दुपारची वेळ होती. सर्वांची दुपारची जेवणं आटपल्यावर जेवणानंतरची सर्व आवराअवर करण्यासाठी शमी कधी नव्हे ते आज, आईला कामात मदत करायला आली. शमीची ही लगबग पाहून आई हसतच म्हणाली, "काय गं शमू, आज आईला कामात मदत करायला न सांगताही धावत आलीस. नाहीतर एरव्ही कामाच्या भीतीने जेवणानंतर हातावर पाणी पडताच गायब होतेस. कधी हटकून म्हटलंच तुला की जेवणाची ताटं उचलायला ये, भांडी घासायला मदत कर, तर म्हणतेस, 'जेवणानंतर नको काम, जेवणानंतर मला हवा आराम.'  मग आज काय गं विशेष? आज नाही करायचा का, जेवनानंतरचा आराम?" शमी लाडेलाडेच म्हणाली, "अस्सं गं काय म्हणतेस आई. इतर वेळी करतेच ना गं मी तुला मदत." आई म्हणाली, "होय होय, कामाचा डोंगरच उचलतेस गं बाई तू. अगं, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी आहेस, तू नुसती." तेवढ्यात दारात शमीच्या मैत्रिणींचा घोळका जमा झाला. त्यांनी शमीला हाक मारली. अनन्या, कृतिका, सुखदा, शर्वरी साऱ्याच  शमीच्या मैत्रिणी. आज शमीला खेळायला बोलवायला दुपारी ठरल्याप्रमाणे तिच्या घरी हजर होत्या. आईला हा सगळा प्रकार आधीच माहीत होता. ती लगेच हसून म्हणाली, "काय गं शमे, तुला खेळायला जायला मी हो म्हणावं म्हणून हे सगळं चाललंय ना कामाचं नाटक. अगं, हे आधीच सांगायचा नाही का मला? ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं?" आईच्या बोलण्यावरून ज्या कामासाठी जायचे ते काम दडवू नये, हे शमीच्या लक्षात आले. ती लगेच चेहरा पाडून म्हणाली, "सॉरी सॉरी, तू नको म्हणत असशील तर मी नाही जात बापडी." आई पदाराखाली हसू दाबत म्हणाली, "हो का! गुणाची गं माझी पोर. केवढी आज्ञाधारक! आईचा एक शब्दसुद्धा खाली पडू देत नाही. अगं, पण मी तुला जर खेळायला नाही पाठवलं तर या भांड्यांचं काही खरं नाही बघ. सगळा राग या भांड्यांवर निघेल. म्हणतात ना, वड्याचं तेल वांग्यावर. अगदी तस्सं. त्यापेक्षा तू आपली खेळायलाच जा बरं.पळ लवकर. घरी वेळेवर ये म्हणजे झालं. सुखदाच्याच घरी तुम्ही सगळ्या जमणार आहात ना? अगं, कालच सुखदाची आई बाजारात भेटली, तेव्हाच मला तिच्याकडून कळली तुमची ही जमाडीजंमत. गाण्याच्या भेंड्या, गप्पा,एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ....  माहितीय मला सारं आणि पाच वाजता तुम्ही मुली भेळ आणि आईसक्रीम खाण्याचा कार्यक्रमसुद्धा करणार आहात ना? व्वा छान. अगं गंमत केली तुझी. तू करतेस गं मला कामात मदत. बरं चल, पटकन आटप. तुझ्या मैत्रिणी केव्हाच्या तुझ्यासाठी खोळंबल्यात बिचाऱ्या.

आईची परवानगी मिळताच शमी आनंदाने मैत्रिणींसोबत घराबाहेर पडली. सुखदाच्या घरी सगळ्या जणी जमल्या. तिथे परस्पर मेघना, ऐश्वर्या, सुचिता येऊन बसल्याच होत्या. मग सगळ्यांची अंगतपंगत सुखदाच्या घरासमोरील अंगणातच बसली. सुखदाच्या बैठ्या घरासमोर सुदैवाने ऐसपैस अंगण होते. म्हणून तिच्याच घरी जमायचा सर्वांनी बेत केला होता. अंगणात चटया अंथरल्या गेल्या.

