ओळख भाषेची

दिंनाक: 23 Feb 2018 14:34:32


भाषा आपण मुख्यत्वे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, दुसर्‍याशी संवाद साधण्यासाठी, दैनंदिन कामांसाठी वापरत असतो. तिच्या एकंदर रूपाबद्दल, इतिहासाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. पण भाषा एकदा का समजून घेतली, त्यातले बारकावे ओळखले, की ती आपलीच होऊन जाते. नकळतच आपण आपल्या भाषेवर प्रेम करू लागतो.

भारतात जवळजवळ पावणेदोनशे भाषा बोलल्या जातात. परंतु त्यातल्या पंधराच भाषांना भारतीय राज्यघटनेने मान्यता दिली आहे. त्यात आपली ‘माय मराठी’ अर्थातच आहे. आपण बोलत असताना, जरी विचार करून बोलत असलो तरी जे शब्द बोलतो, त्या शब्दांचा म्हणजेच पर्यायाने भाषेचा फारसा विचार करत नाही. परंतु जर बारकाईने किंवा थोड्याशा कुतूहलाने भाषेचा विचार केला, तर अनेक गंमतीदार गोष्टी लक्षात येतात आणि बरेचसे प्रश्‍नही पडतात.

अगदी सर्वप्रथम शब्द कोणी उच्चारला असेल? कोण कोणाशी प्रथम बोललं असेल? काय व कसं बेाललं असेल? आपण आता ज्या शब्दांत बोलतो, त्याच शब्दांत बोलले असतील की दुसर्‍या कोणत्या शब्दांत बोलले असतील? की नुसत्या हावभावांतून, खाणाखुणांमधून बोलाचाली झाली असेल? हावभावांतून, खाणाखुणा करून तसं, तर आपण आजही  बोलतोच. ओठ आवळतो, डोळे वटारतो, भुवया, नाक उडवतो, हात उगारतो. यातून निरनिराळे भाव व्यक्त होत असतात. तुम्ही जरा सहज म्हणून स्वत:च्या या हालचालींकडे लक्ष दिले, तर त्याचे अर्थ तुम्हाला सहज कळतील. तोंडाने बोलत असताना आपण ज्या शारीरिक हालचाली करत असतो, त्यांमुळे आपलं बोलणं अधिक ठाशीव होत असतं. म्हणून तर आपण म्हणतो ना की, त्याचा चेहरा किती बोलका आहे किंवा तिचे डोळेच सांगतात काय झालंय ते.

पण पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये असा संवाद घडतो का? कावळा ‘काव काव’ व्यतिरिक्त दुसरं काही बोलत नाही. मांजर फक्त ‘म्यॅव म्यॅव’ करते, असं का? कारण त्यांच्या भाषेत फक्त ध्वनीच असतात. त्यांना तसा विशेष काही अर्थ नसतो. पण आपल्या भाषेत ध्वनी असतात आणि त्या ध्वनींना अर्थही असतात. स्वर आणि व्यंजने, आपण लहानपणापासून शिकत असतो ती बाराखडी वेगवेगळी वाचली तर त्याला काही अर्थ नसतो, पण ‘आ’ हा स्वर आणि ‘ज्’ व ‘र्’ ही व्यंजने घेतली व त्यांची सानुक्रम म्हणजे नीट क्रमाने रचना केली, तर अर्थ असलेले शब्द तयार होतात, जसे - ज्+आ = जा, र्+आ+ज् = राज, ज्+अ+र्+आ = जरा, र्+आ+ज्+आ = राजा इत्यादी. अशा प्रकारे कोणताही स्वर आणि व्यंजन क्रमवार लावून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची सुविधा, मानवेतर म्हणजे मानव सोडून इतर सजीवांच्या भाषेत नाही. आपल्या जवळच्या 12 स्वर आणि 26 व्यंजने यांचा वापर करून वर दिल्याप्रमाणे असंख्य शब्द तयार करून पाहण्यातही गंमत आहे.

