आज ‘शिक्षणविवेक’ आणि ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला लिहू काही’ कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे नियोजन दोन सत्रांत केले होते. त्यामध्ये पहिले सत्र हे मुलाखतीचे आणि दुसरे सत्र हे लेखन कौशल्य विकसनावर आधारित होते. या कार्यशाळेत १३ शाळांमधील एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे वाई येथील काही शाळा या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.   

कार्यशाळेची सुरुवात ‘महर्षी कर्वे’ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पहिल्या सत्रात ‘बाल साहित्यिक ल. म. कडू’ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत फेसबुक लाईव्ह करण्यात आली होती. (आताही ही मुलाखत तुम्ही फेसबुक पेजवर पाहू शकता.) ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना ल.म. कडू यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना  ल. म. कडू. यांनी उदाहरणादाखल आपल्या आयुष्यातील काही अनुभव, गमतीशीर गोष्टीदेखील सांगितल्या. आपले लेखन समृद्ध करायचे असेल तर आपण सतत आपल्या आजूबाजूचे निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे वारंवार ते सांगत होते. तसेच लेखन, चित्रकला, बागकाम, फिरणे हे सगळे आपले आवडीचे छंद आहेत आणि छंद हे अनेक असू शकतात असे देखील त्यांनी सांगितले. प्रश्नासोबतच २ विद्यार्थिनींनी स्वरचित कवितादेखील वाचून दाखवली.    
मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना संस्थेचे संग्रहालय आणि ग्रंथालय दाखवण्यात आले. काही ग्रंथ विद्यार्थ्यांनी चाळले. तेथील आर्किटेक्चरच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी या लहान मुलांनी संवाद साधला. संग्रहालय आणि अद्ययावत ग्रंथालय पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.  

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात लेखन कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने ‘लेखन कसे करावे’, यासंदर्भात शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबतच ‘शिक्षणविवेक’च्या उपक्रम प्रमुख यांनीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कथा, कविता, लेख यांची तांत्रिक बाजू मांडल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचवेळी प्रत्यक्षात काही ठराविक विषयांवर लेखन करण्याची संधी देण्यात आली होती.   

या वेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिल माणकीकर कार्यशाळेला उपस्थित होते. अशा प्रकारे 'चला लिहू काही...’ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

-प्रतिनिधी

[email protected]