वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.

“मी ईश्वरभक्त आहे. महर्षी दधिचीप्रमाणे माझ्या देशबांधवांसाठी त्यांच्या कल्याणासाठी माझेही बलिदान व्हावे. अशी माझी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे." हे उद्गार आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आहेत. "मला पाच हजार रुपये व शंभर आत्मत्यागी देशभक्त वीर पुरुष मिळाले तर मी इंग्रज सरकारला भारतातून घालवून देईन", असे ते नेहमी म्हणत. त्यांनी भारतमातेची परदास्यातून मुक्तता करण्यासाठी सशस्त्र  हिंसात्मक क्रांतीची ज्योत पेटवली. ती क्रांतीची ज्योत भावी तरुणांना स्फूर्तिदायी ठरली. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून ब्रिटीश सत्तेविरुद्ध दोन हात करण्याचा प्रयत्न काही क्रांतिकारकांनी केला. १८५७ च्या स्वांतत्र्य संग्रामानंतर इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम शस्त्र हाती घेणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात.

इंग्रजांच्या अन्याय्य कारभारामुळे संतप्त

वासुदेव बळवंत फडके हे काही काळ सरकारी नोकरीत होते. परंतु  इंग्रज सरकारचे येथील जनतेविषयीचे आणि विशेषतः दुष्काळग्रस्तांविषयीचे धोरण पाहून त्यांच्या मनात सरकारविषयी घृणा निर्माण झाली. सन १८७६ मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात मोठा दुष्काळ पडला होता. जनतेचे अतोनात हाल चालले होते. अशा वेळी इंग्रज सरकारने दुष्काळग्रस्त जनतेला मदत तर केली नाहीच, याउलट त्यांच्याकडून शेतसारा वसूल केला. इंग्रज सरकारचे गरीब जनतेविषयीचे हे बेपवाईचे व अमानुष धोरण पाहून फडके यांना अतिशय संताप आला. त्या भरात त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला. जनतेच्या मुक्ततेसाठी व आपल्या राष्ट्राच्या उद्धारासाठी बंडाखेरीज दुसरा पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत झाले.

सशस्त्र लढ्याच्या मार्गाने

फडके बंड करून उठले. आता यावर एकच उपाय बंड! क्रांती! सशस्त्र क्रांती! या देशातून इंग्रज सत्ता नष्ट झालीच पाहिजे. फडके यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करून परकीय सरकारच्या विरोधात प्रचाराची जोरदार आघाडी उघडली. लोकांना संघटीत केले. विविध मार्गांनी शस्त्राशस्त्रे गोळा केली. लोकांना शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले. फडके यांच्या बंडखोरीमुळे इंग्रज सरकार कृद्ध झाले. फडके यांना पकडण्यासाठी गावोगावी फिरू लागले. पण तेथेही फडके यांचे लोक फिरत होते. त्यामुळे इंग्रज लोकांची अक्षरशः झोप उडाली. 

सामाजिक पाठिंब्याचा अभाव व एकाकी अखेर

फडके यांचा हा सशस्त्र लढा केवळ पुण्यापुरताच मर्यादित नव्हता. तर जवळजवळ सात जिल्ह्यामध्ये त्यांनी इंग्रज मोठ्या अडचणीत सापडले. इंग्रज सरकारने फडके यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. गाणगापुर येथे अतिश्रमामुळे गाढ झोपेत असलेल्या फडके यांना डॅनियल याने पकडले. त्यांना पुण्यात आणले. नंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांना जन्मठेप भोगण्यासाठी ३ जानेवारी १८८० रोजी बोटीने एडनला पाठवण्यात आले. बोटीने भारताचा किनारा सोडला तेव्हा फडके मानत म्हणाले. "आता तुझा चरणस्पर्श होणार नाही. पण हे प्रिय मातृभूमी माझ्या जळणाऱ्या प्रेताच्या ठिणगी ठिणगीठिणगीतून  असंख्य क्रांतिकारक निर्माण होतील व तुझ्या पायातील दास्य शृंखला तुटतील."

एडनच्या तुरुंगात फडके यांचे खूप हाल करण्यात आले. ते आजारी पडले. त्यातच शेवटी एडनच्या तुरुंगात १७ फेब्रुवारी १८८३ रोजी सायंकाळी ४ वाजता या आद्य क्रांतिकारकाचे, नरसिंहाचे, शिरढोणच्या या ढाण्या वाघाचे प्राण अनंतात विलीन झाले.

लढाऊ राष्ट्रवादाचे जनकत्व

हिंदुस्थानात परकीय सत्तेविरुद्धच्या सशस्त्र लढ्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य प्रथम त्यांनीच केले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकाराकांत वासुदेव बळवंत फडके यांचे स्थान पहिले आहे. “लढाऊ राष्ट्रवादाचे जनक” म्हणून त्यांना यर्थाततेने गौरविले जाते.

-संगीता साळुंके.

[email protected]