आपणच तयार केलेले अर्थपूर्ण शब्द आधारित असतात, ते संकेतांवर. फार पूर्वी आपण आता ज्याला ‘फूल’ म्हणतो त्याला ‘पान’ न म्हणता ‘फूल’च म्हटले गेले असेल, म्हणून आपण आजही फुलाला ‘पान’ न म्हणता ‘फूल’च म्हणतो. हे संकेत कोणी तयार केले असतील, हे शोधण्यासारखे आहे. त्या त्या शब्दांशी संकेताने, रूढीने अर्थ निगडित झाल्यामुळे आपल्याला तो शब्द उच्चारल्या उच्चारल्या अर्थाचे ज्ञान होते. ‘तिखटजाळ’ म्हटलं की, पदार्थ किती तिखट असेल याची कल्पना येते. ‘लालभडक’ म्हटलं की, गुलमोहोराची डेरेदार छत्री डोळ्यांसमोर येते. ‘घट्ट’ या शब्दातून वस्तू पकडण्यातील तीव्रता जाणवते. चटाचटा, पटापटा या अभ्यस्त (एकच शब्द एकामागोमाग एक दोनदा येणारे शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द.) शब्दांमध्ये कृतीचा वेग जाणवतो. एकच अक्षर चारवेळा आलेला ‘तंतोतंत’ हा शब्दही तसा वैशिष्ट्यपूर्णच. कधी-कधी नवे शब्दही जन्म घेतात. प्रतिभावंत लेखक व कवी ‘झपूर्झा’, ‘झनन-झांजरे’, ‘महिरपले’, ‘पंक्चरली’ अशा शब्दांना आपल्या कवितेत आणतात, तर तुमच्यासारखी नवीन पिढी ‘झोल’, ‘सही’, ‘एक नंबर’, ‘गोची’ असे वेगळे शब्द वापरून आपल्या भावना व्यक्त करते. शब्दांवरसुद्धा ठरावीक ठिकाणी जोर दिला, आघात केला, तर अर्थ कसे बदलतात हेही पाहण्यासारखे आहे. ‘छान’ हा शब्द तसा चांगला, पण लांबवून म्हटला की उपरोधिक. तसंच ‘शहाणा आहेस’, ‘लवकर आलात’ या शब्दांचं. ‘परोक्ष’ म्हणजे खरेतर एखाद्याच्या मागे, गैरहजेरीत व ‘अपरोक्ष’ म्हणजे समोरासमोर; पण आज आपण हे शब्द बरोबर विरुद्ध अर्थाने वापरू लागलो आहोत.

आपण जेव्हा म्हणतो की, ‘मी पुलं वाचले’ किंवा ‘ती माझ्या दारावरून गेली’ तेव्हा या वाक्यांच्या मागे दडलेला म्हणजेच लाक्षणिक अर्थ कोणी न सांगताच आपल्याला समजतो.

भाषा ही प्रवाही असते. नवेनवे शब्द सामावून घेण्याची पात्रता तिच्याठायी असते. या प्रवाहाचा उगम शोधणे म्हणजेच तिचं कुळ, भाषाकुळ शोधणे. जगात एकूण सात प्रमुख भाषाकुळं मानली जातात. भाषेच्या उत्पत्तीच्या व जडणघडणीच्या संदर्भात डॉ. पां.दा. गुणे, वि.रा. शिंदे, कृ.पां. कुलकर्णी, डॉ. शं.गो. तुळपुळे इ. अनेक पंडितांनी व विद्वानांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडलेली आहेत. पूर्वीच्या गांधार देशातल्या शलातूर गावच्या ‘पाणिनी’ या थोर भाषाशास्त्रज्ञाला तर विसरून चालणारच नाही.

एकमेकांना एकमेकांची भाषा येत असेल तरच भाषिक देवाणघेवाण शक्य असते. तुमच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला ‘च’ची भाषा येत नसेल तर तुम्ही त्याच्याशी ‘च’च्या भाषेत बोलू शकणार नाही. त्याच्या कानांवर नुसते शब्द पडत राहतील, पण डोक्यात काहीच शिरणार नाही. पण समजा जर तुमची आई म्हणाली की, ‘चला, अंधार पडला बरं का.’ तर तुम्हाला लगेच खेळ आटोपता घेण्याची व नंतर अभ्यासाला बसण्याची आईची सूचना कळते.

