भारतातून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणारे व त्यासाठी रांग लावून बसलेले अनेकजण आपल्याला माहिती असतील. परंतु उच्च शिक्षणासाठी भारतात येणारी व भारताच्या प्रेमात पडून इथेच राहून शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम उभी केलेली कुणी व्यक्ती आहे आणि तीही एक महिला आहे, असे जर कुणी सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला नक्कीच कठीण जाईल.

१९६६ साली, ज्याकाळी भारताविषयी, येथील राहणीमानाविषयी इतर जगाचे मत फारसे चांगले नसताना डॉक्टर मॅक्सिन बर्नसन वयाच्या ३१ व्या वर्षी, "फुलब्राइट-हेज फेलोशिप च्या माध्यमातून "पश्चिम महाराष्ट्रातील फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’ या विषयावर काम करण्यासाठी फलटण येथे आल्या व तिथेच रमल्या. ७ ऑक्टोबर १९३५ ला अमेरिकेतील एस्कनाबा, मिशिगन येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. केले. १९६६ साली फलटण येथे येण्याआधी त्या १९६१ मध्ये हैद्राबाद येथील विवेकवर्धिनी कॉलेज मध्ये इंग्रजी शिकवत होत्या. मात्र दोन वर्षांनी त्या अमेरिकेत परतल्या. त्या दरम्यान त्यांना भाषाशास्त्र व भारतीय भाषांमध्ये पीएच. डी. करण्यासाठी फेलोशिप मिळाली व त्यांचा पुन्हा एकदा भारताकडे येण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला.

कोणतीही भाषा घोकंपट्टी करून फाडफाड बोलता यायला लागली म्हणजे आपण त्या भाषेत पारंगत झालो असे होत नाही. प्रत्येक भाषा ही त्या परिसरात नांदणाऱ्या संस्कृतीच्या गरज पूर्ण करण्याच्या निमित्ताने उदयाला आलेली असते व व्यवहारातील जास्तीत जास्त वापराने समृद्ध होत असते, त्यामुळे जर भाषा मुळातून शिकायची असेल तर, ती भाषा बोलणाऱ्या माणसांची संस्कृती आधी समजून घेणे आवश्यक आहे. भाषाशास्त्रात उच्च शिक्षण घेतलेल्या डॉक्टर मॅक्सिन बर्नसन यांना हे नक्कीच माहिती होते, म्हणूनच त्यांनी पुणे, मुंबई अशा त्यातल्या त्यात सुखसोयी असलेल्या शहरांची निवड न करता, फलटण सारख्या भागात येण्याचा व मराठी कुटुंबात राहून ग्रामीण संस्कृती व त्यातून मराठी भाषा शिकण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी मराठी शिकायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात मराठी भाषेतील अनेक धारदार व टोकदार शब्दांचा "मार" सहन करता करता, मराठी भाषा हिंसक वगैरे आहे कि काय अशी शंका येऊ लागली होती! मात्र जशी जशी त्यांची मराठी भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, सणसमारंभाच्या निमित्ताने ऐकलेली गाणी, अभंग यांच्याशी ओळख होऊ लागली तशा त्या मराठी भाषेच्या प्रेमात पडत गेल्या. हळूहळू फलटण देखील त्यांच्या प्रेमात पडले आणि त्या सगळ्यांच्या लाडक्या मॅक्सिन मावशी झाल्या. अमेरिकेचे नागरिकत्व म्हणजे स्वर्गाच्या दाराची किल्ली आहे असे मानण्याच्या काळात त्यांनी १९७८ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व रद्द करून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. एकीकडे फलटण भागातील भाषेचा अभ्यास सुरु असताना, फलटण येथील जाई निंबकर यांच्या मदतीने त्यांनी अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचे काम सुरु केले. लोकांसोबत त्यांच्या गाठीभेटी वाढत होत्या, गप्पा होत होत्या, त्यातून त्यांच्या एक लक्षात आले इथे भाषा व शिक्षण यांचा परस्परांशी असलेला अतूट संबंध लोकांच्या अजून पुरेसा लक्षात आलेला नाही. त्यामुळे आपल्याला भाषेवर काम करता करता शिक्षण क्षेत्रात सुद्धा काम केले पाहिजे.

त्यांनी परिसरातील भाषेतून शिक्षण देणारी व मुलांना त्यांच्या भाषेत व्यक्त होण्याची संधी देणारी शिक्षणपद्धती या दोन संकल्पना समोर ठेवून काम सुरु केले. परिसरातील भाषेतून शिक्षण घेणे का आवश्यक आहे या विषयावर त्यांनी अनेक लेख लिहिले.

