतीचा ‘तरुणाई पुरस्कार’ आणि २००८ मध्ये संगीत नाटक अकादमीच्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारा’ने तिला सन्मानित करण्यात आलं आहे.

मित्रहो, ‘करिअर’ म्हणजे पोट भरण्यासाठी केलेला खटाटोप नाही. समाधान आणि आनंद देणारा समृद्ध अनुभव आणि ध्येयाची आराधना म्हणजे ‘करिअर’. शर्वरीची इथवरची वाटचाल आपल्याला हेच सांगते.

-मनश्री पाठक

[email protected]