तुम्ही सुट्टीत मस्तपैकी मध्य प्रदेशाची ट्रिप करून आलात, तर आल्यावर मित्रांना ट्रिपमध्ये पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन करून सांगाल. इंदौरचा बडा गणपती, मोनिका आईस्क्रीम पार्लर, जबलपूरजवळचा भेडाघाट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा कराल. तुम्ही बोलत असलेली भाषा त्यांना कळत असल्यामुळे ते पुण्यात असूनही मध्य प्रदेशची सैर करतात. तसेच एखाद्या साप्ताहिकातले, मासिकातले युरोप, सिंगापूरचे वर्णन वाचून तुम्ही तो प्रदेश अनुभवू शकता. हे कशामुळे शक्य होते? तर केवळ भाषेमुळे, भाषिक देवाणघेवाण केल्यामुळे. म्हणजेच, भाषेला स्थळ व काळ यांचे बंधन नाही, ती स्थलकालातीत आहे.

आपण रोजच्या बोलण्यात जे शब्द वापरतो ते कोणत्या भाषेतून आले आहेत हे पाहाणेही गंमतीशीर ठरेल. गीर्वाण भाषा किंवा देवभाषा म्हणून ज्या भाषेचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेतील शब्दांचा मराठी भाषेवर (व इतरही अनेक, जवळजवळ सर्वच, अगदी परकीय भाषांवरसुद्धा) घट्ट पगडा आहे. कित्येक संस्कृत शब्द आपण मराठी भाषा बोलताना सररास वापरतो. उदा. तीर्थ, प्रसाद, घंटा, चंद्र, सूर्य, राजा, कलश, क्षेत्र, पिंड, भोजन, होम, हवन, आहुती इत्यादी हे शब्द आपण तसेच्या तसे वापरतो, म्हणून त्या शब्दांना ‘तत्सम’ शब्द म्हणतात, तर संस्कृतचे मूळ शब्द रूप बदलून मराठीत आले तर त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हणतात. उदा. हस्त-हात, पर्ण-पान, कर्ण-कान, कमल-कमळ, गृह-घर, तक्र-ताक इत्यादी. आपण केवळ संस्कृतमधूनच शब्द आपल्या भाषेत घेतलेले आहेत असे नाही, तर वेगवेगळया भाषांमधूनही शब्द घेतलेले आहेत. आपण आवडीने खातो ती पुरणपोळी कन्नडमधून आलेली आहे. म्हणून ‘पुरणपोळी’ हा शब्द आपल्याकडे रूढ झाला. तिच्याबरोबर ‘कडबू’पण आला. ‘अप्पा’, ‘अण्णा’, ‘अक्का’ हे नातेसंबंधवाचक शब्दही कानडीमधलेच.

आपल्या देशात इंग्रजांच्याही आधी पोर्तुगीज आले. बटाटा, पगार, पाव, पुरावा, बादली, खमीस या शब्दांची देणगी त्यांचीच. आपण जी ‘फरसबी’ खातो ती फ्रेंचांची French Beans. इस्पिक हा डच भाषेतला, रिक्शा हा जपानी भाषेतला, तर टोमॅटो व चॉकोलेट हे मेक्सिकन भाषेतील शब्द आहेत आणि इंग्रज तर काय, आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करून गेले व जाताना कितीतरी इंग्रजी शब्द आपल्या मातीत रुजवून गेले. ‘सॉरी’, ‘थँक्यू’ हे त्यांचे दोन शब्द तर आपण आपलेच मानलेले आहेत.

भाषा वाकवावी तशी वाकते. लवचीकता हा तिचा खास गुणधर्म आहे. संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश अशी काळाच्या ओघात परिवर्तन होत आजची मराठी भाषा बोलली जाते. तीच भाषा सर्वसामान्यांच्या वापरात यावी म्हणून ज्ञानेश्‍वर महाराजांनी तेव्हाच्या प्राकृतातून व्यक्त केलेला भाषेचा अभिमान व गोडवा त्यांच्याच शब्दांत सांगायचा झाला तर -

‘‘माझा मराठिचा बोलू कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके॥

एैसी अक्षरे रसिकें। मेळविन॥

-अर्चना बापट

[email protected]