टिपण कौशल्य

दिंनाक: 02 Feb 2018 15:19:51


मुलांनो, एव्हाना तुमचं स्नेहसंमेलन झालं असेल. हिवाळी सुट्टी, बक्षीस समारंभ, सहल या सगळ्या धम्माल गोष्टी पार पडल्या असतील. हो ना? या सगळ्या उपक्रमांमधून भरपूर एनर्जी घेऊन चला आता वार्षिक परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करू या.

मागील लेखात आपण अभ्यास करण्याच्या विविध पद्धती पाहिल्या. त्यातल्या SQ3R पद्धतीने काहींनी अभ्यास सुरूही केला असेल. एकदा धडा समजून घेतला की, पुढची पायरी येते लक्षात ठेवण्याची! अर्थात पाठांतराची. पण तुम्हाला माहीत आहे की पाठांतराच्या आधी आपण ज्यांचं पाठांतर करणार आहोत, त्याचे जर मुद्दे तुम्ही काढले व ते पाठ केले, तर तुमचं पाठांतर चांगलं होतं आणि वेळही वाचतो.

मुद्दे काढण्याच्या याच कौशल्याला ‘टिपण कौशल्य’ किंवा ‘नोट्स मेकींग’ असं म्हणतात. या नोट्स तुमच्या स्वत:च्या शब्दांत असल्यामुळे त्या लवकर लक्षात राहतात. कमी शब्दांत लिहिल्यामुळे परीक्षेच्या आधी वाचन करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे अभ्यास करण्याचा उत्साह वाढतो. नोट्स काढताना त्या धड्याचे सखोल वाचन करावे लागत असल्याने, विषयाचे आकलन चांगले होते. नोट्स काढताना विविध आकृत्या, चिन्हे, तक्ते, रंग, यांचा वापर केला असल्याने, लक्षात राहण्यास आणखीनच मदत होते.

चला तर मग, पाहू या नोट्स काढण्याच्या विविध पद्धती

1) आकृती तक्ता : यामध्ये मध्यभागी आकृती काढून त्याच्या चहूबाजूंनी त्यासंबंधी मुद्दे लिहावे. परीक्षेच्या वेळी ती आकृती डोळ्यांसमोर आणून त्याबद्दल सविस्तर उत्तरे लिहू शकतो. विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र इ. विषयांसाठी विशिष्ट संकल्पना समजण्यासाठी या प्रकाराचा उपयोग होऊ शकतो.

2) तुलनात्मक तक्ते : जेव्हा दोन वस्तूंमधला विरोधाभास किंवा तुलना लक्षात ठेवायची असते, तेव्हा या तक्त्याचा उपयोग होऊ शकतो. उदा., मृदासंपत्ती


 

 

 

 

 

 

3) ट्री डायग्रॅम : मुख्य मुद्द्यातून निघत जाणारे उपमुद्दे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. विशेषत: इतिहासातील वंशावळ लक्षात ठेवताना किंवा नागरिकशास्त्रातील संसदेची रचना इ. सारखे मुद्दे लक्षात ठेवताना याचा उपयोग होतो.


 

 

 

 

 

 

 

 

3) ओघ तक्ता : इतिहासातील घटना किंवा विज्ञानातील प्रयोगाचा क्रम लक्षात ठेवताना याचा उपयोग होतो. जेव्हा एका प्रसंगातून दुसरा प्रसंग घडलेला असतो किंवा आधीच्या कृतीमुळे त्याची परिणामस्वरूप पुढची कृती घडलेली असते, त्या वेळी त्याचा क्रम किंवा प्रवाह लक्षात ठेवताना या तक्त्यांचा वापर करावा.


 

 

 

 

 

 

4) केंद्रीय टिपणे : मुख्य संकल्पना मध्यभागी लिहून त्याच्या बाजूने फांद्यांच्या स्वरूपात उपमुद्दे लिहिले जातात.


 

 

 

 

 

 

 

5) दुहेरी नोट्स : या प्रकारात कागदाच्या मध्ये रेघ मारून दोन भाग करावेत. डावीकडच्या भागात महत्त्वाच्या संकल्पना, माहिती, नियम इ. लिहावे व उजवीकडील भागात त्यावरील तुमची स्वत:ची मतं, तुम्हाला ती संकल्पना वाचल्यावर मनात आलेले प्रश्न, परीक्षेत त्या मुद्द्यांवरवर कोणते प्रश्‍न विचारले जातील ते प्रश्न इ. गोष्टी लिहाव्यात. या प्रकारात तुमच्या स्वत:च्या विचारांवर, चिंतनावर जास्त भर देण्यात आला आहे.


 

टिपणे काढण्याच्या या पाच पद्धती तुम्हाला मी सांगितल्या. प्रत्येकालाच प्रत्येक पद्धत वापरता येईल असे नाही. ज्याला ज्या पद्धतीने सोपे जाईल त्याने ती पद्धत वापरावी. तसेच विशिष्ट विषयांच्या अभ्यासाला विशिष्ट पद्धत वापरल्यास अधिक फायदा होऊ शकेल, पण एकूणच मुद्दे काढताना काही गोष्टी तुम्ही जरूर लक्षात ठेवा.

  1. नोट्स काढायला सुटे कागद वापरावे.
  2. कागदाच्या डाव्या बाजूला 2 इंच समास सोडावा. जेणेकरून नंतर काही लिहू शकाल.
  3. नोट्स या कमीत कमी शब्दांत असाव्या. यासाठी मोठ्या शब्दांचे शॉर्टफॉर्म, चिन्ह, खूणा इ.चा वापर करावा.
  4. शीर्षक व उपशीर्षकांचा वापर विविध रंगांनी करावा.
  5. नोट्स या स्वत:च्या शब्दांत असाव्यात.
  6. विषयानुसार या नोट्सचे स्वतंत्र भाग करावेत. प्रत्येक विषयाचे एक स्वतंत्र फोल्डर किंवा फाईल असावी.
  7. आवश्यक तिथे चित्रे, आकृत्या, खुणा, रंग इ. वापर केल्यास नोट्स अधिक उठावदार होतात, लक्षात राहतात.

तेव्हा, चला मुलांनो, सुरुवात करा, प्रभावी टिपणे काढायला. या महिन्याभरात आवश्यक त्या अवघड धड्यांच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. कारण पुढील लेखात आपण ही उत्तरे कशी लक्षात ठेवायची, ते बघणार आहोत. तोपर्यंत तुमच्या नोट्स तयार हव्यात.

अभ्यास करण्याच्या विविध पद्धती जाणून घ्या खालील लिंकवर 

अभ्यास पद्धती

-रश्मी पटवर्धन

[email protected]