आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा ८ वर्षांचा  सिफर लहान मुलांचे (शालेय विद्यार्थ्यांचे) वाचनालय चालवणार अशी बातमी साधारण वर्षापूर्वी आली. सिफर ते आजही चालवतो आणि तेही अगदी साध्या पद्धतीने, एकमेकांनी दिलेली, त्याची स्वतःची  पुस्तके जमवून, पैशांची विशेष देवाणघेवाण न करता, हे वाचनालय व्यवस्थित चालतेही. याचे वाचकही वाढले आहेत. थोडक्यात वाचनसंस्कृती वाढते आहे.  

असे वाचनालय चालवायची इच्छा लहान मुलाची असेल का? इतका लहान असूनही तो हे कसे करू शकतो? आणि  त्याला त्याचे आई-बाबा हे करूच कसे देतात? हे प्रश्न बातमी ऐकल्यावर सामान्य व्यक्तीसारखे माझ्याही मनात आले. पण जेव्हा सिफरच्या कुटुंबाला भेटले तेव्हा सगळाच उलगडा झाला होता. 

त्याविषयी अधिक सांगतेच. पण आताची महत्त्वाची बातमी काही औरच आहे. सिफर आणि त्याच्या संघाला यंदाच्या एफ एल एल या रोबोटिक्सच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या  स्पर्धेत ९ ते १२ या वयोगटासाठीचे बक्षीस मिळाले. आणि विश्वेश म्हणजे सिफरच्या बाबाने ज्या रोबोटिक्सच्या इतर संघांना प्रशिक्षण दिले होते, त्यातल्या ५ पैकी ३ संघांना चषक मिळाले, तर ४ पैकी २ संघ आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.

रोबोटिक्सचे बक्षीस म्हणजे आई-बाबांनी मदत केली असणार; त्यांनीच बनवून दिले असणार असे अनेकांसारखे मला वाटणे मात्र थांबले होते. कारण मी जेव्हा वाचनालय सुरू करणाऱ्या सिफरच्या कुटुंबियांना भेटले तेव्हाच उलगडा झाला की त्याचे कुटुंबच वेगळे आहे. वेगळे म्हणजे, काही शिंग-बिंग असणारे नव्हे, तर वेगळा विचार करणारे पालक सिफरला मिळाले आहेत. (तसे पालक अजूनही असतील. अशा पालकांनी त्यांचे अनुभव प्रतिक्रियांमध्ये नक्की लिहा. एकमेकांच्या टिप्सचा एकमेकांना उपयोग होईलच.)

चला तर मग बघूया, ते वेगळे म्हणजे काय? आणि पालक वेगळे असले की पाल्यही कसे वेगळे होते? म्हणजे पालकत्वाच्या टिप्स म्हणा की! पण फक्त त्या नाही बरं का? त्यांच्या टिप्समधून रोबोटिक्सचे महत्त्व, मुलांचा 'कॉमन सेन्स' कसा विकसित करायचा, तर्कशुद्ध विचारसरणी कशी विकसित करायची, वैज्ञानिक दृष्टीने विचार कसा करायला लावायचा अशा गोष्टींवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

स्मिता आणि विश्वेश जिरगाळे दोघेही आय.टी.मध्ये काम करणारे होते. संध्याकाळी आल्यावरच मुलाला वेळ देऊ शकायचे. तोपर्यंत सिफर आजी-आजोबांबरोबरच   राहायचा. पण आई-वडील, आजी-आजोबा यांना घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगायची सिफरला सवय लागली. (सवय लावायला प्रयत्न करायला लागतात हे चाणाक्ष वाचकांना सांगायला नकोच.) रोजच्या रोज घडणाऱ्या गप्पांमधून पालकांनी जगातल्या घडामोडी, गाणी, गोष्टी, चित्रपट, खेळ या सगळ्यांचे भान त्याला दिले. मुख्य म्हणजे सिफर आई-बाबांना कधीही काहीही सांगू शकतो हा विश्वास, त्यासाठीचा वेळ पालकांनी त्याला दिला. त्यासाठी ऑनसाईट जाणे टाळले.  जे चित्रपट तो पाहू शकतो तेच चित्रपट पाहणे, जे तो खाऊ शकतो असेच पदार्थ खाणे, ज्या कार्यक्रमांना त्याला नेता येईल अशाच कार्यक्रमांना जाणे, जे सिफरने वाचलेले चालेल असेच त्यांनी वाचणे, त्याने जी गाणी ऐकावीत अशीच गाणी ऐकणे हे काटेकोरपणे पाळल्याचे आई स्मिता सांगते. थोडक्यात पालक वेगळे काही करणार आणि मुलांना करू नका सांगणार असे त्यांनी कधीच केले नाही. पालक आणि पाल्य यातली अहंमुळे येणारी भिन्नता त्यांनी काढून टाकली. किती महत्त्वाचे आहे नाही का हे?

