सेलिब्रेटी म्हणजे ख्यातनाम किंवा प्रसिद्ध व्यक्ती. विविध क्षेत्रांतील अनेक सेलिब्रेटी तुम्हाला माहीत असतील. समाजात अशाही काही व्यक्ती आहेत, जे विधायक काम करून प्रसिद्धीपासून लांब राहतात. अशा एका व्यक्तीची ओळख या आजच्या लेखात आपण करून घेऊ या...

विद्यार्थी मित्रांनो, रस्त्याने जाताना किंवा एखाद्या बस स्टॉपवर तुम्ही एखाद्या अंध व्यक्तीला पाहिलेच असेल. कोणाच्याही मदतीशिवाय अंधव्यक्ती आपली कामे बिनदिक्कत करत असतात. अंधव्यक्ती ब्रेललिपीतून शिक्षण घेतात. या लिपीतूनच ते स्पर्शाने वाचन-लेखन करतात. अशा दृष्टिहीन व्यक्तींसाठी स्वागत थोरात यांनी ‘स्पर्शज्ञान’ नावाचे देशातील पहिले पाक्षिक वार्तापत्र सुरू केले.

1997 साली स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अंध कलाकारांना संधी देत स्वागत यांनी पुण्यातील दोन अंध शाळांमधील 88 अंध कलाकारांना घेऊन ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ हे नाटक दिग्दर्शित केले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय रसिक स्नेह्यांच्या मदतीने पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, खोपोली, मुंबई यांसारख्या शहरात या नाटकांचे प्रयोग केले. जागतिक विक्रम करत या नाटकाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्डस आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली.

अंध व्यक्तींकडून अशा नाट्यकृती रंगमंचावर सादर करत असतानाच स्वागत यांच्या लक्षात आले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली, तरीही अंध वाचकांसाठी ब्रेल लिपीत देशात एकही वृत्तपत्र नाही. या जाणिवेने ते अस्वस्थ झाले. दृष्टिहीनांनाही ब्रेल लिपीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर साहित्याचा आनंद घेता यावा, म्हणून स्वागत यांनी ‘स्पर्शगंध’ हा ब्रेललिपीतील दिवाळी अंक सुरू केला. हा दिवाळी अंक महाराष्ट्रातील सर्व अंधशाळा व संस्थांना भेट म्हणून देण्यात आला. दिवाळी अंकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, पण वर्षातून फक्त एक दिवाळी अंक वाचून अंधवाचकांचे समाधान होत नव्हते. त्यांनी ब्रेल लिपीत दर महा काहीतरी नियतकालिक सुरू करण्याची मागणी केली. तेव्हा स्वागत यांनी ब्रेल लिपीत पाक्षिक सुरू करण्याचे ठरवले आणि 15 फेब्रुवारी 2008 रोजी ‘स्पर्शज्ञान’ हे देशातील पहिले नोंदणीकृत मराठी पाक्षिक सुरू झाले. नियमितपणे पाक्षिक छापण्यासाठी त्यांना स्वत:ची ब्रेल छपाई यंत्रणा असणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी ‘स्पर्शगंध’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन थांबवले आणि पैशांची बचत करून अत्याधुनिक ब्रेल छपाई यंत्रणा उभी केली. स्वागत हे काम कोणत्याही शासकीय मदतीशिवाय करत होते. ‘स्पर्शज्ञानचे’ नियमित अंक सुरू झाल्यानंतर त्यांनी समाजातील काही डोळस आणि सामाजिकतेचे भान असणार्‍या लोकांनी या अंकाची वार्षिक वर्गणी भरून, हे पाक्षिक अंध व्यक्तीस किंवा संस्थेस भेट स्वरूपात देता येईल, अशी योजना सुरू केली.

स्पर्शज्ञानच्या अंकात पंधरा दिवसांतील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय-सामाजिक घडामोडींचे विश्‍लेषण, प्रादेशिक वार्तापत्रे, नाटय-चित्रपट परीक्षण, प्रेरणादायी संस्था-व्यक्ती यांच्यावरील लेख, प्रत्येक जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारी लेखमाला, परदेशवार्ता, क्रीडावार्ता, सामान्यज्ञान, प्रश्‍नमंजुषा असे उपयुक्त साहित्य असते. आज महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांतील अंधवाचक या माध्यमातून वाचनाचा आणि जगाबरोबर राहण्याचा आनंद घेत आहेत. स्पर्शज्ञानचे 400 अंक महाराष्ट्रातील अंधशाळा, संस्थांना भेट म्हणून पाठवले जातात. एक अंक साधारण 60 अंधव्यक्ती वाचतात. स्पर्शज्ञानची वाचक संख्या आता 24 हजारांवर पोहोचली आहे. स्पर्शज्ञानच्या दिवाळी अंकास राज्यपातळीवरील अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. 2008च्या दिवाळी अंकास 3, 2009च्या अंकास 5, 2010च्या अंकास 1 अशी पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

स्वागत अंधव्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सतत काम करत आहेत. ब्रेल लिपीच्या संवर्धन व प्रसारासाठी ते सातत्याने कार्य करत आहेत. तसेच डोळस व्यक्तींना ब्रेल लिपी शिकवत आहेत. अंध कलाकारांकडून नृत्य व अभिनय करून घेण्याची व त्यांचे कलागुण इतरांपर्यंत पोहचवण्याची अवघड जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. अंध कलांकारांना घेऊन त्यांनी ‘संगीत समिती स्वयंवर’ ही एकांकिका व ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ हे नाटक दिग्दर्शित केले आहे.

स्वागत थोरात विविध क्षेत्रांत कार्यरत असून त्यांना अनेक पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना ‘नाट्य गौरव पुरस्कार’, ‘महाराष्ट्र दीप पुरस्कार’, ‘स्नेह पुरस्कार’, ‘राजीव गांधी पुरस्कार,’ ‘सॅल्यूट मुंबई पुरस्कार’ याबरोबरच सी.एन.एन.-आय.बी.एन. वाहिनीचा ‘रियल हिरोज’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

- रेश्मा बाठे 

[email protected]