दिवाळी झाली की, सगळीकडे पर्यटनाचे वारे वाहू लागतात. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांमध्ये असणारी थंडी सर्वांनाच सहलीला जाण्यासाठी खुणावत असते. परंतु, फक्त थंडीच्या मौसमातच सहली निघतात असे नाही, तर पावसाळ्यातला निसर्ग पाहाण्यासाठीही ‘वर्षा सहलीं’चे आयोजन केले जाते. रखरखीत उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा डोंगर-दर्‍या, नदी-नाले, ओढे सर्वांना चिंब भिजवून टाकतो. सगळीकडे हिरव्यागार मखमलींचे जणू गालीचेच पसरलेले पाहायला मिळतात.
हल्लीच्या काँक्रिटच्या जंगलात राहाणार्‍या आमच्या न्या. रानडे बालक मंदिरातील मोठ्या गटाच्या मुलांना हा निसर्ग प्रत्यक्ष अनुभवता यावा म्हणून आम्ही गेली आठ वर्षे बालसाहित्यकार ल.म. कडू काका यांच्या आंबेगाव येथील ‘पर्यावरण प्रकल्प’ येथे वर्षा सहलीसाठी नेतो.
शाळेतून निघालेली आमची बस खडकवासला धरणापाशी आल्यावर दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवी झाडे, धरणाचे पाणी आणि त्यावर आलेले वेगवेगळे पक्षी पाहून मुले हरखून जातात. नागमोडी वळणे घेत गाडी दीड तासाच्या प्रवासानंतर अंभी नदीवर बांधलेल्या पानशेत धरणाच्या भिंतीजवळ थांबते. स्वतः कडू काका मुलांना धरणाबद्दलची माहिती अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगतात. धरणातले पाणी संपले तर आपल्याला पाणी मिळणार नाही; म्हणून आपण सगळ्यांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, हा संदेश मुलांना प्रत्यक्ष धरणातील पाणीसाठा पाहिल्यावर मिळतो.
पर्यावरण प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मुले एकदम मोकळी होतात. डब्यातला खाऊ खाऊन ताजीतवानी होऊन कडू काकांच्या बरोबर सगळा डोंगर फिरायला सज्ज होतात. वेगवेगळ्या झाडांची, त्यांना येणार्‍या फुला-फळांची माहिती मुले एकाग्रतेने ऐकतात. प्रत्यक्ष हाताळून अनुभव घेतात. मिरचीच्या रोपांना आलेल्या मिरच्या, भोपळ्याच्या वेलीवरचा मोठा भोपळा बघून मुले आश्‍चर्यचकीत होतात. गांडूळखत कसे बनते तेही मुलांना दाखवले जाते. अंभी नदीच्या बॅकवॉटरचे दृश्य मुले डोळ्यांत साठवतात. तिथल्या कठड्याजवळ उभे राहून तिथल्या दरीत बीजगोळे (सीडबॉल्स) टाकतात व पर्यावरणाचा समतोल राखण्याचा खारीचा वाटा उचलतात. जून महिन्यापासूनच घरी खाल्लेल्या फळांच्या बिया साठवून त्यांचे मातीचे गोळे बनवून ते डोंगरांवर टाकण्यासाठी मुले खूपच उत्सुक असतात.
कोंबडी, तिची पिल्ले, कोंबड्याच्या डोक्यावरचा तुरा यांचे निरीक्षण करत असतानाच कडू काकांच्या हातात येतो एक खेकडा खराखुरा तुरूतुरू, तिरक्या चालीने चालणारा ‘खेकडा’. खेकड्याचे डोळे, त्याची नांगी, त्याचे पाय कसे व का असतात याबद्दल काका मुलांना गंमती सांगतात. एखादे संकट आले तर छोट्या-छोट्या पिल्लांना त्यांची आई कशी आपल्या पोटात सामावून घेते तेसुद्धा सांगतात. आश्‍चर्यचकीत झालेली मुले एकमेकांशी याबद्दल गप्पा मारतात.
त्यानंतर प्रत्यक्ष नांगरणीचा अनुभव मुलांना दिला जातो. नांगराला जोडलेल्या बैलांच्या जोडीला बघून आमच्या छोट्या-छोट्या मुली थोड्याशा बावरतात. मग आमच्या मदतीने त्यासुद्धा शेत नांगरण्याचा अनुभव घेतात. वाफ्यांमध्ये कधी नाचणी कधी बटाट्याची लागवड मुले करतात.
रमत-गमत डोळ्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळे अनुभव साठवत मुले पुन्हा डोंगर चढून वर येतात आणि गरम-गरम भोजनाचा आस्वाद घेतात. जेवण झाल्यावर थोड्याशा विश्रांतीनंतर आमच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात होते. काकांनी दिलेला कडीपत्ता, गवती चहाची पाने यांचा सुवासिक गुच्छ घेऊन आम्ही गाडीत बसतो. घरी गेल्यावर आई-बाबांना दिवसभर केलेली गंमत-मज्जा कधी सांगतो असे मुलांना होते.
शाळेत आल्यावरही ही मुले उत्साहीच असतात. दमलेली नसतात, कारण शुद्ध हवेच्या सानिध्यात दिवसभर राहिल्याने सगळे अगदी ताजेतवाने होतात.
अशी ही आगळी-वेगळी ‘सहल’ आम्हा शिक्षकांना दर वर्षी नवीन काहीतरी शिकवते. सहली दरम्यान दर वर्षी मुलांचे वेगवेगळे निरागस प्रश्‍न असतात.
कडू काका वेगवेगळ्या झाडांची नावे सांगत होते आणि मुलांना त्यांची नावे विचारत होते. आमच्या वरदने काकांनाच विचारले तुमचे नाव काय? काकांनी त्याला विचारले तुझे नाव काय? तो म्हणाला, ‘वरद’. काका म्हणाले, ‘माझे नाव शरद’. वर्गात अतिशय दंगा करणारा एक जागेवर स्थिर न बसणारा साई, कोंबडी हातात धरून दाखव सांगितल्यावर लांब जाऊन शांत उभा राहिला.
असे गंमतीशीर अनुभव दर वर्षी घेत ही ‘सहल’ आम्हाला पुढच्या सर्व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी उर्जा देते.
- हर्षाली अवसरे 

[email protected]