भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म १३ मार्च १८६५ साली पुणे येथे झाला. कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. आनंदीबाईंचे लहानपणीचे नाव यमुना असे होते. त्यांच्यातील कुशाग्रता, एकपाठीपणा, ज्ञानलालसा या गुणांमुळे गणपतराव नेहमी यमुना भविष्यात खूप मोठी होणार याची ग्वाही देत असे.

वयाच्या ९ व्या वर्षी आपल्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळरावांशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी तिचे नाव आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे पोस्ट खात्यात कारकून होते. त्याकाळात समाजात स्त्रीशिक्षण स्त्रीजीवन, विधवा विवाह, पतीपत्नीसंबंध, विवाह याविषयी जे विचारमंथन चालू होते त्याचा गोपाळरावांच्या जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला होता. ते लोकहितवादी विचारांचे होते. आनंदीबाईंना शिक्षणाची आवड आहे हे त्यांनी जाणले व त्यांनी तिला शिकविण्यास सुरुवात केली. आनंदीबाईंनीही इंग्रजीसह इतर भाषांचेही ज्ञान पटकन अवगत केले.

लग्नानंतर वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलास जन्म दिला. पण दुर्दैवाने अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे ते मूल दहा दिवसांपेक्षा जास्त जगू शकले नाही. हीच घटना आनंदीबाईंना डॉक्टर बनण्यास कारणीभूत ठरली.

आनंदीबाईंनी शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असे गोपाळरावांना वाटले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहारही केले. गोपाळरावांच्या या निर्णयाला समाजाने कडाडून विरोध केला. पण २४ फेब्रुवारी १८८३ ला झालेल्या जाहीर सभेत अस्खलित इंग्रजीतून भाषण करून समाजाचा विरोध मोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परिणामत: त्यांच्या या कार्यासाठी भारतातून आर्थिक मदतही मिळाली. आनंदीबाईंची तळमळ व गोपाळरावांची चिकाटी यांचे त्यांना फलित मिळाले.

अमेरिकेत वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्हानिया’ मध्ये आनंदीबाईंना प्रवेश मिळाला. शिक्षणासाठी बोटी प्रवासाने अमेरिकेत एकट्या गेलेल्या आनंदीबाईंची वातावरणामुळे व प्रवासामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. पण कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूरा करून मार्च १८८६ मध्ये त्यांनी एम. डी. पदवी मिळवली. त्यासाठी आनंदीबाईंनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र या विषयावरील प्रबंध सादर केला होता. यासाठी व्हिक्टोरिया राणीने ही त्यांचा सत्कार केला होता. पदवीदान समारंभास त्यांचे पती गोपाळराव व पंडिता रमाबाई स्वतः हजर होत्या. या समारंभात ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली. आनंदीबाईंचे स्वप्न साकार झाले होते.

आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव झाला. कोल्हापूरमधील ‘अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल’मधील स्त्री कक्षांचा ताबा त्यांना देण्यात आला होता. वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. त्यांचे उपचार करण्यास कोणीही तयार नव्हते. परिणामत: २६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.

स्वतःच्या देशातून झालेला विरोध, टीका व अमेरिकेतील समाजाकडून झालेला त्रास या सगळ्यांनी न खचता आनंदीबाईंनी आपले ध्येय पूर्ण केले. ज्या काळात स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडणे उचित समजले जात नसे त्याकाळात आनंदीबाई एकट्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. आपल्या समाजासमोर खंबीरपणे उभे राहून समाजाला भाषणातून आपले विचार पटवून दिले.

समाजात राहून काम करायचे असेल तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे हे महत्त्वाचे. आपली भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा त्याग न करता आपले स्वप्न पूर्ण करता येते हे डॉ. आनंदीबाईंनी शक्य करून दाखवले. परदेशातही आपल्या संस्कृतीचा आदर कायम असावा असे संबंध त्यांनी प्रस्थापित केले होते. म्हणूनच अमेरिकेतील कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राम्हण कन्या परदेशात शिक्षण घेवून डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक बांधले.

एकवीस वर्षाची आनंदीबाईची ही जीवनयात्रा खरंच कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीसमोर एक प्रेरणास्त्रोतच आहे.

महिलादिन सप्ताहातील पाचवा लेख वाचा खालील लिंकवर 

वैज्ञानिक अपर्णा जोशी

-गीतांजली अहिरे

[email protected]