विश्वेशने सिफर लहान असतानाच त्याला गाण्याचे कार्यक्रम बसवताना, नाटक बसवताना न्यायला सुरुवात केले. (विश्वेश स्वतः नाटकवाला आहे. त्याला गाण्यात रस आहे. बाल गीतरामायण यासारखा कार्यक्रम बसवणे, कॉम्प्लेक्समधल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे हे गुण विश्वेश आणि स्मिता या दोघांमध्येही आहेत. प्रत्येक पालकात काही ना काही सकारात्मक गुण असतात. ते वापरायचा प्रयत्नही पालक करत असतात.) तिथले निरीक्षण त्याला रोबोटिक्समध्ये कामी आले हे सांगायला नकोच. याशिवाय आज सिफर एक हिंदी व्याकरणातल्या संज्ञा समजावणार नाटक शाळेसाठी लिहीत आहे. तो पाहून-पाहूनच हे शिकला आहे. विश्वेशने त्याला कुठलाही खेळ मोडून परत जोडायला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तो लेगोपासून वेगवेगळी तोड-जोड खेळणी खेळला. त्याचे हेच गुण विश्वेश आणि स्मिताने हेरले आणि त्यात त्याला प्रोत्साहन द्यायचे ठरवले. कुठल्याही गोष्टीमागचे कारण जाणून घ्यायची सवय लागावी म्हणून प्रत्येक वेळी त्याला 'का' हा प्रश्न विचारला. त्यातूनच मग इलेक्ट्रिक सॉकेटला ३ भोकं का असतात? एच टू ओमधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे काढता येते का? पंख्याची गती कमी जास्त का होऊ शकते? असे विविध प्रश्न विचारत त्यामागची कारणे त्याला इंटरनेट, शिक्षक, इतर मोठे अशांची मदत घेत स्वतः ठराविक शोधायला लावली आणि सिफरने ते आव्हान लीलया पेलले. त्यासाठी त्याने इंटरनेटचाही वापर केला. इंटरनेट वापरू नको म्हणण्यापेक्षा त्यात योग्य ते फिल्टर्स लावून सिफरच्या आई-बाबांनी दिले.  त्याची उत्सुकता कशी वाढवायची आणि त्याची उत्तरे त्याने कशी मिळवायची यावर सिफरच्या आई-बाबांनी भर दिला.