सगळ्या जणी चटयावर ठाण मांडून बसल्या. त्यांचा किलबिलाट एका क्षणात सुरू झाला. शमीला काहीतरी आठवलं. ती लगेच म्हणाली, "ये ये, चला गप्पा नंतर. आता खेळाला सुरुवात करू या. कोणता खेळ? नियम काय? कसा खेळायचा? ते सारं सांगते. पण त्यात जास्त वेळ नको घालवायला. म्हणतात ना, नमनाला घडाभर तेल नको." सुखदा लगेच हसली. शमी म्हणाली, "आता हसायला काय झालं तुला?" सुखदा म्हणाली, "अगं, तू तुझ्या आईसारखंच डिट्टो बोलतेस." शमी म्हणाली, "म्हणजे कशी गं?" सुखदा म्हणाली, "अगं, म्हणजे, तूसुद्धा बोलताना तुझ्या आईसारख्याच म्हणी वापरतेस." शमी हसतच म्हणाली, "अय्या, चला मला आता यावरूनच एक नवा खेळ सुचलाय. आपण प्रत्येकीनेच आपल्यावर राज्य येताच एक एक म्हण सांगायची आणि तिचा अर्थसुद्धा." ऐश्वर्या म्हणाली, "सोप्पाय खेळ. चालेल. चला खेळू या." शमी म्हणाली, "खेळाचे नियम साधे सोप्पे. म्हण आणि तिचा अर्थ सांगायचा पण इथे कुठलीही म्हण सांगून चालणार नाही बरं का? जिच्यामध्ये संख्यांचा वापर केलाय तीच म्हण सांगायची. चालेल?" अनन्या  म्हणाली, "हो हो चालेल." कृतिका म्हणाली, "प्रयत्न तर करू या. नवा खेळ आहे. चुकतमाकत खेळू या, शिकू या." शमी म्हणाली, "चला तर मग, ऐश्वर्या,  तुझ्यापासूनच सुरुवात करू या. सांग एक म्हण आणि तिचा अर्थ." ऐश्वर्या म्हणाली, "कुठेही जा पळसाला पानं तीनच. म्हणजेच सगळीकडे परिस्थिती सारखीच." शमी म्हणाली, "अगदी बरोब्बर. यात तीन ही संख्याही आलीय आणि अर्थसुद्धा तू बरोबर सांगितलास. आता माझ्यावर राज्य ना? चला मी सांगते, 'चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी मिळतेच '. सुखदा म्हणाली, "व्वा! छानच की. आता सुचिता तुझी पाळी." सुचिता थोडी विचारात पडली. मग आठवून काही वेळाने  म्हणाली, "झाकली मूठ सव्वा लाखाची. म्हणजे आपले अवगुण झाकावे. ते उघड करू नयेत." शमी म्हणाली, 'व्वा गं, अगदी बरोबर सांगितलंस. आता कृतिका तुझा नंबर. चल तू सांग, एक  म्हण." कृतिका पटकन म्हणाली, "चौदावे रत्न दाखवणे म्हणजेच खूप मार देणे." अनन्या लगेच म्हणाली, "ये ये, चुकलं चुकलं, यात संख्या आहे, पण ही काही म्हण नाही. हा तर वाक्प्रचार आहे. हारलीस तू." कृतिका पटकन म्हणाली, "ओके, ओके. 'पाचा मुखी परमेश्वर' ही तरी म्हण आहे ना ? या म्हणीचा अर्थ सर्व लोकं बोलतात ते खरे मानावे" अनन्या म्हणाली, "हो, ही म्हण आहे. यात संख्याही आहे. पण आता तुझी एक संधी हुकली. तुझ्यावर एक हंडी चढली. आता मेघना तू सांग." मेघना म्हणाली, "पाचही बोटे सारखी नसतात. म्हणजे सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात." शमी म्हणाली, "अगदी बरोबर. आपला खेळ मस्तच रंगत चाललाय. आता अनन्या तुझा नंबर." अनन्या म्हणाली, "दुष्काळात तेरावा महिना. म्हणजेच आधीच्याच संकटत भर पडणे." शमी म्हणाली, "अरे व्वा! मस्तच की. आता सुखदा तुझी पाळी." सुखदाला जिच्यात संख्या आहे अशी एकही म्हण पटकन आठवेना. शर्वरी लगेच तिला म्हणाली, " हरलीस का? मी सांगू?" सुखदा पटकन म्हणाली, "नाही हा. सांगते जरा थांब. आठवली आठवली. नव्याचे नऊ दिवस. म्हणजेच एखादी गोष्ट नवी तोपर्यंत त्याचे कौतुक वाटते." शमी म्हणाली, "छानच, आता शर्वरीची पाळी." शर्वरी म्हणाली, "थापाड्याच्या घरी बारा औत, बघायला गेलं तर एकही नव्हतं. याचा अर्थ थापाडा मनुष्य खोटं बोलतो." शर्वरीच्या या म्हणीवर सारेच खळखळून हसले. शमी हसत हसत म्हणाली, "बरंय बाई, आपल्यात कुणी थापाडे नाही, आपण सारेच गप्पाडे आहोत." यावर पुन्हा सारे खो-खो हसले. शमी काहीतरी आठवून म्हणाली,  "ये मी तुम्हांला ना, एका थापाड्या दामूची गंमत सांगते हा.....

