परीक्षेचे दिवस जवळ आले की, मुलांच्या हातातील खेळणी जप्त होतात, मैदाने ओस पडतात. अभ्यास व खेळ याचा छत्तीसचा आकडा असल्यामुळे साहजिकच अभ्यासासाठी खेळणे सोडावेच लागणार, हे तत्त्व आपण पिढ्यानपिढ्या शिकत आणि पाळत आलो आहोत.

पण समजा तुम्हाला एखादी व्यक्ती भेटून म्हणाली, "मुलांच्या परीक्षा आल्या तर येऊ द्या, त्यांचे खेळणे चालू राहू द्या, कारण नवीन नवीन खेळणी शोधून त्यांच्याशी खेळणे, हा सुद्धा अभ्यासच आहे.", हे ऐकताच, सगळ्यात आधी तर, असा "खेळकर" विचार करणाऱ्या माणसापासून मुलांना दूर ठेवाल व स्वत:ही चार कोस लांब राहाल, हो ना?

पण तुम्हाला माहिती आहे, असा सल्ला देणारा एक माणूस या जगात आहे व मुले आणि पालक त्या माणसाला भेटायला रांगा लावून गर्दी करत करतात! असा अवलिया माणूस म्हणजेच नुकतेच २६ जानेवारी २०१८ रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलेले "खेळण्यांचा जादूगार" अरविंद गुप्ता.

४ डिसेंबर १९५३ रोजी बरेली येथे त्यांचा जन्म झाला. १९७० साली ते भारतातील अत्यंत प्रतिष्ठित कानपूर आय.आय.टी.मध्ये दाखल झाले. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांच्या मनात खूप आधीपासून कुतूहल होते. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे व त्याच्या गतीने शिक्षण मिळणे हा त्या मुलाचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच आय.आय.टी.मध्ये शिकत असतानाच, त्यांनी तेथील कामगारांच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली होती.

आय.आय.टी. मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी १९७५ साली पुण्यात टेल्कोमध्ये नोकरीला सुरुवात केली. तशी त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. बऱ्याच दिवसांनी त्यांना सुखाचे दिवस बघायला मिळालेले असताना नोकरीत घट्ट पाय रोवून स्वत:ची व घराची आर्थिक परिस्थिती पालटणे त्यांना सहज शक्य होते. मात्र सर्व भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असतानाही, शिक्षणाविषयी असलेली ओढ त्यांना चैन पडू देत नव्हती.   

आज भारतातील लाखो मुलांना, शिकण्याविषयी अनेक समस्या भेडसावत असताना, मी इथे ट्रक काय बनवत बसलोय? हे काम करण्यासाठी माझ्यापेक्षाही चांगले इंजिनिअर येतील, पण त्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी कोण पुढे येणार आहे. आपले शिक्षणक्षेत्र एखाद्या ओसाड जमिनीप्रमाणे झाले आहे, त्या जमिनीत फुले उमलण्यासाठी, भरपूर उपजाऊ मातीची गरज आहे, ती माती आपणच टाकली पाहिजे, असा त्यांनी निर्धार केला व १९८० साली टेल्कोमधील नोकरीचा राजीनामा देऊन, ते होशंगाबाद येथे अनिल सद्गोपालन यांच्या "किशोर भारती" संस्थेच्या माध्यमातून, खेडोपाड्यात मुलांना शिकवू लागले. शाळाशाळातून मुलांना शिकवत असताना त्यांना मुलांच्या अडचणी लक्षात येऊ लागल्या. मुलांच्या आजूबाजूचे जे विश्व आहे आणि पुस्तकातून त्यांना जे शिकवले जाते, याचा एकमेकांशी काहीच संबंध राहिलेला नाही, म्हणून मुलांना शिकणे नीरस वाटू लागले आहे, मुले शाळा सोडत आहेत, हे त्यांना समजले. त्यांनी मुलांना विज्ञानातील मूलभूत संकल्पना शिकवण्यासाठी आजूबाजूला सहज उपलब्ध असलेल्या काड्यापेटी, सायकलचे स्पोक्स, वर्तमानपत्राचे कागद, तसेच टाकून दिलेल्या रबरी चप्पल, तुटके पेन अशा वस्तू वापरून खेळणी बनवायला सुरुवात झाली. गुरुत्वाकर्षण, ध्वनी, वीज या संकल्पना, विविध भौमितिक आकार, गणिताचे असंख्य खेळ; तसेच शरीर विज्ञान समजून घेण्यासाठी जवळपास शून्य खर्चातील मॉडेल्सचा खजिनाच त्यांनी मुलांसाठी निर्माण केला.

२००३ साली जयंत नारळीकरांनी पुलंच्या देणगीतून, मुलांमध्ये सर्जनशील विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्देश समोर ठेवत, आयुकामध्ये मुक्तांगण विज्ञान शोधिकेची सुरुवात केली. या संस्थेची जबाबदारी त्यांनी अरविंद गुप्तांवर सोपवली. या संधीचे सोने करत, त्यांनी मुलांसाठी हजारो कार्यशाळा घेतल्या, आत्तापर्यंत बनवलेली विज्ञान खेळणी युट्यूबच्या माध्यमातून जगभरातील मुलांसाठी खुली केली. जगातील अनेक भाषातील दर्जेदार साहित्य व शैक्षणिक सामग्री मराठीत, तसेच इतर भारतीय भाषेत अनुवाद करून arvindguptatoys.com या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा आज अनेक मुलांना, पालकांना व शिक्षकांना होतो आहे.

त्यांच्या मुलीला म्हणजेच दुलारीला जेंव्हा शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली, तेंव्हा "तिला दोन दिवस शाळेत येऊ द्या, आम्ही तिचे निरीक्षण करू आणि मग ठरवू की तिला शाळेत प्रवेश द्यायचा का नाही", असे प्राचार्यांनी सांगताच, "माझी मुलगी आधी शाळा बघेल, तिथे खेळेल आणि मग ठरवेल की तिला शाळा आवडते का आणि या शाळेत जावेसे वाटते का?" असे प्राचार्यांना त्यांनी निक्षून सांगितले. शाळेच्या प्रवेशासाठी रात्रीपासून रांगा लावण्याच्या काळात, शिक्षण, शाळा नक्की आहेत तरी कुणासाठी, या प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे आपल्या कृतीतून देणाऱ्या व्यक्तीला पद्मश्री मिळाल्याने, अनेक पालकांना शिक्षण म्हणजे नक्की काय असते, हे समजून घेण्याची संधी मिळाली आहे, हे नक्की! 

-चेतन एरंडे

[email protected]