या सगळ्यातूनच सिफर रोबोटिक्सकडे वळला. सिफरला ते शिकवायला लागल्यानंतर विश्वेशने स्वतः रोबोटिक्स टीमला प्रशिक्षण देऊ शकण्याची कल्पना अस्तित्वात आणता आली. सिफरने यंदा सलग दुसऱ्यांदा रोबोटिक्समध्ये भाग घेतला. बक्षीस मिळवले. पहिल्यांदा सिफरने जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा म्हणजे मुलांना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यावे यासाठी प्रयत्नरत असणारी स्पर्धा! दोन महिने मुलांना रोबोट बनवायला देऊन प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी रोबोट २ तास आधी तिथे असेंबल करणे  आणि स्पर्धेतल्या  गरजेप्रमाणे त्यातल्या प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करणे, सेन्सर्सचा योग्य वापर करणे हे सगळे काम संघाने करून अडीच मिनिटात करून दिलेले काम त्यांच्या रोबोटने करायचे असते. उदा., फूड वेस्टेज हा विषय असला, तर कच्च्या फळांना नेमके कुठे ठेवायचे, अर्ध्या कच्च्या फळांना मॉलसारख्या जागेत न्यायचे, पिकलेल्या फळांना ज्यूस विभागात न्यायचे अशी कामे रोबोटला दिली जातात. एका कार्पेटवर छोटे छोटे विभाग करून त्यांना मॉल, ज्यूस सेंटर अशी नावे दिली जातात आणि त्यात संघाच्या २ तासात उभारलेल्या रोबोटने हे सगळे करायचे असते. अशा स्पर्धांमध्ये जरी आधी दोन महिने सराव केला, तरी प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी त्यांचा कस लागतोच. जागतिक रोबोटिक्सपेक्षाही एफ एल एल ही रोबोटिक्सची स्पर्धा वेगळी आहे. त्यांच्या वेबसाईटवर पाहिले तर जगभरातल्या संघांना वर्षभरात कधी नाव नोंदवता येईल, विषय (समाजातल्या महत्त्वाच्या समस्येचे विषय यात असतात) काय असेल, नेमके काय काय करून पाहायचे आहे अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. भारतातल्या पुढच्या पिढीला या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आणि शाळांनाही या क्षेत्रात करण्यासारखे खूप काही आहे.

रोबोटिक्सची एफ एल एल ही  स्पर्धा मुलांना, विद्यार्थ्यांना माहिती जमवण्यापासून, त्याचे शास्त्रशुद्ध संशोधन करणे, प्रश्नाची उकल शोधणे आणि प्रत्यक्ष काम करणे म्हणजे ठरवलेल्या भागात प्रत्यक्ष काम करण्यापर्यंत, सगळे करायला लावते. म्हणजेच यात केवळ रोबोटिक्स नाही, तर जीवनात उपयुक्त ठरणारे गुण शिकवण्याचा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानात, तंत्रज्ञानात रस निर्माण व्हावा याचा प्रयत्न असतो. त्यांच्या संघकौशल्याला गुण असतात. हल्लीच्या एकेकट्या मुलांच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचे आहे. ही स्पर्धा ९ ते १६ अशा वेगवेगळ्या वयोगटात असते. या प्रत्येकच वयात कोणत्याही एकत्र आलेल्या ३ ते १० जणांच्या संघाने एकमेकांचे ऐकणे, वेगवेगळ्या कामांची विभागणी करून घेणे, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, एकमेकांत समजूतदारपणा असणे, त्यांना विषय पूर्णपणे समजणे, समस्यांचे निराकरण करता येणे, अनोळखी स्पर्धकांबरोबर ठराविक वेळेत सरस ठरण्याची स्पर्धा करणे, आपले प्रोजेक्ट-अहवाल योग्य पद्धतीने सादर करणे, २ दिवस एका स्टॉलवर त्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांना तो समजावून देणे, त्यासाठी प्रेक्षक खेचून आणणे अशी या युगात जगण्यासाठीची कौशल्ये शिकवणारी ही स्पर्धा असते. याशिवाय एफ एल एलचे गुण रोबो, जबाबदाऱ्यांची विभागणी, प्रोजेक्ट, संघाची मूल्य या आधारावर समान पद्धतीने केली जाते. म्हणूनच विश्वेशसारखे बरेच पालक या स्पर्धेचा पुरेपूर वापर करतात.

