२७ फेब्रुवारी हा दिवस आपण "मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा करतो. कारण हा दिवस म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. खरे तर, एकच दिवस आपल्या मातृभाषेचा उदो उदो करून तिचा विकास, प्रसार होणार नाही. म्हणून जिथे तिथे मराठी भाषेत बोलून, लिहून, वाचून, शिकून,शिकवून आपण आपली भाषा टिकवून ठेवू या.


गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले. स्वयंसिद्ध होण्यासाठी स्वत्व जागवणारे स्वभाषेतील शिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणत. इंग्रजांच्या धूर्त शिक्षणनीतीमुळे शिक्षित आणि अशिक्षित तसेच शहरी आणि ग्रामीण लोकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. इंग्रजीतून चालणारी पोपटपंची म्हणजे मोठेपणा अशा समजुतीतून लोक स्वभाषेचा तिरस्कार करू लागले होते. हे पाहून गुरुदेवांना वाईट वाटे.


ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकाकडून पुस्तकाकडे होणारा व्यवहार नसून ज्ञान हे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांना चैतन्यमय करणारे साधन आहे, हे जाणून त्यांनी शांतिनिकेतनमध्ये अनेक प्रयोग केले.  शाळेच्या चार भिंतींतून त्यांनी मुलांची सुटका केलीच शिवाय मुलांच्या मानेवरचं इंग्रजीचं जोखड काढून टाकलं. ज्या परक्या भाषेत मनातले भाव उमलत नाहीत, त्या भाषेचं व्याकरण आणि शब्दकोश यांखाली मुलांना जखडून ठेवायचे नाही, असे ठरवून रवींद्रनाथांनी स्वभाषेत म्हणजे बंगाली भाषेत 'सहजपाठ' लिहिले. ही पाठ्यपुस्तके आजही बंगालमध्ये सर्वत्र शिकवली जातात. ज्या शाळेला भिंती नाहीत, तेथील शिक्षणाला अंत नाही असा त्यांना विश्वास होता.


गुरुदेव म्हणत, " जो स्वतःचा मान ठेवत नाही, त्याचा मान दुसरा कसा ठेवेल ? आम्हीच आमच्या समाजाला, स्वदेशाला, स्वभाषेला तुच्छ मानतो. मग इतरांकडून  आदराची अपेक्षा कशी करता येईल?  आपली भाषा, आपले वाङ्मय, आपली संस्कृती यांचा इतरांनी आदर करावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपली भाषा, संस्कृती यांच्याच साहाय्याने स्वावलंबी होऊन आपली उन्नती करूया. भारताचे नष्ट झालेले श्रेष्ठ स्थान आणि लुप्त झालेले वैभव पुन्हा मिळवणे, हे नव्या पिढीचे ध्येय असलं पाहिजे." " राजकीय दास्यापेक्षा बौद्धिक दास्य अधिक भयावह आहे, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे." असे ते सांगत.
अध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम मातृभाषा हवी, यासाठी शिक्षणाचे देशीकरण व्हावे, असा त्यांचा आग्रह होता.  एका कवितेत रवींद्रनाथ लिहितात ..

        परेर भूषण, परेर वसन
        त्यागिबो आमि परेर अशन ।
        जदि होई दीन, ना होईबो हीन,
         छाडिबो परेर शिक्षण ।

अर्थात,
         परके अलंकार, परकी वस्त्रे
          त्यागीन मी परान्न ।
          जरी झालो दीन, न होईन हीन,
          सोडीन शिक्षण पराधीन ।


रवींद्रनाथांनी व्यक्त केलेल्या स्वदेश आणि स्वभाषा याबद्दलच्या विचारांची क्रमाक्रमाने उत्क्रांती होत " यत्र विश्वं भवत्येक नीडम् ।" असे बिरुद  बाळगणारे जगन्मान्य विश्वभारती विद्यापीठ निर्माण झाले. 

 

-स्वाती दाढे 

[email protected]