आमचं फेसाळे कुटुंब घरातल्या मोठ्या मोठ्या माणसांच्या तोंडाला सकाळी सकाळी फेस तरी आणतं किंवा त्यांच्या कानाखाली तरी सणकवतं!

जनरली मुलाचा माणूस झाला की, त्याची आमच्याशी दोस्ती होते.

दोस्ती म्हणजे आमच्या कुटुंबातील एक जण, त्यांना रोज सकाळी कानफटवतात. त्या माणसाच्या कानाखाली चार खणखणीत आवाज काढतात.

मग माझं काम सुरू होतं. मी तीन धारी आहे.

आमच्यात एक धारी, दोन धारी असेही प्रकार आहेत.

मी त्या माणसाच्या चेहर्‍यावर धारदार वार करतो. 

मी त्याला सळो की पळो करून सोडतो.

मग तो माणूस घाबरून आपलं थोबाड पुन्हा-पुन्हा आरशात पाहातो.

काही भेदरट माणसांनी तर आपलं तोंड आरशात नीट दिसावं; म्हणून आरशावर लाइट लावून घेतलेत!

पण काही मोठी मोठी माणसं आम्हाला जाम घाबरतात असं वाटतं. ती आमच्या जवळपाससुद्धा फिरकत नाहीत. आमच्याशी दोस्ती करत नाहीत की आमच्याकडून फटके खात नाहीत.

दाढीवाल्या मंडळींची आमच्या कुटुंबाशी दोस्ती नाही, हे त्यांचे चेहरे पाहून कळतंच ना?

अधेमध्ये आपल्या दाढीवरून हात फिरवणारी माणसं पाहिली की, आमच्या कुटुंबातल्या ‘ब्रशच्या तोंडचा फेसच पळतो.’

गप्पा मारायला लागलं की हे असं होतं बघा..  आम्ही काय करतो? आमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? त्यांची तुम्हाला ओळखच करून दिली नाही.

तसं आम्हाला फार वर्कलोड नसतं.

सकाळी एकदा मारामारी झाली की, मग दिवसभर आम्ही प्लॅनिंग करत कपाटात दबा धरून बसतो..

दुसर्‍या दिवसाची वाट पाहात.

सकाळी-सकाळी माणसं, श्री. ब्रशरावांना बाहेर काढतात.

ब्रशराव केस झटकून आळस देतात. स्वच्छ पाण्याने अंघोळ करतात.

मग ओल्या केसांवर शेव्हिंग क्रीम किंवा शेव्हिंग जेलचं गंध लावतात.

या क्षणी माणसांची चुळबूळ सुरू होते... 

त्या क्षणी ब्रशराव न थांबता आणि न थकता माणसाच्या दोन्ही गालांवर फटाफट फटके मारायला सुरुवात करतात.

माणूस घाबराघुबरा होतो.

त्याचा चेहरा सुजतो.

त्याच्या तोंडाला फेस येतो.

पण..  ब्रशराव काही हटत नाहीत.

 .. ते जाता-जाता त्याच्या कानाखाली सहजच चार फटके असे सणकवतात की.. माणसाचा चेहरा पांढराफटक पडतो.

‘कुठल्याही रंगाचं असो शेव्हिंग क्रीम किंवा जेल,

दोन फटक्यात माणसाचा चेहरा होतो पेल’

ही इंग्रजीतली चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

मग हा घाबरट माणूस...

आपलं ते बावळट ध्यान पुन्हा पुन्हा आरशात बघतो.

नंतर भीत भीत माझ्याकडे पाहातो.

मी तर धार परजून तयारीतच असतो.

मी तीन धारी असल्याने माझ्या एका फटक्यातच त्याच्या गालावर तीन वार होतात!

मी सपासप वार करत सुटतो.

काही जणांच्या ओठांवरपण हल्ला चढवतो.

कधी माझा अँगल चुकला तर..

माणसांचं रक्त निघतं.

तो घाबरून ‘आय् ऊई’ करतो.

पण मी मागे वळून पाहात नाही..

आपल्याला ‘धार आहे, तर डर कशाला?’

मग तो माणूस तोंडावर फटाफटा पाणी मारतो.

आणि उगाच आमच्या पुढ्यात शाईन मारायला

चेहर्‍यावरून दोन-तीनदा हात फिरवतो.

आरशात पाहात वेड्यासारखा हसतो.

तेव्हा..

हे आमचं फेसाळ गँगवॉर संपतं.

मग मी आणि ब्रशराव... 

त्या माणसाच्या नावाने आंघोळ करतो.

कपाटात जाऊन निवांत बसतो.. ..

दुसर्‍या दिवसाची वाट पाहात!

वाचा राजीव तांबे यांची आणखी एक कथा 

चोळके कुटुंबीय

 

-राजीव तांबे

[email protected]