चळवळ भाषाशुद्धीची

दिंनाक: 26 Feb 2018 14:34:55


'दर बारा मैलांवर भाषा बदलते’, हे भाषा विज्ञानाच्या (भाषा विज्ञान म्हणजे भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र) अभ्यासातून सिद्ध झालेले असले, तरी प्रत्येक प्रदेशाची आपली म्हणून एक भाषा असतेच. भाषा ही परिवर्तनशील असल्यामुळेच काळानुरूप, समाजानुरूप तिच्यात बदल होत असतात. तरीदेखील त्या विशिष्ट प्रदेशाची ओळख तयार करण्यात, ती रुजवण्यात ‘भाषा’ अपरिहार्यपणे कार्यरत असते. ‘भाषिक आदान-प्रदान करणे’ हे भाषेचे गुणवैशिष्टय असल्यामुळेच इतर भाषांच्या परिचयामुळे आपली भाषा निश्चितपणे समृद्ध होत जाते. त्यामुळेच इतर भाषेतल्या संस्कृती, परंपरा, साहित्य यांचा आपल्याला परिचय होत असतो.

या भाषिक आदान-प्रदानाच्या प्रक्रियेतूनच  टेबल, पेन, पेन्सिल, बॅग, बॅट, बॉल, पोस्ट, कमाल, मार्फत, मालक, फायदा असे कितीतरी परकीय शब्द आपल्या भाषेत रुळू लागले. पण काळाच्या ओघात देशावर झालेल्या परकीय आक्रमणांनी येथल्या प्रदेशाबरोबरच येथल्या भाषेवरही अतिक्रमण केले. या भाषिक अतिक्रमणामुळेच भाषेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ लागला. या प्रश्नाचे भविष्य काळातील स्वरूप लक्षात घेऊन, अनेक विचारवंतांनी, त्या त्या काळात आपापल्या परीने भाषेचे मूळ स्वरूप टिकवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आपल्याला निरनिराळ्या रूपात 12 व्या शतकापासून आजपर्यंत पाहायला मिळतो.

आपली भाषा टिकवण्यासाठी निरनिराळ्या काळात झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत यात वादच नाहीत, पण स्वा. सावरकरांनी राष्ट्रकार्य म्हणून स्वीकारलेली ‘भाषाशुद्धी’ची चळवळ त्यातल्या वेगळेपणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. या चळवळीत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, या हेतूने त्यांनी 1924 मध्ये केसरीतून ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ ही लेखमाला लिहिली. त्यामधून ‘भाषाशुद्धी म्हणजे काय?’, ‘आपण ती जाणीवपूर्वक केली पाहिजे आणि का केली पाहिजे?’, याबाबत विवेचन आलेले आहे. भाषेबद्दलची जाणीव जागृती करत असतानाच त्यांनी आपल्या भाषेला समृद्ध करणार्‍या शब्दांना विरोध करण्याऐवजी त्याच उपयुक्त शब्दांना स्वभाषेतून ‘प्रतिशब्द’ सूचवण्याचे मोलाचे कार्य केले. सावरकरांनी सूचवलेले - नंबर (इंग्रजी) - क्रमांक, तारीख (उर्दू)/ डेट (इंग्रजी) - दिनांक, डायरेक्टर (इंग्रजी) - दिग्दर्शक, हेडमास्टर (इंग्रजी) - मुख्याध्यापक, टेलिफोन (इंग्रजी) - दूरध्वनी, सुपरव्हायजर (इंग्रजी) - परीक्षक, कार्टून (इंग्रजी)- व्यंगचित्र, पेन्शन (इंग्रजी) - निवृत्तीवेतन, पार्लमेंट (इंग्रजी)- संसद, सर्टिफिकेट (इंग्रजी)- प्रमाणपत्र, स्टेशन (इंग्रजी) - स्थानक, सोकॉल्ड (इंग्रजी)- तथाकथित, हजर (उर्दू) - उपस्थित असे अनेक मराठी प्रतिशब्द मराठीमध्ये आजही सररास वापरले जातात.

सावरकरांनी तयार केलेले हे प्रतिशब्द मूळ भाषेतील शब्दच वाटण्याएवढे आपल्या भाषेत चपखल बसले आहेत. त्यांनी सूचवलेले हे मराठी प्रतिशब्द अर्थदृष्ट्या परिपूर्ण तर आहेतच, पण सहजसोपेही आहेत. त्यामुळेच ते सर्वसामान्यांकडून वापरले जाऊ लागले आणि त्यामुळेच ते आजतागायत आपल्या भाषेत टिकूनही आहेत. मराठीच्या मर्यादित वर्णमालेतून असंख्य नवीन शब्द निर्माण करता येऊ शकतात, याचा वस्तूपाठच सावरकरांनी घालून दिला आहे.

उच्चारण्यास सोपे-सुटसुटीत असलेल्या काही परकीय शब्दांचा स्वीकार करण्यास हरकत नसून, त्यामुळे आपली भाषा अधिक समृद्धच होते, असा एक नवीन विचारही त्यांनी आपल्या कृतीतून सर्वसामान्यांपुढे ठेवला. हे जरी खरे असले, तरी अशा परकीय शब्दांना स्वभाषेत प्रतिशब्द तयार करणे आणि आपल्या भाषेत ते रुजवणे सहज शक्य असल्याचेही ते सांगतात. या बाबत लेखक-वाचक तसेच नवशिक्षित पिढीवर त्यांचा भरवसा होता. स्वभाषेबद्दल वाटणारा हा कळवळा विचारांप्रमाणे प्रत्यक्ष कृतीमधूनही त्यांनी सिद्ध केला.

मराठी भाषा समृद्ध करण्याबरोबरच तिच्या उपजत सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य स्वा. सावरकरांनी केले. त्यांच्या भाषाविषयक कार्याची जाणीव मनात कायम बाळगून आपणही आपल्या भाषेवर प्रेम करू या, तिला जपण्याचा, तिला समृद्ध करण्याचा प्रयत्न करू या!

-चित्रा नातू वझे

[email protected]