बोलघेवडा दामू, भलत्याच बाता मारी

त्याच्या बाता ऐकून, वैताग यायचा भारी

एकदा म्हणाला गावच्या,  नदीला आला पूर

पॅराशूट घालून म्हणाला, उडून गेलो दूर

उडत उडत ताडोबाच्या, जंगलात म्हणाला गेलो

तिथल्या वाघांसोबत, जरा पत्ते खेळून आलो 

रात्री आकाशात म्हणाला, चंद्राला आलो भेटून 

चांदण्या आणून खिशात, दिल्या मुलांना वाटून

घराच्या वाटेवर म्हणाला, राक्षस भेटला मला

पॅराशूटची गंमत दाखवून, हसवले मी त्याला

दामू अशा रोज रोज, खूप मारायचा थापा

संपत नव्हत्या त्याच्या, लंब्याचवड्या गप्पा 

दामू समोर येताच आता, माणसं जातात दूर

म्हणतात याच्या थापांना, येईल नाहीतर पूर

....थापाड्या दामूची काव्यकथा आवडली साऱ्यांनाच.

एक फेरी संपून आता खेळाची पुढची फेरी सुरू झाली.

खेळाला खरोखरच चांगलाच रंग चढत गेला. भोळ्याचे देव सोळा, साठी बुद्धी नाठी, देणाऱ्याचे हात हजार, दमडीचा सौदा अन् येरझरा चौदा, दहा गेले अन् पाच उरले, एक गाव बारा भानगडी, एक पाय तळ्यात अन् एक पाय मळ्यात, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, माझे तेच बरे सोळा आणे खरे ... बापरे खेळता खेळता संख्या असलेल्या म्हणींचीच केवढी मोठ्ठी यादी झाली. खेळात खेळता वेळ सशासारखा पळत होता. पाच कधी वाजले कुणालाच कळले नाही. सुखदाच्या आईने वर्दी दिली. म्हणाली, "अगं मुलींनो, ते फ्रिजमधलं गारेगार आईसक्रीम सारखं हाका मारतंय तुम्हाला." यावर सगळ्याच जणी हसल्या. 

आता भेळ आणि आईसक्रीम. खादूगिरीचा कार्यक्रम. पेटपूजा म्हटल्यावर साऱ्याच जणी बिलगल्या भेळ बनवायला. भेळ बनवता बनवता गप्पा, हसू आणि भेळीचा चवदार वास अंगणभर केव्हाच पसरला होता. सुखदाची आई मुलींचा हा उत्साह पाहण्यात दंग झाली होती.

 -एकनाथ आव्हाड

[email protected]