मुलाला शिकवायचे तर ते आधी शाळेत आले पाहिजे हा विचार करून त्यांनी सुरुवातील फलटण मधील दलित वस्तीमध्ये  घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांना शिकवायला सुरुवात केली. फलटण मध्ये सहजपणे फिरता यावे म्हणून त्यांनी चक्क एक रिक्षा घेतली व त्या स्वतः ती रिक्षा चालवायला देखील शिकल्या! फलटण मधील प्रसिद्ध प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत. आज ही संस्था महाराष्ट्रात प्रयोगशील व कृतिशील शिक्षणाची पंढरी मानली जाते. दोन वर्षांपूर्वी आम्ही या शाळेला भेट द्यायला गेलेलो असताना तिथे मॅक्सिन मावशींना भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी जवळपास दोन तास गप्पा झाल्या. त्यावेळी आम्ही आमच्या मुलासाठी "चांगली" शाळा शोधत होतो. पण चांगली शाळा शोधायची तर, चांगली शाळा म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट असले पाहिजे म्हणून आम्ही अनेक शाळा, त्यांची कार्यपद्धती बघत होतो, तरीही आमची संकल्पना म्हणावी तशी स्पष्ट होत नव्हती. शेवटी "चांगली शाळा" म्हणजे काय हा प्रश्न आम्ही थेट मॅक्सिन मावशींनाच विचारला.

त्यावर त्या म्हणाल्या, "चांगली शाळा म्हणजे भरपूर फी असलेली, चकाचक व मोठी इमारत असलेली , चांगला युनिफॉर्म किंवा चांगली स्कुल बस असलेली शाळा नाही, तर चांगली शाळा म्हणजे ती शाळा, ज्या शाळेतल्या शिक्षकांचे मुलांवर मनापासून प्रेम आहे व प्रत्येक मूल समजून घेऊन त्याला त्याच्या कलाने, गतीने शिकण्याची संधी देण्याची शिक्षकांची तयारी आहे अशी शाळा. मॅक्सिन मावशींनी उभी केलेली प्रगत शिक्षण संस्थेची शाळा त्यांच्या "चांगल्या" शाळेच्या व्याख्येप्रमाणेच काम करत आहे, हे ती शाळा बघितल्यावर आमच्या लक्षात आले त्यांच्याशी बोलताना त्या जेंव्हा शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीचे किस्से सांगत होत्या, त्यावेळी त्यांचे मुलांवर असलेले प्रेम, शिक्षणाविषयी असलेली तळमळ व मुलांना आहे तसे स्वीकारून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची मनापासून असलेली इच्छा लक्षात येत होती.

मॅक्सिन मावशींनी मराठी अभ्यास परिषदेची स्थापना करण्यात देखील पुढाकार घेतला होता. १९९३ मध्ये सातारा इथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांच्या भाषा व शिक्षण क्षेत्रातील कामासाठी गौरविण्यात आले. त्यांना अनेक सरकारी व सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. वयाची ८० वर्षे पूर्ण होऊनसुद्धा त्या आजही हैद्राबाद इथे भाषा व शिक्षण क्षेत्रात हिरीरीने काम करत आहेत. त्यांची मराठी भाषेविषयी असलेली तळमळ इतकी मनापासून आहे की, त्या स्वत:तर कटाक्षाने मराठीतून बोलतातच, मात्र इतरांनाही मराठीतून बोलण्याचा आग्रह करतात, त्यासाठी जे आवश्यक असतील, ते प्रयत्न सुद्धा करतात. त्यांच्या घराच्या दारावर असलेली "शिव्या द्या, पण त्या मराठीतून द्या" ही पाटी, त्यांच्या मराठी प्रेमाविषयी बरेच काही सांगून जाते!

साधे नोकरीचे ठिकाण बदल्यावर, दुसऱ्या शहरात मी कसे जुळवून घेणार,याची भीती वाटून, नोकरी सोडून देणाऱ्या अनेक पुरुष व महिलांची उदाहरणे डोळ्यासमोर असताना, अमेरिकेसारख्या प्रगत देशातून भारतासारख्या देशात येऊन भाषा व शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या डॉक्टर मॅक्सिन बर्नसन यांचे आयुष्य फक्त महिलांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

महिलादिन सप्ताहातील तिसरा लेख

स्व.कमलाताई काकोडकर

-चेतन एरंडे

[email protected]