महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांचा अस्मिता दिन म्हणजे मराठी राजभाषा दिन. २७ फेब्रुवारी हा वि.वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. जिथे तिथे मराठी बोलली ऐकली जाते तिथे तिथे अगदी परदेशातही मराठी संस्कृती, सणवार यथासांग साजरे केले जातात.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे फुटलेले थवे, इंग्रजीचा दुराभिमान आणि अट्टाहास, शिष्टाचाराच्या गैरसमजुती अशा सर्वांमुळे  आपण मात्र आपल्याच मायभूमीत आपल्या मायबोलीची पायमल्ली करतो आहोत. विविध वृत्तवाहिन्या चित्रपट सिरिअल्स रिअॅलिटी शोज विविध प्रांतातील इथे स्थायिक झालेल्या लोकांच्या पद्धती आणि रियाज यामध्ये मराठीचा अस्सलपणा हरवत चालला आहे की काय अशी शंका येते.

आज मराठी बोलणाऱ्यांची भाषा शुद्ध मराठी राहत नाही. याला कारण भाषेवर होणारी ही विविध माध्यमांची आक्रमणे हे होय.

उदा. बोलताना हिंदीचा पगडा असल्यामुळे असे बोलले जाते.

सगळे रोहन वर हसले

मराठीत, रोहनला हसले असे म्हटले पाहिजे. मला पुस्तकं भेटली कागद भेटले असे न म्हणता पुस्तक मिळाली, कागद मिळाले असे म्हणावे.

सजीव व्यक्ती भेटतात, निर्जीव वस्तू मिळतात.

हल्ली सीरिअलच्या पगड्यामुळे सर्रासपणे तू माझी मदत करशील का? असे म्हटले जाते. पण ते तू मला मदत करशील का असं म्हटलं पाहिजे. अनेकवेळा मी येईल, जाईल, करेल याऐवजी मी येईन, जाईन, करेन असं म्हटलं पाहिजे.

साडी घालायची नसते तर साडी नेसायची असते. गजरा किंवा फुलं डोक्यात लावायची नसतात तर केसात माळायची किंवा घालायची असतात.

अर्थात हे सगळं उदाहरणादाखल बोलीभाषेत असे वेगवेगळ्याप्रकारे त्या गावाच्या, शहराच्या, प्रांताच्या संस्कृतीनुसार भाषेच्या लहेजानुसार बोलले जाते.

अनेकजण युक्तिवाद करतात की उपहार गृह म्हटलं, आणि उपाहार गृह नाही म्हटलं तर तिथे काय खायला मिळत नाही का? ठीक आहे, पण आपण ज्या भाषेला मातृभाषा म्हणतो तिचं इतपत व्याकरण तरी आपल्याला माहीत पाहिजे ना? आज आपली मराठी ही मराठी + इंग्लिश अशी Minglish झाली आहे. इंग्रजी भाषेत ओढून ताणून कृत्रिमपणे शिकवलेले शिष्टाचार मराठीत तर सहजच वापरतो.

उदा. एखाद्याने मदत केवळ शब्दांनी धन्यवाद असे म्हणणे म्हणजेच केवळ शिष्टाचार पाळणे का? आपल्याकडे आपण मदत केलेल्या माणसाला नजरेने कृतज्ञेचा भाव दाखवतोच की! एखाद्या चुकून पाय लागला तर आपण sorry म्हणत नसलो तरी तिथल्या तिथे आपण त्याला हात लावून नमस्कार करतोच ना? आपल्या देहबोलीने आपण या भावभावना दाखवतो, व्यक्त करतो.

काय करूया बरं आपण मराठीच्या अस्मितेसाठी?

Ø  आपल्याकडे आलेल्या परभाषिक दुकानदार, विक्रेते व्यक्ती यांच्याशी आवर्जून मराठीतच बोलूया. त्यांना आपली मराठी शिकू दे, कारण ते आपल्याकडे आले आहेत. त्यांनी आपली भाषा शिकावी हे त्यांच्याही भल्याचेच आहे. आपण जास्तीत जास्त शुद्ध इतर भाषेतील शब्दांचा आधार न घेता, योग्य बोलूया.

Ø  रोज काहीतरी चांगले मराठी वाचूया रोज चांगले मराठी लिहूया.

Ø  संगणक, भ्रमणध्वनी यांमध्ये मराठी लिपी आवर्जून घेऊया. तिचाच वापर संदेश पाठवण्यासाठी करूया.

Ø  मराठी पुस्तके विकत घेवूया.

Ø  मराठी नाटक, चित्रपट पाहुया

Ø  मराठी साहित्यसंमेलने पुस्तक प्रदर्शने व्याख्याने, काव्यवाचन अशा कार्यक्रमांना जाऊया.

Ø  मराठी भाषा रांगडी आहे, पण तिच्यात माधुर्य आहे.

Ø  मराठी भाषेची स्वतःची संस्कुती आहे, ती जपूया.

Ø  आपल्या घरावर मराठी पाटी लावूया

Ø  मराठीतून सही कारुया

Ø  परकी भाषा शिकूया, पण मराठी भाषा जपूया!

तुम्हालाही मराठीसाठी जे जे करता करता येईल ते करा.

 

सार्थ मराठी                            

अर्थ मराठी                    

कृतार्थ ही मराठी!!              

धन्य मराठी                           

मान्य मराठी                   

चैतन्य ही मराठी!!              

सूर मराठी                     

नूर मराठी                       

मजूर ही मराठी!!                 

ताल मराठी                           

बोल मराठी                             

अनमोल ही मराठी!!        

सत्य मराठी                            

तथ्य मराठी                      

आतिथ्य ही मराठी!!        

प्रीत मराठी                     

गीत मराठी                           

संगीत ही मराठी                  

शौर्य मराठी                            

धैर्य मराठी                     

चातुर्य ही मराठी!!                

गंध मराठी

छंद मराठी

मृद्गंध ही मराठी !!

धून मराठी

लीन मराठी

शालीन ही मराठी!!

देश मराठी

वेष मराठी

आवेश ही मराठी!!

भक्ति मराठी

शक्ति मराठी

आसक्ती ही मराठी!!

दिव्य मराठी

भव्य मराठी

अन काव्य ही मराठी!!

मर्म मराठी

धर्म मराठी

सत्कर्म ही मराठी!!

नाद मराठी

मोद मराठी

आस्वाद ही मराठी!!

सत्व मराठी

तत्व मराठी

एकत्व ही मराठी!!

मान मराठी

शान मराठी

अभिमान ही मराठी!!

-चारुता शरद प्रभुदेसाई

[email protected]