नमस्कार मित्रहो, मागील अनेक लेखांपासून आपण सुरू केलेल्या प्रवासात आपण खूप पुढे आलेलो आहोत, मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा आकाश जाणून घेण्याबद्दलची तुमची तयारी वाढवली असेल. आणि तुम्ही सुद्धा या प्रवासात भरपूर पुढे पोहोचलेले असाल. चला तर मग या प्रवासाचे आणखी काही पुढचे टप्पे पार करूयात! प्रस्तुत लेखामध्ये आपण आकाशाबद्द्लच्या थोड्या संज्ञा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याच मदतीने आपण आकाशाबद्द्ल आणखी थोडं खोलात जाणून घेणार आहोत. चला तर मग ...

पहिली संज्ञा आहे ती म्हणजे "सुपर मून"! चमकलात ना ... आपल्या या वर्षाची सुरुवातच या संज्ञेने झाली, असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला ठाऊक आहेच की चंद्र हा पृथ्वीभोवती भ्रमण करतो आणि ती कक्षा ही लंबगोलाकार आहे. त्यामुळे साहजिकच कधी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी तो पृथ्वीपासून लांब. आता असा दिवस ज्या दिवशी पौर्णिमा असेल आणि तसेच चंद्र हा पृथ्वीपासून जवळ असेल अशा योगाला इंग्रजीमध्ये "सुपर मून" अशी संज्ञा आहे. आता चंद्राशी निगडितच दुसरी संज्ञा म्हणजे "ब्लू मून"...! आता आपलं कॅलेंडर उघडून पाहा आणि त्याचं निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गेल्या जानेवारी महिन्यात एकाच महिन्याच्या कालावधीमध्ये दोन वेळा पौर्णिमा आली. एकदा १ तारखेला आणि एकदा ३१ ला. तर हा सुद्धा एक दुर्मीळ योगच म्हणावा लागेल. इंग्रचीचा थोडा अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल की इंग्रजीमध्ये एखाद्या दुर्मीळ योगाला "वन्स इन अ ब्लू मून" असं म्हणतात किंवा असा वाक्प्रचार  वापरला जातो. म्हणून या योगाला ब्लू मून असं म्हणतात. आता चंद्राशी निगडित तिसरी संज्ञा ती म्हणजे "रेड मून". आता चंद्र जेव्हा पृथ्वीच्या छायेत असतो तेव्हा गडद छायेमुळे प्रकाशाचे विकिरण होते आणि हाच चंद्र लालसर दिसतो,  जसा तो चंद्र ग्रहणाच्या वेळी ३१ जानेवारी रोजी दिसला. तर या होत्या चंद्राशी निगडित काही संज्ञा. आता आकाशाशी निगडित अजून अधिक जाणून घेऊयात. आता अजून एक शब्द वापरला जातो तो म्हणजे "आकाशगंगा" आणि "दीर्घिका". तर आकाशगंगा याचा अर्थ असा की, आपण ज्या एका अतिप्रचंड ताऱ्यांच्या विश्वात राहतो त्याला आकाशगंगा असं म्हणतात. आपल्या आकाशगंगेचं नाव हे "मंदाकिनी" किंवा इंग्रजीत "मिल्की वे" असं आहे. अशाच विश्वात अनेक आकाशगंगा आहेत. आपली आकाशगंगा सोडून इतर आकाशगंगांना दीर्घिका असं म्हणतात. आपल्याला सर्वात जवळ असलेली आकाशगंगा कोणती आहे माहीत आहे का? - अन्द्रोमेडा, म्हणजेच देवयानी आकाशगंगा. आकाशगंगांप्रमाणेच आकाशात इतरही काही वस्तू दिसतात त्यापैकीच एक म्हणजे तेजोमेघ. यालाच इंग्रजीमध्ये आपण नेब्युला असं म्हणतो. असाच एक तेजोमेघ म्हणजे ओरायनमधील तेजोमेघ. ओरायन किंवा व्याध या तारकासमुहात असाच एक तेजोमेघ आहे जो आकाश अतिशय सुंदर दिसतं असल्यास नुसत्या डोळ्याने सुद्धा पाहता येतो.

यानंतर शेवटच्या टप्प्यात असेच योग आपण पाहणार आहोत जसे की "युती", "प्रतियुती". आता याचा अर्थ असा की, युती म्हणजे दोन आकाशीय वस्तू जवळ जवळ दिसणे. जसे की रोहिणी तारा आणि चंद्र यांची युती, तसेच प्रतियुती म्हणजे चंद्राच्या मागे एखादा तारा लपणे किंव्हा असाच योग हा लघुग्रहांच्या बाबतीत सुद्धा होतो बरं का! हे आणि असे अनेक शब्द आपण आकाशाचा अभ्यास करायला लागल्यावर आपल्या कानावर पडतील. आता तुम्ही सुद्धा असे अनेक शब्द शोधून काढा आणि त्याचा एक छानसा "खगोल शब्दकोश" बनवा. चला तर मग भेटूयात पुढील लेखात. तोपर्यंत आकाश नक्की बघत राहा !!!

आपण आकाशाविषयी कोणकोणते प्रयोग करू शकतो वाचा खालील लिंकवर 

 लेख ७ – आकाश प्रयोग – आपण करू शकू असे प्रयोग

-अक्षय भिडे

[email protected]