इतिहास विषयाचा तुम्ही तुमच्या पुस्तकातून अभ्यास करता. त्यातून तुम्हाला पूर्वी घडून गेलेल्या अनेक घटना कळतात. त्यामुळे पूर्वी कोणकोणती राज्ये अस्तित्वात होती, कोणकोणते राजे होऊन गेले, हे कळते. त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धे, जयपराजय, प्रदेश हेही कळते. या घटना घडल्यानंतर कोणी-कोणी कुठे-कुठे नोंद करून ठेवली असून, त्यामुळेच आज आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो. अशा नोंदी पूर्वी कशा-कशा केल्या गेल्या, हे आपण पाहू या.

अगदी प्राचीन काळात भूर्जपत्रे, ताडपत्रे यांचा वापर लिखाणासाठी केला गेला. पण त्या पोथ्या काळाच्या ओघात नष्ट होण्याची शक्यता होती. नंतर मात्र मोठमोठ्या दगडांचा/शिलाखंडांचा वापर अशा नोंदींसाठी केला जाऊ लागला. या शिळांवर लेख कोरले गेले. त्यालाच शिलालेख म्हणतात. धातूच्या पत्र्यांचा वापरसुद्धा लेख कोरण्यासाठी केला जाऊ लागला. तांबे, सोने, चांदी, मिश्रधातू (जे गंजत नाहीत) अशा पत्र्यांचा वापर केला जाऊ लागला. दगड सहजासहजी झिजत नाहीत, गंजत नाहीत म्हणून त्यांचा वापर लिखाणासाठी होऊ लागला. दगडावर छिन्नीने कोरून शब्द काढले जात. मोठमोठे लेखही लिहिले गेले. भारतात अक्षरश: असे हजारो शिलालेख सापडले आहेत. अन्य देशांमध्येसुद्धा हे असे लेख सापडले आहेत.

आपल्या महाराष्ट्रातही शेकडो शिलालेख मिळाले आहेत. पुण्याजवळ कार्ले, भाजे, बेडसे, जुन्नर, नाणेघाट येथील शिलालेख तसेच औरंगाबाद जवळ वेरूळ-अजिंठा ही लेणी आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुमारे 1000-1200 लेणी/गुहा आहेत. प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या अनुयायांनी ही लेणी खोदली. हिंदू व जैन धर्मिंयांची ही लेणी आहेत. पण बौद्ध धर्मिंयांची लेणी संख्येने जास्त आहेत. या लेण्यांमध्ये अनेक लेख भिंतीवर, स्तंभांवर, पाण्याच्या टाक्यांवर कोरलेले दिसतात.

महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन वंश होय. त्याची माहिती पुराणांमध्ये मिळते. तसेच त्यांचे शिलालेखही मिळाले आहेत. त्यावरून पश्‍चिम महाराष्ट्र, गोदावरी नदीचे खोरे, विदर्भ आदी भागात त्यांचे राज्य होते, असे कळते. या शिलालेखांपैकी महत्त्वाचा शिलालेख आहे, जुन्नर जवळील ‘नाणेघाट’ येथे. घाटाच्या रस्त्यावर एक मोठे लेणे डोंगरात कोरलेले आहे. त्याच्या आतील बाजूस मोठा लेख कोरला आहे. या घाटातून खाली उतरल्यानंतर कल्याणकडे जाता येते. म्हणजेच, हा घाट म्हणजे कल्याण, आसपासचे प्रदेश आणि इकडे जुन्नर गाव यांना जोडणारा रस्ता आहे.

नाणेघाटातील हा लेख पाहून आपल्याला अनेक प्रश्‍न पडतात. त्यांची भाषा कोणती होती? कोणत्या लिपीत तो कोरला आहे? आज आपण मराठी बोलतो-लिहितो. काही जण हिंदी बोलतात-लिहितात तर काही जण इंग्लिश. आपण मराठी बोलतो आणि देवनागरी लिपीचा लिखाणासाठी उपयोग करतो. या लेखामध्ये भाषा ‘प्राकृत’ तर लिपी ‘ब्राह्मी’ आहे. या लेखात सातवाहन राजा  सिरी सातकर्णी, त्याची राणी नांगनिका, त्यांची मुले, मूळ पुरुष इत्यादींची नावे आहेत. राजाचा पराक्रम सांगितला आहे. त्यांनी केलेले यज्ञांचे वर्णन आहे. लेखामधून अशी इतरही माहिती मिळते. अंक कसे लिहिले आहेत, ते कळते. कालगणना कळते. त्यामुळे राजवंशाची पूर्ण माहिती मिळते. काही लेखांमध्ये दानांचा उल्लेख आढळतो. बौद्ध लेण्यांमध्ये असे दान लेख आहेत. त्यामध्ये राजवंशाचे नाहीत तर सामान्यांचे उल्लेख आहेत. दान काय दिले, हेही लिहिलेले आढळते. उदा. कार्लेलेख.

अशा कोरीव लेखांमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात प्राचीन असे मानले जातात, ते मौर्य सम्राट अशोकाचे लेख! संपूर्ण भारतभर त्याचे लेख सापडले आहेत. सारनाथ, जुनागड, कर्नाटकातील मास्ली, ओरिसा इत्यादी ठिकाणी अशोकाचे लेख सापडले. या लेखांमुळे आपल्याला इतिहास, संस्कृती यांची माहिती मिळते.

-कल्पना रायरीकर

[email protected]