यंदाच्या एफ एल एलमध्ये हायड्रोडायनॅमिक्स हा विषय होता. विश्वेश, प्रकल्पा-क्रिसने प्रशिक्षक म्हणून संघांना 'जीवितनदी'च्या रिव्हर वॉकला नेले. मुळा-मुठा नदीत जे प्रदूषण झाले आहे ते त्यांना दाखवले आणि त्या समस्येचे निराकरण करणारे प्रकल्प ४ संघांनी ठरवले. सिफरच्या संघाने प्रदूषण टाळावे म्हणून 'कंपोस्टिंग टॉयलेट' हा प्रकल्प राबवावा असे संशोधन करून  ठरवले. नदीत जाणारे मानवी मलमूत्र थांबवणे यासाठी हा पर्याय होता. त्यासाठी या मलमूत्राचे खत तयार करणे हा पर्याय निवडून हा संघ प्रत्यक्ष ५ शाळांमध्ये गेला. त्या शाळांमध्ये या प्रकल्पाचे सादरीकरण  केले. त्याची प्रत्यक्ष स्पर्धेतही प्रकल्प स्वरूपात मांडणी केली. त्यासंदर्भात परीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली. इतर संघांनी वॉशिंग मशीनसाठी रिठ्याची पावडर बनवली, काहींनी ऍलगे ही वनस्पती वाढवून ती नदीत सोडली. पाण्याचा वापर किती होतोय हे पाहण्यासाठी घरगुती वापरासाठी काही अँप तयार केले. हे सगळे मुले करू शकली. कारण त्यांना विचार करायला लावण्यात आला.

जी संस्था मुलांना रोबोटिक्ससाठी  स्वतः उकल काढून देते, अर्थातच त्यांचे हे सगळे गुण सिद्ध होऊ शकत नाहीत. पण जिथे मुलांना विचार करायला लावला जातो, त्या संस्थेतल्या मुलांना संकल्पना स्पष्ट होतात, मुलाखतीत ते सर्व उत्तरे देऊ शकतात. क्रिस आणि प्रकल्पा बस्तिनपिल्लाइ हेही या क्षेत्रातले असे प्रशिक्षण देतात. त्यांचा पूर्ण भर मुलांनी स्वतः सगळे करण्यावर असतो. त्यांच्याच बरोबर विश्वेश आणि स्मिता सारखे पालक काम करत असतात. कारण जर मुलांना विषय मुळात समजला नाही, तर अर्ध्या तासातल्या परीक्षकांच्या मुलाखतीत ते सरस ठरतच नाहीत.

विश्वेशच्या मते, या पिढीच्या करिअरमध्ये सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअरला महत्त्व येणार आहे. मूलभूत विज्ञान, नवनवीन शोध यांचा जमाना येणार आहे. त्यामुळे ते मुलांना यावे असे वाटत असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी यांची गरज आहे. ते आपल्या मुलाला कसे देता येईल याचा विचार पालकांनी करायला हवा. त्यासाठी अशा स्पर्धा खूपच उपयुक्त आहेत, पण जसे विश्वेश स्मिताने सिफरची आवड या क्षेत्रात आहे हे तपासूनच त्याला पुढे नेले, मदतीचा हात  दिला, तसे करण्याची गरज पालकत्व क्षेत्रात निर्माण झाली आहे. अशा स्पर्धा जर मुलांचे विश्व समृद्ध करणार असतील, तर त्यासाठी सिफरची शाळा बुडवायला लागली, एका परीक्षेवर गदा आली, अन्य स्पर्धा परीक्षा देता आल्या नाही, हे सगळे स्मिता विश्वेशने मान्य केले. पालकांना हे समजून घेणे महत्वाचे आहे के पाल्यांच्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचे आहे. सिफरच्या आयुष्यात रोबोटिक्सच्या स्पर्धांनी खूप बदल झाला. आता तो खूप आत्मविश्वासाने विषय समजावून देऊ शकतो. त्यातली संकल्पना त्याला पूर्णपणे समजलेली असते. तो एकत्र काम करायला शिकला. त्याचे सादरीकरण खूपच सुधारले. कुणाशी कसे बोलावे आणि कुणाला कोणत्या पातळीवर समजावून द्यावे हे सिफरला समजले. मूल्यरचना समजावून घेऊ लागला. असाच तुमचे आमचे पाल्य होवोत, ही साठी अशी सुफळ प्रार्थना . 

 
-पल्लवी गाडगीळ