'विज्ञान' हा हजारो वर्षे जुना संस्कृत शब्द आहे. 'विशिष्ट ज्ञान' असा त्याचा व्यापक अर्थ आहे. पण अलीकडच्या काळात 'विज्ञान' या शब्दाचा उपयोग इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाच्या अर्थाने प्रचलित झाला आहे.  'विज्ञान', 'शास्त्रज्ञ' आणि 'तंत्रज्ञान' हे शब्द मी अनुक्रमे 'सायन्स', 'सायंटिस्ट' आणि 'टेक्नॉलॉजी' या अर्थाने या लेखमालेमध्ये लिहिले आहेत.
 
विश्वामधील निर्जीव पदार्थ आणि सजीव प्राणिमात्र यांचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान हा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. हा अभ्यास आदिमानवाच्या काळापासून चालत आला आहे. प्राचीन भारतामध्ये एक विकसित आणि समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. असंख्य विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी तिच्या प्रगतीला हातभार लावला होता.  त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची ओळख आता उपलब्ध नाही.  
 
कणाद ऋषींनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामधून 'वैशेषिक' नावाचे तत्त्वज्ञान दिले होते. आगीच्या ज्वालांनी नेहमी वरच्या बाजूला जाणे आणि पावसाच्या पाण्याचे वरून खाली पडणे, पाण्याचे जमिनीवरून वाहत जाणे, निसर्गातील  अशा घटनांमध्येही काही कार्यकारणभाव असतो असा विचार त्यात मांडला होता. विश्वामधील सर्व द्रव्ये अविभाज्य अशा सूक्ष्म कणांच्या संयोगामधून तयार झाली आहेत असे प्रतिपादन त्यांनी या चिंतनामधून केले होते, पण पुढे त्यांचा संबंध तत्त्वज्ञानाशी जोडला होता. "मी जे शिकलो आणि प्रयोग करून सिद्ध केले तेच मी या ग्रंथात लिहिले आहे. माझ्या शिष्यांनीसुद्धा स्वतःच्या अनुभवावरूनच त्यावर विश्वास ठेवावा." असे यशोधर नावाच्या विद्वानाने आपल्या ग्रंथात सांगितले होते. ही फक्त दोन उदाहरणे झाली. यातले विचार आधुनिक विज्ञानाच्या जवळचे आहेत. 
 
आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आदि विद्वानांनी काही प्रत्यक्ष निरीक्षणे केली, त्यावर तर्कसंगत विचार केला आणि गणित व खगोलशास्त्रामधले अनेक सिद्धांत मांडले. त्यांच्या ग्रंथांमध्येसुद्धा विज्ञानाबरोबर तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. रूढ विचारांपेक्षा वेगळा विचार करणे आणि तो आपल्या रचनांमध्ये मांडणे याचे भारतामधील विद्वानांना स्वातंत्र्य होते हे त्यातून सिद्ध होते. हे वातावरण विज्ञानाच्या प्रगतीला पोषक होते, पण या प्राचीन विद्वानांच्या वैज्ञानिक विचारांचा प्रसार मधल्या काळात कुठे तरी थांबला, त्यांचे विज्ञान तत्त्वज्ञानात गुरफटलेले राहिले आणि झाकले गेले. 
 
युरोपमधील जुन्या विचारवंतांनी मांडलेले विज्ञानविषयक विचारसुद्धा त्यांच्या तत्त्वज्ञानातले भाग होते. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हा 'नॅचरल फिलॉसॉफी' या नावाने ओळखला जात होता. कोपरनिकस, गॅलीलिओ, पास्कल आदि मध्ययुगामधील शास्त्रज्ञांनी त्याच नावाने आजच्या सायन्स या विषयाचा अभ्यास केला होता. त्यानंतर हे चित्र हळूहळू बदलत गेले. प्रत्यक्ष प्रमाणावर म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानावर जास्त विश्वास ठेवायला हवा, गतकाळातल्या विद्वानांनी जे सांगितले होते तेवढेच बरोबर असा अट्टाहास असू नये असे विचार पाश्चात्य समाजामधल्या विचारवंतांनी मांडायला सुरुवात केली. दोन-तीन शतकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये विज्ञानाला तत्त्वज्ञानापासून वेगळे करण्यात आले. निसर्गनियमांचा अभ्यास अशी सायन्स या नावानिशी त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
 
विज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म फक्त समजून घेऊ शकतात, ते स्वतः नवे नियम तर करू शकत नाहीतच, 
त्यात कणभरसुद्धा बदल करू शकत नाहीत.  विज्ञानामधील शोध, सिद्धांत, नियम वगैरे प्रयोगामधून सिद्ध करता येण्यासारखे असतात. विज्ञानामध्ये तर्कशुद्ध विचाराला महत्त्व असते. एखाद्या सिद्धांतामागे असलेले विचार किंवा प्रयोगामधून केलेली निरीक्षणे यांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढले जातात.  
 
