ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या मातोश्री कमलाताई काकोडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १९२४ साली झाला. त्या काळात स्त्रियांना शालेय शिक्षण घेणे फार कठीण होते, तरीही त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर इथे घेतले. त्यानंतर त्यांचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. त्या काळातली व्हर्नाक्युलर फायनल आणि कर्वे विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. तिथेच त्यांना महात्मा गांधी, विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, कस्तुरबा यांच्यासारख्या महतींना जवळून पाहता आले. या आश्रमात त्यांना आत्मनिर्भरता, कार्यक्षमता आणि स्वावलंबनाची शिदोरी मिळाली, आयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर न डगमगता मात करण्याचे बाळकडू मिळाले आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. विशेषतः काटकसर आणि साधेपणा हे संस्कार त्यांनी मुलांमध्ये रूजवले.

१९४१ मध्ये त्यांचे गोव्याच्या पुरुषोत्तम काकोडकर या राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या कार्यकर्त्याशी लग्न झाले. १९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ किंवा ‘भारत छोडो’ आंदोलनात कार्यकत्यांची गरज म्हणून दोघे मुंबईला आले आणि त्यांनी भूमिगत होऊन त्यात सक्रिय भाग घेतला.

भूमिगत कार्यकर्त्यांच्या जेवण-खाण्यापासून ते वेशांतर करून निरोप पोहोचवणे, पत्रके वाटणे, घरात स्थापन करण्यात आलेले भूमिगत रेडिओ केंद्र चालविणे अशासारखी जोखमीची कामे सतरा - अठरा वर्षांच्या कमलाताई करत. पुढे गोव्याच्या स्वातंत्र्याच्या सत्याग्रह आंदोलनात पुरुषोत्तम काकोडकरांना ९ वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर कुटुंबाचा सगळाच भार कमलाताईंनी पेलला. नोकऱ्या करून कुटुंबाचा गाढा ओढला. तत्कालीन शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या शिशुविहारात त्यांनी माँटेसरीचे प्रशिक्षण घेतले. आणि मध्य प्रदेशातल्या खरगोण नावाच्या गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी ती शाळाही सोडून त्या मुंबईला आल्या आणि तिथल्या खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. मुलगा डॉ. अनिल काकोडकर आणि मुलगी जान्हवी यांना उत्कृष्ट दर्जाचे उच्च शिक्षण देण्यासाठी कमलाताईंनी खूप कष्ट घेतले. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुद्धा ओलांडायला घाबरत असत, त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही.

प्रसिद्ध व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे डॉ. अंजली कुलकर्णी आणि डॉ. अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून लिहिलेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा‘ या नावाच्या एका सुरेख पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देताना काकोडकर आजींनी सांगितले होते, "प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं..." त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे की, "रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुसऱ्या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुसऱ्याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल."

त्या आयुष्यभर नेहमी खादीची साधी-सुती वस्त्रेच वापरत राहिल्या.  त्यांच्या आत्मचरित्राचे नावसुद्धा त्यांनी ‘एक धागा सुताचा – स्वातंत्र्याची स्मृतीचित्रे’ असे ठेवले आहे. स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले, पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्याचा लढा ते स्वातंत्र्यप्राप्ती, ते आणीबाणी, ते टेलिकॉम क्रांती, ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलू शकणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई होत्या. २०१३ मध्ये वृध्दापकाळातल्या अल्पशा आजाराने त्यांचे ठाणे येथे दुःखद निधन झाले.

अणुशक्तीनगरमध्ये राहात असताना कमलाताई आमच्या नेहमीच्या पाहाण्यातल्या होत्या आणि ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांचे वागणे, बोलणे अत्यंत साधेपणाचे आणि आपुलकीचे असायचे, त्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नसायचा. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हतेच. वर उल्लेखलेल्या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला मी उपस्थित राहिलो होतो. त्या वेळी इतर सन्मान्य व्यक्तींनी केलेल्या भाषणांमधून मला त्यांच्यासंबंधी इतकी माहिती समजली.

स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व. कमलाताई काकोडकर. आम्हाला ते रूप पाहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

महिलादिन सप्ताहातील  दुसरा लेख 

जगावेगळी : डॉ. वसुधा आपटे 

 -आनंद घारे

[email protected]