गुलाब

दिंनाक: 18 Feb 2018 15:42:35


गुलाब हे सर्वांचेच आवडते फूल. आयुर्वेदात गुलाबाला तरुणी म्हणतात. ही सुप्रसिद्ध वनस्पती मनुष्यापेक्षाही प्राचीन असावी. रोमन काळात गुलाबाच्या फुलांना व्यापारी महत्त्व होते. आशिया मायनर व पश्चिम चीन यामधील भूप्रदेश गुलाबाचे मूलस्थान मानले जाते. पुराणकालीन संस्कृत वाड्मयातही त्याचा उल्लेख आढळतो. मोगल राजे गुलाबाचे फार चाहते होते. ऊर्ध्वपतनाने गुलाबाच्या फुलाचा अर्क काढण्याची कला इराणमधून पहिल्यानेच भारतात कनोज शहरी आली.

पौराणिक कथा, लोकगीतात, काव्यात, संतचरित्रात, संगीतात गुलाबाचा उल्लेख आढळतो. स्थापत्य सजावटीतील नक्षीकाम, जडावाचे दागिने, कुंभारकाम, कापडावरील वेलबुट्टीचे भरतकाम यात शोभेकरिता गुलाबाचे फूल नमुना म्हणून वापरतात. हारतुरे, आकर्षक पुष्परचना, शरीरसौंदर्य वर्धनासाठी गुलाबाला महत्त्वाचे स्थान. दक्षिण भारतात पूजेसाठी, हारासाठी गुलाबाला विशेष महत्त्व आहे.

गुलाबाची झुडपे काटेरी, कटक, सदापर्णी, ताठ, सरळ वाढणारी असतात. वेल गुलाबही असतो. याची पाने एकाआड एक, संयुक्त, पिसासारखी असतात. पाकळ्या पाच वा नऊ, दातेरी पातळ  असतात. फुले एकेकटी वा गुच्छ. पुलोरयात, पानांच्या बगलेत टोकाला येत विविध रंग, गंधात उभयलिंगी असतात. बीजांचा प्रसार पक्ष्यांमार्फत होतो. किंजदले अनेक असल्याने त्यांचे फळात रुपांतर होते. त्याला घोसफळे म्हणतात. त्या फळात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

नजाकत करणारे सर्व गुलाब संकरीत असतात. संकरीत गुलाबाचे शाकीय (डोळा भरणे) पद्धतीने पुनरुत्पादन होऊ शकत नाही. पण हा गुलाब आपल्या बागेत दोन-तीन वर्षे शोभा देऊ शकतो. हिवाळ्यात ही फुले येतात पण त्यांना विश्रांती न मिळाल्याने आयुष्यामान घटल्याने ती आठ-दहा वर्षेच टिकतात. गावठी गुलाबी गुलाबाची रोपे मात्र शाकीय पद्धतीने तयार करतात.

गुलाबाच्या प्रकारांप्रमाणे फुलात अत्तर असते. ते काढल्यावर त्यासाठी वापरलेल्या उरलेल्या पाण्याला गुलाबपाणी  म्हणतात. भारतात अत्तरासाठी गुलाबांचे दोन प्रकार लागवडीत आहेत. १) बसरा- हा रोझा दामास्केनाचा प्रकार व २) एडवर्ड- याला बारमासी किंवा चिनिया हा बर्बन संकराचा प्रकार आहे. गुलाब काळ्या सारक. शीत, शक्तीवर्धन असून फुले सरक क्षुधावर्धन असतात. गुलाबकंद थंड, सारक पौष्टिक असतो. गुलाब फुले वात, पित्त, कफाचे दमन करणारी आहेत. डोळ्यांची आग होते तेव्हा गुलाब पाण्याच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्या. गावठी गुलाबी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद करतात. तो उष्णता; दाह यावर उपयुक्त ठरतो. चहा सुगंधित करण्यासाठीही ह्या फुलांचा उपयोग करतात. पाकळ्यांपासून अत्तर करतात ते परफ्युमसाठीही वापरतात.

गुलाबाला पाण्याचा चांगला निचरा करणारी कसदार जमीन लागते. तसेच त्याला सात सामू (पीएच मूल्य) पोयता जमीन हवी. त्यात. वाळूही थोडी हवी ते मूल्य कमी असेल तर तिच्यात चुना घालतात. शेणखत घालतात. उन्हाळ्यात लागवड करू नये.गरम वाऱ्याने झाडे सुकतील.

पावसाळा संपल्यावर झाडाची छाटणी करताना वरच्या बाजूच्या फांद्या कापाव्यात आणि महिन्यातून एकदाच पुरे होते. त्यामुळे पुढे उत्तम व भरपूर फुले येतात उत्तर भारत, बंगाल, बिहारमध्ये तेथील हवामानानुसार वर्षातून एकदाच घाटणी करतात. या झाडाला प्रखर ऊन लागते. नवीन फांदी लावताना पूर्वेकडील ऊन मिळेल असे पाहून ती थोडी तिरकी लावावी. झाडाला बिना साखरेचा चहाचा चोथा रोगप्रतिबंधक म्हणून घालावा. त्याला एकदिवसाआड अर्धा कप पाणी द्यावे जास्त पाणी झाल्यास फुले येत नाहीत. जमीन कोरडी वा पाणीही त्यात साचू देऊ नये, उन्हाळ्यात रोज थोडे पाणी घालावे.

फुलांचे विक्रीसाठी गुलाब बागेतील फुलांची तोडणी सूर्योदयापूर्वी संपवावी. मग ती फुले शक्य तितक्या लवकर विक्रीकेंद्राकडे रवाना करणे आवश्यक असते. ह्याला हिवाळी हंगाम फुलांसाठी चांगला असतो.

सुगंधासाठी लोकप्रिय असणाऱ्या मोगरा या फुलाविषयी माहिती वाचा खालील लिंकवर 

मोगरा

-मीनल पटवर्धन

[email protected]