नेटभेट - भाग १

दिंनाक: 07 Feb 2018 15:19:40


मित्रमैत्रिणींनो,

आजचं युग हे संगणकाच युग आहे. तुमची पिढी या इंटरनेटच्या युगातच वाढणार आहे. तुमच्यासाठी चांगली, दर्जेदार गंमत इंटरनेटवर निश्चितच आहे. मोठ्यांच्या वेबसाईटस् क्लिष्ट विषयाच्या, तांत्रिक वेबसाईटस् तुमच्यासाठी नाहीत. पण आनंदी वातावरणात बरंच काही नवं शिकवणाऱ्या वेबसाईटस तुम्हाला नक्कीच आवडतील.या सदरातून आपण अशाच काही संकेतस्थळांची माहिती करून घेणार आहोत. 

इंटरनेटवर ‘यू ट्यूब’ सारख्या चित्रफिती दाखवणार्‍या संकेतस्थळांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मात्र तेथे चित्रफिती मांडताना कोणतेही तारतम्य नसते. अनेकदा लहान वयोगटातील व्यक्तींनी पाहू नयेत असेही व्हिडिओ तेथे असतात.

www.kideo.com ही फक्त किशोर-कुमारवयीन मुलांसाठीच बनवलेली वेबसाईट आहे. पॉवर रेन्जर ग्रेगरी यासारखी गाजलेली पात्रे येथे आढळतात. मात्र काही चित्रफिती विनामूल्य असल्या तरी इतर मात्र खरेदी कराव्या लागतात. Games Book या दालनात काही गाजलेल्या गोष्टी चित्रमय स्वरूपात, खेळांच्या स्वरूपात, चित्र रंगवा स्वरूपात व चित्रफितींद्वारे मांडलेल्या आहेत.

याच कथानकांचा वापर केलेली काही रंगीत ई-कार्डस्सुद्धा येथे आहे. या सर्व सुविधांचा वापर करा. kideo हा आता आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड असल्याने येथील कलाकृतींची गुणवत्ता ही उत्तम व वादातीत आहे.

www.kideo.com ही विनामूल्य वेबसाईट असून येथे सर्वच चित्रफिती लहान मुलांसाठी असून खेळ, प्राणी, मुले, समुद्रचाचे, सुट्टी, पुस्तकातील चित्रनायक यासारखी असंख्य दालने येथे आहेत.

या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुलांच्या वयोगटानुसार चित्रफितींची निवड करता येते. अगदी 2 वर्षांच्या बालकापासून ते 9-10 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडक चित्रफिती येथे आढळतात.

नेहमी येथे येणार्‍या नेटभटक्यांसाठी ‘video of the day‘ सारखी पटकन चित्रफित सुचवणारी सुविधासुद्धा येथे आहे.

मोठ्या मुलांना कागद दुमडून त्यापासून वस्तू - कलाकृती बनवणे आवडते. पण नेहमीच्या ओरिगामीपेक्षा ‘जरा हटके’ कलाकृती कशा बनवाव्यात याचे मार्गदर्शन सोप्या चित्रांसह करणारी एक सुरेख वेबसाईट अवश्य पहा. तिचा पत्ता आहे www.foldplay.com

येथे फोल्डबुक, Kaleido Cycle Invertible Cube यासारख्या धमाल कलाकृती बनवताना तर मौज येईलच, पण इतरांना दाखवाल तर ते थक्कच होतील. भेट म्हणून देण्यासाठी या कलाकृती सर्वोत्तम आहेत.

येथेच असलेल्या पेपर मॉडेल, पॉली पझल यासारख्या कलाकृती व कोडी सर्वच वयोगटातील व्यक्तींना नक्कीच आवडतील.

घडी घालून कागदाच्या कलाकृती घरच्या घरी कशा बनवाव्यात हे जाणून घ्यायचे   असेल   तर en.origami_club.com या वेबसाईटला भेट द्या.

जपानमधील ही कला जगभर पसरली. विविध कलाकृती कातर किंवा गोंद न वापरता तुम्ही बनवू शकता. यासाठी साहित्य म्हणजे केवळ रंगीबेरंगी कागद. इथल्या सूचना अगदी सोप्या शब्दांत आहेत. अक्षरशः शेकडो वस्तू येथे पाहून तुम्ही बनवू शकता. चला... तर सजवा तुमची शोकेस!

- विवेक मेहेत्रे

[email protected]