मोगरा

दिंनाक: 06 Feb 2018 14:25:12


मोगरा या भारतीय वनस्पतीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम सँबॅक असे असून हे झुडपासारखे काहीसे सरळ वाढणारे फुलझाड भारतात सर्वत्र आढळते. ते मूळचे पश्चिम भागातील असावे. याची वेलही असते ती बहरल्यावर हिरव्यागार पानात चांदण्याच लागल्या आहेत असे वाटते. फुलल्यावर ती आपल्या सुगंधाने सर्वांना आकर्षित करते. ती उष्ण कटिबंधात आढळते. ओलीएसी हे तिचे कूळ. पूर्व हिमालाय, भूतान, पाकिस्तान येथे ती सर्वत्र दिसते. इंडोनेशिया या देशाचा राष्ट्रीय फुलाचा मान या फुलाने मिळविला आहे. जाई – जुई, चमेली, नेवाळी याच जात कुळातील.

या वनस्पतीची उंची ३० – ३५ सें.मी. असते. तिला सावली आवडत नाही म्हणूनच तिथे तिला फुले येत नाही. मात्र प्रखर सूर्यप्रकाशात ती बहरते. फुले खूप देते. याची पाने साधी, हिरवीगार, समोरासमोर कधी त्रिदली, बहुधा अंडाकृती गुळगुळीत असतात. फुले पांढरी फार सुवासिक, डबल, एकेकटीही, फांद्यांच्या टोकांना येतात. त्यांना फळे येत नसल्याने बियाही नसतात. म्हणूनच याची रोपे पावसाळ्यात फांद्या लावून करतात ती लवकर येतात. या बहुवर्षायू वनस्पतीची दर वर्षी छाटणी केल्याने फुलांचे प्रमाण वाढते. फुलेही टपोरी येतात.

मोगऱ्याच्या शारीरिक लक्षणांच्या विविधतेमुळे त्याचे चार प्रकार पडतात. १) मोतिया बेलाची – दुहेरी फुले २) बेलाची दुहेरी फुलेच. ३) हजारी मोगरा – एकेरी पण गुच्छ. ४) मुंग्राची फुले पाकळ्यांना बरेच (गोल) वेढे असतात. गोल कळ्यांचा व्यास २.५० सें.मी. असतो. हजारी मोगरा हा मूळ भारतीय नाही तर तो चीन, जपान या देशातील आहे.

लागवड : मोगऱ्याला सर्व प्रकारची जमीन चालत असली तरी ती सुपीक हवी. त्याला कोरडे हवामान; भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. जमीन खोल नांगरून मऊ भुसभुशीत करून त्यात शेणखत वा कंपोस्ट खत मिसळून वाफे वा आळी करून पावसाळ्यात लागवड करतात. ती १ ते १.५ मीटर अंतरावर करतात. ही छाट कलम, बुंध्यातून धुमारे येणे, दाब कलमाने लागवड करतात. झाडावर कळ्या दिसू लागल्यावर भरपूर पाणी देतात. त्यांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात बहर असतो, पण जुलै महिन्यात अधिक बहर येतो. वर्षभर थोडीथोडी फुले येतात. दुहेरी फुले जास्त लोकप्रिय असून उत्तर प्रदेश व तामिळनाडूत त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मोगरा कळ्यांचे माशीमुळे बरेच नुकसान होते. त्या वेळी कृत्रिम पायरेथ्रॉइड कीटकनाशकाची फवारणी केल्याने किडीला बराच आळा बसतो.

मोगरा लोकप्रिय आहे तो त्याच्या सुगंधासाठी. फुलांचा उपयोग गजरे, हार, वेण्या व देवपूजेत सर्वत्र होतो. तसेच उन्हाळ्यात पाण्याला स्वाद आणण्यासाठी माठात मोगऱ्याच्या कळ्या टाकतात. चीनमध्ये तर त्यांचा उपयोग चहाला स्वाद आणण्यासाठी करतात. हा चहा ताप व मुत्ररोगावर गुणकारी आहे. तसेच मानसिक ताणताणाव व उन्हामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मलेशियात केसांना लावण्यासाठी खोबरेल तेलात सुगंधासाठी ती वापरतात. जाईच्या फुलांप्रमाणे याच्या फुलांचा उपयोग सुवासिक द्रव्य, अत्तर करण्यासाठी करतात. याच्या सुगंधी तेलाचा वापर परफ्यूम, अगरबत्ती, साबण, रुमफ्रेशनर करण्यासाठी करतात. पानांचा काढा तापावर देतात. तर जखमा व त्वचारोगावर पानांचे पोटीस करून बांधतात. ह्याचा सुगंध वातावरण उल्हासित करतो व मनही प्रसन्न करतो.

झेंडू या फुलाविषयी माहिती सांगणारा लेख वाचा खालील लिंकवर 

झेंडू

-मीनल पटवर्धन

[email protected]