त्यांचे काम सिद्धांत, निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण आणि त्यामधून निघणारे निष्कर्ष अशा क्रमवार पद्धतीने सुसंगतपणे मांडले जाते. इतर तज्ज्ञ त्यावर साधकबाधक विचार आणि चर्चा करतात, त्यांच्या मनातल्या शंका मांडतात, त्यांचे निरसन झाल्यानंतरच ते मान्य केले जाते. अशा प्रकारची वैज्ञानिक पद्धत आज जगभर रूढ झाली आहे.
 
विज्ञानाच्या विकासाबरोबरच तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. प्रयोग करण्यासाठी नवनवी साधने आणि उपकरणे तयार होत गेली. उदाहरणार्थ दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रांमुळे मानवी दृष्टीने पाहण्याची क्षमता अनेकपटीने वाढली. अंतर, आकार, वजन, वेळ आदि गोष्टी मोजण्याची साधने खूप पूर्वीपासून उपयोगात आणली गेली होती आणि त्या गणनांचा उपयोग करण्यासाठी गणितशास्त्राचा विकास झाला होता. विज्ञानामध्ये नेमकेपणाला महत्त्व असल्यामुळे सर्व मोजमापेअचूक असावी लागतात. जसजसे नवे शोध लागत गेले त्याबरोबरच नवनवी उपकरणे तयार केली गेली आणि त्या उपकरणांचा दर्जा सुधारत गेला. अधिक क्षमता असलेल्या चांगल्या उपकरणांच्या साहाय्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेगही झपाट्याने वाढत गेला. 
 
काळाबरोबर विज्ञानाची एक परिभाषा तयार झाली आहे आणि त्यातील प्रत्येक संज्ञेची स्पष्ट व्याख्या केली जाते. उदाहरणार्थ, फोर्स, प्रेशर, स्ट्रेस हे इंग्रजी 
शब्द वाङमयामध्ये कदाचित एकसारखे वाटत असले तरी विज्ञानाच्या परिभाषेत त्यांना विशिष्ट अर्थ आहेत, तिथे एका शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरता येत नाही. सूत्रे आणि समीकरणे मांडण्यासाठी या संज्ञांना काही चिन्हे दिली आहेत, त्यांच्या गणनेसाठी एकके (युनिट्स) ठरवली गेली आहेत आणि त्यांचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) झाले आहे. अशा प्रकारे आजचे विज्ञान खूप पद्धतशीर आणि नियमबद्ध झाले आहे.  
 
प्रयोग करताना किंवा एरवीसुद्धा अनेक वेळा विसंगत, अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला त्या वेळी माहीत नसतात. ती चिकाटीने शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगती होत जाते. अंतर्ज्ञान, साक्षात्कार, दृष्टांत, चमत्कार यांसारख्या संकल्पनांचा विज्ञानाच्यामुख्य प्रवाहामध्ये समावेश होत नाही. ज्ञानेंद्रियांच्या मदतीशिवाय मिळणाऱ्या अगम्य आणि अतींद्रिय ज्ञानाचा अभ्यास 'एक्स्ट्रा सेन्सरी पर्सेप्शन' (ईएसपी) या नावाखाली केला जातो. विज्ञानाच्या निकषांमध्ये बसणारे आणि सर्वमान्य होतील असे नवे शोध त्या अभ्यासातून लागले तर त्यांचा समावेश विज्ञानात केला जाईल.
 
प्राचीन काळापासून ते आज प्रचलित असलेल्या विज्ञानाचे स्वरूप अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.  
 
ओटो व्हॉन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने हवेला दाब असतो हे सिद्ध केले. या त्याच्या प्रयोगाविषयी वाचा खालील लिंकवर 
 
 
-आनंद घारे