सर्जनशीलता म्हणजे वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून काहीतरी नवीन विचार मांडणे किंवा काहीतरी वेगळी क्रिया करणे. जगाकडे नवीन दृष्टिकोनातून बघणे, दडलेले पॅटर्न्स शोधणे, कोणतेही साम्य नसलेल्या गोष्टींमध्ये समानता शोधून काढणे किंवा एखाद्या समस्येवर अद्वितीय समाधान मिळवणे.

एखाद्याला चांगल्या कल्पना येत असतील; पण तो त्यावर काही क्रिया करत नसेल, तर त्याची फक्त कल्पनाशक्तीच चांगली आहे असे म्हणता येईल, पण याचा अर्थ तो सर्जनशीलसुद्धा आहे, असं नाही.

सर्जनशीलतेशिवाय कोणतेच नवीन उपक्रम होऊ शकणार नाहीत. लहान मुलांमध्ये सर्जनशीलता भरभरून असते. म्हणूनच त्यांना दिलेल्या चौकोनाबाहेरसुद्धा विचार करता येतो. पण बर्‍याचदा असे होते की, पालक म्हणून आपणच त्यांना चौकटीत विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे आपणच त्यांची कल्पनाशक्ती मारून टाकत असतो.

लहान मुलांसाठी कल्पनाशक्ती ही त्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यातूनच ते बर्‍याच मानसिक आणि भावनिक त्रासांना सामोरे जाऊ शकतात. सर्जनशील मुले ही जास्त महत्त्वाकांक्षीदेखील असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते या सर्जनशीलतेचा चांगला उपयोग करतात. त्यांची आकलनशक्तीही बहुदा चांगली असते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अशी मुले नवनवीन कल्पना पटकन मान्य करून त्यावर काम करू शकतात.

पालक म्हणून मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

घरात एक कोपरा असा ठेवा, जो फक्त त्यांचा आहे. तिथे जुने कपडे/वापरलेली खोकी/मोडकळीस आलेल्या वस्तू, अशा सर्व गोष्टी ठेवून द्या आणि त्यांना त्यांच्याशी काय खेळायचं ते खेळू द्या. यासाठी नवीन आणि महागच खेळणी लागतात असे नाही.

* दिवसातून थोडा वेळ हा मुलांसाठी काहीही न करण्यासाठी ठेवा. थोडा मोकळा श्वास घेता आला की मुलांना पण स्फूर्ती येते.

* टी.व्ही. बघण्यापेक्षा जास्त वेळ पुस्तके वाचण्यात घालवा. तुम्ही जेवढे जास्त वाचाल, मुलेही तुमचं अनुकरण करून वाचायला लागतील. वेगवेगळ्या विषयांवर वाचन केल्याने अनेक नवीन कल्पना सुचतात.

* मुले जेव्हा खेळत असतील, तेव्हा तो वेळ फक्त त्यांचा असू द्या. शक्य असेल तर तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर खेळायला बसा. तुम्ही काहीतरी नवीन बनवा म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल.

मुलांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आजकाल इंटरनेटवर अनेक कार्यपत्रके मिळतात. तसेच, काही नमुने खाली दिले आहेत.

सुट्टीच्या दिवशी मुलांकडूनच घरासाठी काहीतरी करून घ्यावे असे अनेक पालकांना वाटते. रंगीत कागद आणून द्या आणि छोट्या सजावटीच्या वस्तू त्यांना करू द्या. ते जसे होतील तसे घरात लावा. तोरणं बनवा. मात्र या सगळ्या रंगकामामध्ये स्वतःची चित्रकला त्यांच्यावर लादू नका!

कोणत्याही वयाच्या मुलांसाठी प्रशंसा ही खूप गरजेची असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या छोट्यातल्या छोट्या वस्तूची प्रशंसा नक्की करा. कारण त्यामागे त्यांचे मनापासूनचे कष्ट आहेत. या छोट्या गोष्टींची प्रशंसा झाली, तरच मोठे पराक्रम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. आणि तरच ते सर्जनशील होतील.

-प्रियांका जोशी 

[email protected]